व्याख्यानमाला-१९७९-१८

 महाराजांनी राज्यसुत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या अवती-भोवतीच्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांना दिसून आलेली हिंदुसमाजामध्ये वर्णवर्चस्व, सामाजिक विषमता, खोल रुजलेली अस्पृश्यता आणि अज्ञान फार मोठ्या प्रमाणात आहे. नोकरीमध्ये बहुतांशी ब्राह्मण समाजाचा भरणा आहे. धार्मिक आणि सामाजिक बाबतीत ब्राह्मणाचे वर्चस्व फार मोठ्या प्रमाणात आहे. जातिभेद तीव्र स्वरुपात आहेत हे सगळे नाहीसे करावयाचे झाले तर शिक्षण हाच त्याच्यावर एकमेव रामबाण उपाय आहे. म. जोतिबा फुल्यांनी सर्वसामान्य जनतेला शिक्षणावाचन तरणोपाय नाही हे सूत्र हाती घेतले होते व त्या दृष्टीने त्यांनी हयातभर प्रयत्न चालविले होते. इंग्लंडमध्ये १८८० साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत झाले पाहिजे अशा प्रकारचा कायदा झाला होता. त्याचाच आधार घेऊन हिंदुस्थान सरकारने १८८२ साली शिक्षणविषयक प्रश्नासंबंधी विचार करण्यासाठी व योजना आखण्यासाठी एक कमिशन नेमले होते. या कमिशनचे नाव 'हंटर शिक्षण कमिशन' (आयोग) या कमिशनपुढे साक्ष देताना म. जोतिबा फुल्यांनी हिंदुस्थानामध्येसुद्धा सरकारने प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले पाहिजे असे सांगितले होते. त्याच सुमारास हिंदुस्थानामध्ये जे मोठे मोठे राजकीय पुढारी व विचारवंत होते त्यांनी व खुद्द ब्रिटीश सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये 'Filtration Theory' चा पुरस्कार केलेला होता. फिल्टरेशन थिअरी म्हणजे झिरपण्याचा सिद्धांत वरच्या वर्गाला शिक्षण दिले म्हणजे ते झिरपत झिरपत तळच्या वर्गापर्यंत केव्हा ना केव्हा तरी जाईल. अशा प्रकारचा तो सिद्धांत होता. म. जोतिबा फुल्यांनी या सिद्धांचाला तीव्र विरोध केला. त्याचे कारण असे की हिंदुसमाजातील जातिव्यवस्था ही एकावर एक ठेवलेल्या अनेक भांड्याच्या उतरंडी प्रमाणे आहे. सर्वात वरचे भांडे हे ब्राह्मणांच ! व हिंदु समाजातील अनेक पंथ, जाती, पोट-जाती यांनी रचलेल्या या उतरंडीचे तळाचे भांडे म्हणजे भंगी समाज. म. फुल्यांच्या मते अशा या जातिप्रधान व्यवस्थेमध्ये झिरपण्याची क्रिया कदापिही होणे शक्य नाही कारण गेल्या तीन-चार हजार वर्षांत ज्ञानाची मक्तेदारी फक्त ब्राह्मणसमाजापुरतीच मर्यादित राहिली. पिढ्यानुपिढ्या, शतकानुशतके इतर वर्ण, वर्ग, जाती-पोटजाती या शिक्षणापासून वंचित राहिल्या. या उतरंडीची भांडी मातीचीच असतील तर कदाचित वरच्या मडक्यातले पाणी झिरपत झिरपत उशिरा का होईना खालच्या मडक्यापर्यंत पोहोचले असते. परंतू हिंदुसमाजातील जातिव्यवस्था इतकी टणक आहे की ही भाडी मडक्याची नसून धातूची आहेत. त्यामुळे वरच्या भांड्यातले पाणी खालच्या भाड्यापर्यंत कसे पोहोचणार म्हणून हा झिरपण्याचा सिद्धांत जातिव्यवस्था आहे तोपर्यंत हिंदुस्थानला कदापी लागू पडणार नाही. सर्वसामान्य जनतेला मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे अशा प्रकारे म. फुल्यांनी आग्रहाने मागणी केलेली होती.

म. फुल्यांचे हे सूत्र छ. शाहू महाराजांनी घट्ट हाती धरले आणि आपल्या राज्यापुरते तरी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची व शाळांची संख्या वेगाने वाढू लागली. महाराष्ट्रामध्ये प्रा. शिक्षण सक्तीचे व मोफत हे १९४७ साली सुरु झाले हीच गोष्ट महाराजांनी १९१७ सालच्या सुमारास केली. यावरुन दृष्टे पुरुष आपल्या कालाच्या पुढे असतात या म्हणीची प्रचीती येते. महाराजांनी प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच दुय्यम शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणाची सुद्धा व्यवस्था केली. परंतू गोर-गरीब मुलांना दुय्यम शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणे दुरापास्त होते. विशेषत: संस्थानातील खेड्यापाड्यांतील अगर संस्थानाबाहेरील गोर-गरीब मुलांना केवळ त्यांच्या गरिबीमुळे अशा प्रकारच्या शिक्षणाला पारखे व्हावे लागत असे. म्हणून महाराजांनी विद्यार्थी वसतिगृहांची एक नवी कल्पना अंमलात आणावयास सुरुवात केली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org