व्याख्यानमाला-१९७६-३४

महाराष्ट्रातील विष्णुशास्त्री चिपळूणकरांपासून स्फूर्ती घेतलेले राजकीय पुढारी हे चिपळूणकरांप्रमाणे हरपलेल्या स्वराज्याकडे लक्ष देऊन बोलत असत आणि राजकीय चळवळ करीत असत. ते इतिहासाकडे तोंड करून, सद्य:काळाकडे किंवा भविष्य काळाकडे पाठ करून बोलत असत. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे व शाहू छत्रपती हे येणारे स्वराज्य कसे असावे यासंबंधी विचार करणारे होते. त्यांचे लक्ष सद्यस्थिताकडे व भविष्यकाळाकडे होते. येणारे स्वराज्य सामाजिक न्याय व सामाजिक समता हया दोन गुणांवर अधिष्ठित झाले पाहिजे असे त्यांचे ध्येयधोरण होते. त्या काळी राष्ट्रसभेला नवसमाजनिर्मितीचे निश्चित असे ध्येयधोरण म्हणता येणार नाही. शाहू छत्रपती यांनी मद्रास, पुणे, नाशिक, नागपूर, भावनगर, कानपूर व दिल्ली येथे भाषणे केली, तेव्हा ते गरिबांची आणि दलितांची बाजू मांडीत असत.

छत्रपतींच्या म्हणण्याचा गोषवारा असा असे की, “ जे स्वत:ला भारतीय जनतेचे  पुढारी समजतात त्यांना येणा-या राजकीय स्वातंत्र्याचा उपयोग, अनेक शतके मानसिक गुलामगिरीत पडलेल्या आपल्या देशबांधवांचा उध्दार करण्यासाठी करावा आणि त्यांनी असे दिवस आणावेत की, जेव्हा प्रत्येक हिंदी मनुष्य हा दुस-याशी समान मानण्यात येईल आणि हिंदी समाजाची पुनर्रचना अशी होईल की मनुष्याला मिळणारे मोठेपण व आदर हे जन्माधिष्ठित नसून ते गुणाधिष्ठित असेल.” हे तत्त्वज्ञान सांगणारे शाहू छत्रपती हे एक तत्त्ववेत्तेच असले पाहिजेत.

त्या वेळी महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की, पाच टक्के ब्राह्मण हे ब्रिटिशांच्या खालोखाल राज्यकारभारात अधिकाराच्याजागा बळकावून बसले होते आणि राज्यकारभारात त्यांचा प्रचंड भरणा होता. “जरी राज्यसत्ता इंग्रजांचे हाती असली तरी कित्येक महत्त्वाच्या नोक-या पटकावण्यात ब्राह्मण समाजाला यश मिळाल्यामुळे ब्राह्मणेत्तर समाजाचा जळफळाट सुरू झाला.” असे वा. रा. गुळवणे यांनी ‘ब्राह्मण सभेची गेली ६० वर्षे’ ह्या आपल्या ग्रंथात मान्य केले आहे. ह्या वरून त्याकाळची परिस्थिती लक्षात येते, त्या काळी ब्राह्मण्याची भावना ब्राह्मण लोकांत तीव्र होती. ब्रिटिशांच्या छत्राखाली ती एक प्रकारची ब्राह्मणशाहीच अस्तित्वात होती. अस्पृश्य हे आपले धर्मबंधू आहेत, राष्ट्रबंधू आहेत व त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत ही गोष्ट टिळकांसारख्या महान पुढा-यांनाही कळली नाही, हे आश्चर्य नव्हे काय ? मागासवर्गीयांना आणि अस्पृश्य समाजाला राज्यकारभारातील पन्नास टक्के जागा देण्याची शाहूंनी घोषणा केल्याबरोबर, असे करणे शहाणपणाचे नाही व ती जातीय दृष्टीने केलेली घोषणा आहे. अशी लो. टिळकांनी शाहूंवर केसरीत टिका केली.

वेदोक्त प्रकरणात सनातनी आणि वर्णवर्चस्ववादी ब्रह्मवृंदांची बाजू घेऊन जसा चिपळूणकरांनी महात्मा जोतिरावांवर हल्ला केला, तसाच शाहूंना शूद्र ठरवून टिळकांना त्यांचे वर हल्ला चढविला. एका बाजूने लो. टिळकांनी, शिवाजी ही राष्ट्रीय विभूती आहे असे सर्व राष्ट्राला पटविण्यासाठी शिवाजी उत्सव सुरू केला व दुस-या बाजूने जो शंकराचार्य शिवाजीचा व त्याच्या वंशजांचा जीहीरपणे शूद्र म्हणून धिक्कार करतो, त्याची मिरवणूक टिळकांनी पालखीतून काढून ती पालखी मोठया अभिमानाने खांद्यावरून मिरवली.

विष्णूशास्त्री चिपळूणकरांना सत्यशोधक समाज, आर्य समाज, ब्राह्मसमाज का निर्माण झाले हे जसे कळले नाही, तसेच टिळकांना वेदोक्त प्रकरणातील ब्राह्मणेतरांच्या सामाजिक समतेची, सामाजिक प्रतिष्ठेची व समानधर्माची चळवळ कळली नाही. ते त्यावेळी म्हणाले, ‘मराठ्यांनी वेदोक्तरीतीने संस्कार करण्यात काही शौर्य आहे काय ?’ आपल्याच धर्मबांधवांपैकी ८० टक्के लोकांना आपल्यासारखेच धार्मिक व समाजिक हक्क नसावेत असे त्यांना वाटले. असे म्हणण्यात कोणते ऐक्याचे व राष्ट्रवादाचे तत्त्व होते ? ऋग्वेदाचे संपादन करणारे जर्मन पंडित मॅक्समुल्लर यांच्याविषयी टिळकांना अभिमान वाटे व त्या ग्रंथापासून टिळकांनी स्फूर्तीही घेतली होती. वैदिक धर्माचे सर्व अधिकार सर्वांना समान असावेत व सर्वांनी सामाजिक समता मानावी असे शाहूंनी महाराष्ट्राला दिलेले आव्हान ब्राह्मण समाजाने धुडकावून लावले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org