व्याख्यानमाला-१९७९-१५

म. फुले यांनी विविध प्रकारच्या ज्या चळवळी केल्या त्या मुळे बहुजन समाज फार मोठ्या प्रमाणात जागृत झाला. त्यांची परावलंबीवृत्ती नाहीशी होत चालली. त्यांच्या ठिकाणी स्वाभिमान व तेजस्वीबाणा निर्माण झाला. हजारो वर्ष धार्मिक अंद्धश्रद्धेमुळ आपण पिळले जात होतो, त्याला या चळवळीमुळे फार मोठ्या प्रमाणात आळा बसला. म. फुले यांनी केलेल्या चळवळींची विविधता, व्यापकता आणि ब्राह्मणापासून दलितापर्यंत सगळ्यांना जागृत करण्याचे जे प्रयत्न केले त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतीतील सामाजिक क्रांतीचा अग्रणी नेता म्हणून म. फुले यांचे नाव सामाजिक चळवळीने इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे लागेल.

म. फुले यांच्या काळातच आणखी एका समाजसुधारकाने महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना एक वेगळ्या विचाराने कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. तो समाजसुधारक म्हणजे कं. गोपाळ गणेश आगरकर. म. फुले यांचे व्यक्तिरिक्त जांभेकरांच्या पासून ते लोकहितवादी देशमुख, न्या. रानडे, विष्णुशास्त्री पंडित वगैरे मंडळीनी ज्या समाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला त्याला शास्त्राधार शोधून काढून ते चळवळी करीत गेले. परंतू म. फुले यांचे प्रमाणेच आगरकर याला अपवाद होते. आगरकरांचा भर बुद्धिप्रामाण्यवादावर होता. शास्त्रात एखादी गोष्ट आहे किंवा नाही याचा शोध घेत न बसता आणि शास्त्रे न धुंडाळता आजच्या परिस्थितीला इष्ट काय आहे, योग्य काय आहे, गरजेचे काय आहे. याचा विचार करुनच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. शास्त्रात असो अगर नसो आपल्या बुद्धीला एखादी गोष्ट पटली तर ती करण्यामध्ये अनमान करायचा नाही. हे त्यांचे ब्रीद होते. हा एक नवा विचार आगरकरांनी पुढे आणला. त्या मुळ सामाजिक क्रांतीच्या चळवळीला एक प्रकारची मोठ्या प्रमाणावर धार आली.

साधारणपणे १८८०-८२ च्या सुमारास महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात तीन प्रकारच्या चळवळी सुरु होत्या व त्यांचे प्रतिनिधित्व निरनिराळ्या नेत्यांच्याकडे होते. पहिली चळवळ म्हणजे 'नवजीवनाची चळवळ' दुसरी 'पुनर्जीवनाची चळवळ' आणि तिसरी 'उदारमतवादी चळवळ' म. फुले, कै. आगरकर हे नवजीवनाच्या चळवळीचे कट्टर पुरस्कर्ते होते. समाजाच्या गरजेची प्रत्येक नवीन गोष्ट घ्यायची त्यांची तयारी होती. नवं ते हवं असं त्यांचं ब्रीद होतं. पुनर्जीवनाच्या चळवळीचे नेते विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लो. टिळक होते. जुनं ते सोनं या तत्त्वाला ते घट्ट चिकटून बसले होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे फार दिवस जगलें नाहीत. परंतु निबंधमालेत त्यांनी जुन्याचा फार मोठ्या प्रमाणात पुरस्कार केला होता. आणि नव्या विचारांची हेटाळणी केली होती. लो. टिळक १९२० सालापर्यंत ह्यात होते. त्यांनी प्रत्येक सामाजिक सुधारणेला कसून विरोध केलेला होता. लो. टिळकांनी संमतिवयाच्या बीलाला, फॅक्टरी अॅक्टला, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाला, अस्पृश्यता निवारणाला आणि स्त्री शिक्षणाला कसून विरोध केला होता. लो. टिळक हे राजकीय स्वातंत्र्याने पुरस्कर्ते होते. पण सामाजिक चळवळीचे कट्टर विरोधक होते. १८८५ सालापासून इंडिनय नॅशनल काँग्रेसचे अधिवेशनात न्या. रानडे प्रभुतींच्या प्रयत्नाने काँग्रेसच्या मंडपात सामाजिक परिषद भरविण्याची प्रथा सुरु झाली होती. परंतु लो. टिळकांच्या हातात काँग्रेसची सूत्रं. गेल्यानंतर सामाजिक परिषदेची अधिवेशने काँग्रेसच्या मंडपात भरविण्याचे बंद झाले. लो. टिळकांना असे वाटत होते की एकदां कां हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले की सामाजिक सुधारणा चुटकीसरशी करता येतील. हे त्यांचं प्रामाणिक मत होत की सामाजिक चळवळीला बगल देण्यासाठी योजलेली युक्ती होती. हे समजणे कठीण आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बील लोकसभेमध्ये मांडून ते मंजूर करुन घेण्याचा प्रयत्न केला. खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही तर आपण राजिनामा देऊ असे अभिवचन दिले होते. परंतु हिंदू कोडापैकी घटस्फोटासंबंधीची फक्त चार कलमे मंजूर झाली. आणि संबंध हिंदू कोड बील बाजूला पडले. अधून मधून हिंदू कोड दुरुस्त करणारे एखादे विधेयक येते आणि मलमपट्टी बांधल्याप्रमाणे हिंदू कोडात सुधारणा होतात. परंतु मुळचे बील अजूनही मंजूर होऊ शकले नाही. ही खेदाची गोष्ट आहे. लो. टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर सामाजिक सुधारणा चुटकीसरसी करता येतील हे त्याचं म्हणणं कसं निराधार होत याची प्रचीती या उदाहरणावरुन आल्या शिवाय रहाणार नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org