व्याख्यानमाला-१९७९-११

विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या निबंध मालेत एके ठिकाणी म्हटले आहे की, ज्ञानाच्या किल्ल्या आमच्या कंबरेला आहेत. या किल्ल्या जोपर्यंत आमच्या कंबरेला आहेत तोपर्यंत आमचं कोणीही वाकडं करु शकत नाही. ब्राह्मण्याबद्दलचा दुरभिमान, गर्व आणि दर्प विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे ठिकाणी किती खोलवर रुजला होता याचेच हे उद्गार निदर्शक आहेत. पण विष्णुशास्त्रींना ही कल्पना नव्हती की ज्ञानाच्या किल्ल्या त्यांच्या कंबरेला तशाच राहिल्या आणि ख्रिश्चन मिशन-यांनी त्या किल्ल्याच्या डुप्लीकेट किल्ल्या तयार करुन ज्ञानाच्या तिजोरीचे दरवाजे सगळ्या जाती जमातींना खुले केले. विष्णुशास्त्री चिपळूणकर स्वत:ला मराठी भाषेचे शिवाजी म्हणवून घेत होते. त्यांनी निबंधमाला सुरू केली. या निबंध मालेतून त्यांनी आपल्या ओजस्वी आणि तेजस्वी भाषाशैलीने भूतकाळबद्दलचा अभिमान लोकांच्या मध्ये जागृत केला. ही त्यांची जमेची बाजू आहे. पण नव्या विचारांना, समाज सुधारणांना आणि सामाजिक क्रांतीला त्यांनी तीव्र स्वरुपात विरोध केला. लोकहितवादी देशमुख आणि म. फुले यांच्यावर त्यांनी आपल्या निबंधमालेतून निंदाप्रचुर, घणाघाती आणि निरर्गल स्वरुपाची टीका केली. परंतू नव्या विचारानं भारलेल्या या मंडळींनी अशा प्रकारच्या टीकेला भीक न घालता त्यांनी आपलं सामाजिक क्रांतीचं काम अव्याहतपणे चालू ठेवलं. म. जोतिबा फुले यांनी तर अस्पृश्यासह सारा बहुजन समाज ढवळून काढला. आपल्या कार्याला संघटितपणा यावा आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार व्हावा म्हणून त्यांनी 'सत्यशोधक समाज' या नावाची संघटना आणि 'दीनबंधू' या नावाचं वर्तमानपत्र काढलं. या शिवाय म. फुले यांनी 'गुलामगिरी' 'इषारा' 'शेतक-याचा आसूड' 'सार्वजनिक सत्यधर्म' वगैरे पुस्तके लिहून ब्राह्मण्यावर तीव्र हल्ला चढविला. 'शेतक-याचा आसूड' या पुस्तकामध्ये त्यांनी विद्येचे महत्त्व किती आणि कसे आहे, बहुजन समाजाने शिक्षण घेतल्याशिवाय त्यांचा उद्धार होऊ शकणार नाही. या तत्त्वांचा जोरदार पुरस्कार केला. या पुस्तकाच्या सुरवातीसच एक वाक्य आहे त्यावरुन जोतिबांना विद्येबद्दल किती तळमळ होती याची प्रचीती येते ते म्हणतात :

"विद्येविना मती गेली; मतीविना नीति गेली;
नीतीविना गति गेली ! गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले."

या वरुन विद्येची महती, कळमळ आणि तळमळ त्यांना किती वाटत होती हीच गोष्ट दिसून आल्याशिवाय रहात नाही.

सर्व सामान्य जनता ही विद्येत मागासलेंली आहे. त्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे. शिक्षणामुळेच त्यांच्यामध्ये स्वत्व, स्वाभिमान आणि सुधारणा होऊ शकेल. ते स्वतंत्रपणाने विचार करु शकतील. आपली पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याची तुलना करु शकतील. आपल्यावर असलेली धर्माची बंधने, जातीची बंधने, समाजातील दुष्ट रुढी, चाली आणि विषमता, उच्चनीचपणा यांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न शिक्षणामुळेच होऊ शकेल आणि म्हणून फुले प्रभृत्ती मंडळीनी बहुजन समाजात व दलित समाजात शिक्षणाचा प्रसार होईल याची काळजी घेतली.

म. फुले एवढेच करुन थांबले नाहीत. त्यावेळी समाजात बाल-विवाह मोठ्या प्रमाणावर होत असत. त्यामुळे बालविधवांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. स्वत:ला सुशिक्षित व सुसंस्कृत म्हणविणा-या ब्राह्मण समाजात तर या बालविधवांना प्रत्यक्ष त्यांच्या मातापित्याकडूनच केशवपन करुन विद्रूप केले जात असे.स्वत:ला 'शहाण्णवकुळी' म्हणून घेणा-या मराठी समाजात पडद्याची चाल असल्यामुळे या समाजातील बालविधवा कण्हत-कुथत घराच्या अडगळीत केसतरी आपले जीवन कंठीत असत. या सगळ्याच बालविधवा वयात आल्यानंतर नैतीकदृष्टया चांगल्या रीतीने वागत असत असे म्हणता येणार नाही. सगळ्यानाचं निसर्गावर मात करत येत नसे.

ब-याच बालविधवा विषय वासनेला बळी पडत असत. कोणीतरी त्यांना फसवीत असे अगर त्या फसल्या जात असत आणि अशा फसलेल्या अगर फसविलेल्या तरुण बालविधवा गरोदर राहिल्यानंतर भृहणहत्या करुन अपमानीत जीवन कंठीत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org