व्याख्यानमाला-१९७९-२०

१९३५ च्या घटना कायद्याप्रमाणे १९३७ साली सर्व भारतभर निवडणुका झाल्या. काँग्रेस या निवडणुकीत भाग घ्यायला तितकीशी उत्सुक नव्हती. कायदे मंडळावर बहिष्कार टाकण्याची भाषा चालू होती पण शेवटी काँग्रेसने निवडणुका लढविण्याचे ठरविले आणि या निवडणुका लढविताना त्यांनी १९३५ चा घटना कायदा आम्हाला मान्य नसल्याकारणाने आम्ही निवडून येऊन हा घटना कायदा मोडण्याचे ठरविले आहे. हे जसे काँग्रेसला घटना कायदा मोडण्यासाठी त्या घटनेप्रमाणे होणा-या निवडणुकीत भाग घ्यावा लागला. तद्धतच महाराजानी तत्कालीन परिस्थिती विचारांत घेऊन निरनिराळ्या जातींची वसतिगृहे काढली. कारण त्यांना प्रामाणिकपणे वाटत होते की या वसतिगृहांतून शिकून जी पिढी बाहेर पडेल ती हिंदुसमाजातील जाती मोडायला मदत करीत म्हणून महाराजांनी निरनिराळ्या जातींच्या पुढारी मंडळीना बोलावून त्यांना तुमच्या जातीतील गोरगरिब मुलांचेसाठी वसतिगृहे काढा मी त्यांना हरेक प्रकारची मदत करतो. असे सांगितल्यानंतर कोल्हापूर शहरामध्ये १९०१ सालापासून ते १९२२ सालापर्यंत म्हणजे महाराजांचे मृत्युपर्यंत भिन्न भिन्न धर्मांची व भिन्न भिन्न जातींची एकूण २३ वसतिगृहे अस्तित्त्वात आली.

१९०१ साली व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना झाली व १९२० साली प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना झाली. परंतू ही दोन्ही बोर्डिंगे महाराजांनी मराठी समाजापुरती मर्यादित ठेवलेली नव्हती. या दोन्ही बोर्डिंगात मराठ्यांच्या मुलाबरोबरच मुसलमान, साळी, माळी, कोष्टी, भोई वगैरे जातींच्या मुलांचीही व्यवस्था केली होती. त्याच प्रमाणे महाराजांनी आर्य समाजाचे 'गुरूकुल' हे बोर्डिंग काढले होते. या विद्यार्थी वसतिगृहांत स्पृश्यास्पृश्य अशा दोन्ही प्रकारचे विद्यार्थी ताटालाताट व मांडीलामांडी लावून एकत्रित बसत, जेवत व अभ्यास करीत. हे दृष्ट दिसून येत होते. महाराजांनी दृष्टी जातिभेदातील आणि धर्मातील कशी होती हे यावरुन दिसून येणार आहे. या शिवाय अस्पृश्य, मुसलमान, जैन लिगायत, ख्रिश्चन, शिंपी वगैरे जातींच्या व धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी महाराजांनी वसतिगृहांची स्थापना केली. विद्यार्थी वसतिगृहे ही खास महाराजांचीच कल्पना असल्यामुळे हिंदुस्थानातील विद्यार्थी वसतिगृहाचे आद्यजनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा गौरवपूर्वक उल्लेख करणे उचित होईल. महाराज मोठ्या अभिमानाने म्हणत असत की इंग्लंडचे पार्लमेंट हे जगांतील सगळ्या पार्लमेंटची जननी आहे. तसेच कोल्हापूर हे भारतातील सगळ्या विद्यार्थी वसतिगृहाची जननी आहे. परंतू या कल्पनेचे आद्य पुरस्कर्ते खुद्द छत्रपतीच होते. ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. महाराजांची विद्यार्ती वसतिगृहाची कल्पना किती यशस्वी झाली हे या विद्यार्थी वसतिगृहांतून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येईल. वानगी दाखल काही नावे मी आपल्यापुढे ठेवित आहे. भारतातील सुप्रसिद्ध कृषितज्ञ डॉ. पी. सी. पाटील, भारताचे माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती, पंजाबचे माजी गव्हर्नर व कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डी.सी. पावटे, सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ जे .पी. नाईक, कै. पद्मभूषण भाऊराव पाटील, महाराष्ट्रातील माजी मंत्री बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, तसेच सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ. अंकुश गावडे इत्यादि निरनिराळ्या क्षेत्रातील थोर पुरुष महाराजांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी वसतिगृहांच्या आधारानेच मोठ्या पदाला चढली.

आज हि बहुतांशी सर्व विद्यार्थी वसतिगृहे चालू आहेतच पण त्यांनी विद्यार्थ्यांची संख्या व आपला शैक्षणिक व्यापही वाढविलेला आहे. व्हिक्टोरिया मराठी बोर्डिंग आता शाह बोर्डिंगमध्ये नामांतर झाले आहे. या शाहू बोर्डिंगतर्फे व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगतर्फे दोन महाविद्यालये चालू आहेत आणि या दोन्ही महाविद्यालयांना 'Quality Colleges' म्हणून शिवाजी विद्यापीठाची व विद्यापीठ अनुदान मंडळाची मान्यता मिळालेली आहे. या दोन्ही महाविद्यालयामध्ये आज अनुक्रमे २००० व ३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीतही महारजांनी खास लक्ष पुरविले होते. मुलींच्यासाठी स्वतंत्रपणाने प्राथमिक शाळा काढल्या होत्या. प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत मुलीना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. मुलींच्यासाठी एक वसतिगृह ही महाराजांनी काढले होते व त्यांच्यासाठी शिष्यवृत्त्या ठेवल्या होत्या. भावनगर संस्थानचे अधिपती कै. भाऊसिंगजी महाराज हे महाराजांचे जिवलग स्नेही होते. या संस्थानातील मुलींच्या शिक्षणासाठी शाहू महाराजांनी शिष्यवृत्त्या ठेऊन गुजराथमधील स्त्रियांनीसुद्धा शिक्षण घ्यावं अशा प्रकारची व्यवस्था केली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org