व्याख्यानमाला-१९७६-२८

समाजाचं परिवर्तन घडत असताना अनेक प्रकारच्या मूल्यांची पुनर्रचना करावीच लागते. नवे आकृतिबंध बांधावे लागतात. अणूंच्या रचनेमध्ये काय असतं ? वेगवेगळ्या ज्या वस्तू दिसतात त्या वस्तूमध्ये अणूचे वेगवेगळे रचनाबंध तयार झालेले असतात. त्या रचनांमधून वेगवेगळी वस्तू वेगवेगळे आकार घेते. माणसाच्या समाजाच्या जीवन रचनेमध्ये सुध्दा वेगवेगळ्या प्रकारची मूल्ये, वेगवेगळ्या प्रकारचा आकार घेऊन ते तयार होत असते. कधी कधी अशी वेळ येते की या रचनेमध्ये त्यांची आलटापालट करावी लागते. समाज जर कुरूप दिसत असेल, समाज जर विरूप दिसत असेल, समाज जर दरिद्री दिसत असेल, समाज जर अध:पतित दिसत असेल तर ही रचना बदलली पाहिजे. मूल्यांची पुनर्रचना केली पाहिजे. याचे प्राधान्य त्याला त्याचे याला असं करून त्याची रचना बदलण्याचा प्रयोग झाल्यानंतर काही सुव्यवस्था येईल असा विश्वास बाळगून या पुनर्रचनेला आपण मनापासून प्रतिसाद दिला पाहिजे असं मला वाटतं, आजच्या या बदलत्या परिस्थितीमध्ये जे चित्र दिसतं, बदललेलं, बरेचसे आशादायक चित्र दिसतं, ते चित्र पाहिल्यानंतर कदाचित या आपल्या परिवर्तनाला अधिक गती येईल, विचाराची बैठक मिळेल आणि ज्या समाजवादाचा सर्व समावेशक अशा प्रकारचा विचार आपण करतो, त्याच्या शेवटच्या टप्प्याचा विचार प्राधान्याने आपण करायला लागू ज्या वेळी असा विचार मनात येईल त्या वेळी सगळ्या कार्यक्रमाचे अर्थ आपणाला समजायला लागातील. मग शेतक-याला देशात काय प्राधान्य मिळाले पाहिजे, कामगाराला प्राधान्य मिळाले पाहिजे, बेठबिगारी करणा-या मजुराला प्राधान्य मिळालं पाहिजे, गरिब थरातून येणा-या विद्यार्थ्याला प्राधान्य मिळाले पाहिजे, गुलामीमध्ये अडकलेल्या स्त्रीला प्राधान्य मिळाले पाहिजे, कर्जामध्ये अडकलेल्या कर्जदाराला प्राधान्य मिळाले पाहिजे, या सगळ्या प्राधान्यांचा अर्थ या परिवर्तनाच्या संदर्भामध्ये आपल्याला कळायला लागेल. परिवर्तन हे चार पाच  माणसांतच झालं म्हणजे सबंध समाजाचं परिवर्तन झाले असे होत नाही. ज्या वेळी सबंध समाज आतून ढवळून निघतो, सबंध समाजामध्ये मंथन घडतं, त्यावेळी त्याच्यातून निर्माण होणारे अमृततत्त्व हेच खरे कल्याणमय तत्त्व असते. ते संजीवक असते म्हणून सर्व समाजाला ढवळून टाकणांर अस हे तत्त्वज्ञान आर्थिक सामाजिक, राजकीय स्तरावरचे, आपली मूलभूत अशा प्रकारची निष्ठा न गमावता आपल्याला करता येण्यासारखं आहे. असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

या माझ्या विषयामध्ये मी जे अनेक संदर्भ घेतले त्यात ऐतिहासिक संदर्भ होते, वेगवेगळ्या राष्ट्राचे संदर्भ होते, वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाचे संदर्भ होते, तरी माझ्या मनामध्ये वर्तमानकालीन संदर्भ हा अत्यंत महत्त्वाचा होता. आणि मला असं प्रामाणिकपणे वाटायला लागलं की लोकामध्ये विचारक्रांती झाल्याशिवाय, मानसिकक्रांती झाल्याशिवाय या राजकीय परिवर्तनाला, सामाजिक परिवर्तनाला, सांस्कृतिक परिवर्तनाला, शैक्षणिक परिवर्तनाला खरा अर्थ प्राप्तच होणार नाही. तर दिशाहिन अशा रीतीने भटकण्यापेक्षा कुठलीतरी दिशा निश्चित आखून त्या दिशेला जाणं हे महत्त्वाचं असल्यामुळे ती दिशा कोणती हे विचाराच्याच आधाराने लोकांना आपण दाखवून दिले पाहिजे आणि म्हणून हा विचार आणि त्या विचारावरती आधारलेला आचार या दोन गोष्टी राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. या परिवर्तनामध्ये विचारांचं परिवर्तन हे अत्यंत महत्त्वाचं मी मानतो. अशा प्रकारच्या प्रचलित विषयासंबंधाने मोकळ्यापणाने चर्चा व्हायला पाहिजे. मोकळेपणाने त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचं दडपण त्या अर्थाने मनावरती ठेवण्याचं कांही कारण नाही. परंतू काही संयम म्हणून काही पथ्य म्हणून जर काही काळापुरता आपल्याला आपल्या मनाचा एखादा कोपरा जर बंद करून ठेवण्याची वेळ आली तर समाजहिताच्या दृष्टीने, राष्ट्रहिताचे दृष्टीने ती क्षणभर आपण पाळली पाहिजे. अस मला मनापासून वाटतं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org