व्याख्यानमाला-१९७९-१०

त्यांच्या पूर्वी शिक्षिका म्हणून महाराष्ट्रातून कोणतीच स्त्री पुढे आलेली नव्हती. किंबहुना मुलीना शिकविण्याचं काम त्यापूर्वी कुणीही केलेलं नव्हतं. मुलींना शिक्षण देणे हीच मुळी धर्मबाह्य गोष्ट मानली जात असे. प्राचीनकाळी गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा आणि मंडण मिश्र यांची पत्नी सरस्वती या स्त्रिया वेदाभ्यास करुन विदुषी म्हणून त्या नावारुपाला आल्या होत्या. परंतु याही स्त्रिया ब्राह्मण समाजातीलच होत्या. मधल्या काळामध्ये शिक्षणाची परंपरा खंडित झाली. ब्राह्मण समाजाने बहुजन समाजाप्रमाणेच स्वत:च्या स्त्रियांना सुद्धा शूद्र लेखून त्यांना शिक्षणापासून वंचित केले. शिक्षण हे ब्राह्मण समाजातील फक्त पुरुषांचीच मिरासदारी होऊन बसलेली होती. इतर ब्राह्मणेत्तर समाजांना या शिक्षणाचा गंध ही नसे ब्रिटीशांचा अंमल येईपर्यंत शिक्षण घेणे हे दुरापास्त होऊन बसले होते. सातारच्या प्रतापसिंह महाराजांना सुद्धा त्यांच्या आईने रात्री १२ वाजता उठवून चोरून शिकवलं. कोणाच्या देखत आणि विशेषत: ब्राह्मणांच्या देखत शिकणे आणि शिकविणे ही दोन्ही दृष्टीने अशक्य गोष्ट होती.

ब्रिटीश राजवट सुरु झाल्यामुळे व पाश्चात्य संस्कृतीची संबंध आल्यामुळे जे जे नवे विचार येऊ लागले त्या मुळेच स्त्रियांना, बहुजन समाजाला आणि दलितवर्गाला शिक्षण मिळण्याचा मार्ग सुलभ झाला. सातारच्या प्रतापसिंह महाराजांच्या नंतर पहिली मुलींची शाळा काढण्याचे श्रेय म. जोतिबा फुले यांना आहे. अस्पृश्यांना शिक्षणाचा गंध ही नव्हता. अस्पृश्य समाज हा हिंदु समाजाचा घटक म्हणून जात होतं. परंतु पिढ्यान पिढ्या ते शिक्षणाला पारखे झालेले होते. अस्पृश्यांची ही पहिली शाळा हिंदुस्थानामध्ये काढण्याचा मान. म. जोतिबा फुले यांनाच आहे. आपल्या धर्म ग्रंथाचा अभ्यास करण्याचीही मुभा हिंदू समाजातील ब्राह्मण समाजाव्यतिरिक्त इतर कुठल्याही समाजाला नव्हती. ख्रिश्चन मनुष्य घेतला तर त्याला त्याचा पवित्र धर्म ग्रंथ 'बायबल' या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा अधिकार होता. मुसलमान माणूस घेतला तर त्याला त्याच्या धर्माचा पवित्र ग्रंथ 'कुराण' या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा हक्क होता. परंतु वेद हे हिंदूचे धर्मग्रंथ असून सुद्धा ब्राह्मण समाजाव्यतिरिक्त कोणालाही वेदांचे अध्ययन करता येत नसे. अस्पृश्यांच्या बाबतीत तर त्यांना वेद नुसते ऐकण्याची सुद्धा मुभा नसे, एखादा ब्राह्मण वेदांचं पठण करीत असेल आणि नकळत सुद्धा वेदाचे शब्द एखाद्या अस्पृश्यांच्या त्याचा काही दोष नसताना कानावर आले तर शिश्याचा कढत रस त्याच्या कानांत ओतून त्याला देहांत प्रायश्चित्त दिले जात असे. अशा प्रकारे ज्ञान मिळविण्याची सर्व साधने ही एकट्या ब्राह्मण समाजाची मिरासदारी होऊन बसली होती. लोकांना विद्या उपलब्ध करुन देण्याचा पहिला प्रयत्न ख्रिश्चन मिशन-यांनी केला. आणि त्यांचेच अनुकरण करुन हिदू समाजातील सामाजिक क्रांतिकारकांनी केले. अशा प्रतिकूल परिस्थितीत जोतिबा फुले यांनी मुलींच्यासाठी व अस्पृश्यांच्यासाठी समाजाच्या तीव्र विरोधाला नजानता प्रयत्न केला. त्यावेळी सरकारतर्फे समारंभपूर्वक शालजोडी व २००/- चे पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

आजकाल आपण पाहतो की प्रत्येक खेड्यामध्ये शाळा आहेत. आठ-दहा खेड्यांमध्ये एखादं हायस्कूल निघालेलं आहे. तालुक्याला बहुधा एखादे तरी कॉलेज असते. आणि ४-५ जिल्ह्यासाठी एखादे विश्व विद्यालय स्थापन झालेले आपल्याला दिसून येते. आज विश्व विद्यालयाची स्थापना करणं जेवढं सुलभ आहे त्याही पेक्षा म. फुले यांच्या काळात बहुजन समाजासाठी मराठी प्राथमिक शाळा काढणे अवघड होते. या पार्श्वभूमीवर म. फुले, सावित्रीबाई फुले आणि फुल्यांचे सहकारी यांनी ज्या शाळा सुरु केल्या त्या, त्या काळाच्या मानाने त्यांची फारमोठी कर्तबगारी आणि कामगिरी होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org