व्याख्यानमाला-१९७८-२

कराड नगरपालिकेचे माननीय नगराध्यक्ष श्री. पाटील, उपाध्य श्री. जाधव आणि मित्रहो,

माननीय यशवंतराव यांच्या गौरवाप्रीत्यर्थ आपण जी व्याख्यानमाला सुरु केली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि या व्याख्यानमालेतील आजचे व्याख्यानपुष्प गुंफण्याची आपण मला प्रेमाने संधी दिलीत याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे.

प्रथम गेल्यावर्षी दिली गेलेली व्याख्याने आज पुस्तक रुपाने सिद्ध झाली आहेत या पुस्तकाचे आज प्रकाशन झाल्याचे आनंदाने जाहीर करतो.

आज माननीय यशवंतराव चव्हाण यांचा वाढदिवस त्या निमित्तानं या महान नेत्याला दीर्घायुरारोग्य चिंतू या. यशवंतरावांचा एका अर्थाने आमच्या कुटुंबियांशी वेगवेगळ्या संदर्भात निकटचा संबंध आला. माझे धाकटे बंधू मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात काम करतात. संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने जे आंदोलन झाले त्याचा सर्वांगीण अभ्यास करीत असता त्यांच्या यशवंतरावाबरोबर अनेक बैठकी झाल्या. त्याचा वृत्तांत ऐकत असता यशवंतरावाबद्दल अनेक गोष्टी कळत गेल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतरावांनी एक ऐतिहासिक भूमिका बजावली आहे आणि महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर त्यांनी मराठी माणसांची अनेक स्वप्ने साकार केली आहे. माझे सासरे डॉ. बा. शं. कदम या महाराष्ट्र राज्याचे शेती खात्याचें संचालक होते. तेही अनेक वेळा यशवंतरावांविषयी बोलत. यशवंतराव एक कुशल प्रशासक आहेत तसे ते राजकारण धुरंधर आहेत. जीवनाच्या विविध क्षेत्रात अनेक गुणी व्यक्तींना त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.

आज यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाविषयी मराठी माणूस उलटसुलट चर्चा करीत आहे. जे यशवंतरावांचे बोट धरुन आले त्यांचेही काही म्हणणे आहे. काही टीकाकार म्हणतात की यशवंतरावांच्या युगाचा अस्त झाला. पण आज नरुभाऊंनी लिहिलंय की नव्या युगाला आरंभ झाला आहे. यशवंतरावांच्या राजकीय हालचालीबद्दल त्यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दल काळच निर्णय करील. पण यशवंतरावांनी आज जे महत्वाचं पाऊल उचललं आहे ते फार महत्वाचं आहे. त्यांनी आता एक ठाम भूमिका घेतली आहे की व्यक्तिपूजेपेक्षा विचाराची पूजा महत्वाची आहे. व्यक्तिपूजेतून एकाधिकारशाही वाढते पण विचाराच्या पुजेमुळे लोकशाही बळकट होते. विचाराचा पराभव विचारानेच केला पाहिजे. पण दुर्देवाने या देशात विचार नष्ट करण्यासाठी हिंसाचार जन्माला येत आहे. विभूतिपूजा हा या देशातील असाध्य रोग आहे म्हणून विभूतिपूजेचे उच्चाटन करण्यासाठी विचार वाढला पाहिजे. वर्गद्वेष, जातिद्वेष, हिंसा, दारिद्रय, वामाचार, क्रौर्य इ. अनेक कुरुपतांनी या देशाचे जीवन माखलेलं आहे. हा देश सुजलाम् सुफलाम् व्हायचा असेल, या देशात न्यायनीतीचे राज्य निर्माण व्हायचे असेल तर सम्यक् क्रांती व्हायला हवी, समाजपरिवर्तनात गती यायला हवी.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org