व्याख्यानमाला-१९७६-२३

आनंदाची गोष्ट आहे की अशा प्रकारच्या ज्ञानाची आराधना, अशा प्रकारच्या ज्ञानाची साधना, या देशामध्ये आज सगळ्या क्षेत्रांमध्ये चाललेली आहे. त्याचं प्रमाण अल्प आहे. आज जगामध्ये ज्या ज्या ज्ञानाच्या वाटा आहेत, आज जगामध्ये जे जे महत्वांचे उद्योग आहेत, आज जगामध्ये जी जी आर्थिक संक्रमणाची साधने निर्माण झालेली आहेत ती सगळी या देशामध्ये निर्माण होत आहेत. ही गोष्ट अनेक लोकांना ठाऊक नसते. इलेक्ट्रॉनिक्सचे क्षेत्र घेतलं, आण्विकशास्त्र, अणूसंबंधीच्या संशोधनाच क्षेत्र घेतलं, वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना लागणा-या मशिनरी निर्माण करण्यांच क्षेत्र घेतलं, वेगवेगळ्या प्रकारच्या वैज्ञानिक अशा प्रकारच्या प्रयोग शाळेतून निर्माण होणा-या ज्ञानाचं नव्या संशोधनाचं क्षेत्र घेतलं, निरनिराळ्या प्रकारच्या, ज्याला पायाभूत गरजा असे म्हणतो, त्या गरजांसंबंधी अभ्यास करणारी जी वेगवगळी क्षेत्रे घेतली, तर पंडितजींच्या  दूरदृष्टी ध्येय धोरणींतून, त्यांच्या विज्ञान निष्ठेतून, त्यांच्या बुध्दिवादातून या देशात जर पहिली गोष्ट कोणती आणली, तर त्यांनी त्यांचं नियोजन आणलं पंचवार्षिक योजना आणली. ज्यांचा विकास झालेला नाही आणि विकासाच्या मार्गावरती लागलेले आहेत, अशा देशांमध्ये भारत हाच पहिला देश आहे की ज्याने रशियाच्या पंचवार्षिक योजनेच्या पध्दतीची, पंचवार्षिक योजनेची नियोजन पध्दत या देशात आणली. आम्ही आपल्या साधन संपत्तीचा आढावा घेतला, आपल्या साधन संपत्तीची मोजदाद केली आणि आपल्याला प्राधान्याने काय साधायचं आहे आणि ते साधायच्या यादीमध्ये पंडितजींनी शास्त्राला, विज्ञाननिष्ठेला, ज्ञानाला फार महत्त्वाचं स्थान दिलेलं होतं. पण ते स्थान वरती राह्यलं आहे, खालपर्यंन्त पोहोचलं नाही ही माझी तक्रार आहे.

हे ज्ञानाचे झरे तिथंच झरत राहिले त्याचे परिणाम आज आपल्याला दिसताहेत. आकाशामध्ये आर्यभट्ट भ्रमण करताना दिसतो आहे, आणि राजस्थानच्या पोखरणच्या वाळवंटामध्ये अणूंचा स्फोट झालेला आहे. हे आपण पहातो आहे आणि या अणुशक्तीचा उपयोग वीज निर्मितासाठी, वेगवेगळ्या प्रकारची रसायने, वेगवेगळ्या प्रकारची औषधे, वेगवेगळ्या प्रकारची बी बीयाणे या सगळ्यासाठी होणार आहे, हे अनेक लोकांना माहित नसत. या देशामध्ये आणखी एक प्रचंड प्रयोग शेतीच्या दृष्टीनं, गंगा नदी कावेरीली जोडून गंगायमुनेचं पाणी या सबंध देशामध्ये खेळविण्याचा योजनाकारांच्या डोक्यांमध्ये आहे. परंतु या प्रचंड योजनेला लागणारे जे शास्त्रीय सिध्दांत आहेत ते झटक्यात अमलात आणावयाचे असतील तर या पोखरण सारख्या, ज्या ठिकाणी भूमिगत अशा प्रकारचे स्फोट करण्यात आले. त्या प्रकारच्या  आण्विक शक्तीची गरज लागणार आहे. हा विचार त्याच्यामागे आहे. ज्यावेळी आपण म्हणतो, शांततेसाठी, समृध्दीसाठी या अणुशक्तीच्या आम्ही मागे लोगलेलो आहोत त्यावेळेला त्याचा निश्चित काय अर्थ असतो हे ब-याच वेळेला माहित नसतं. ब-याच लोकांना आनंद होतो आणि अणूबाँबचा स्फोट केला. आता आम्ही ब-याच वरती जाऊन बसलो. किती अज्ञान असतं आपल्याला आता असं वाटतं की आम्ही चीनसारखे अणूबाँबयुक्त झालो. आणि फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, रशिया आणि चायना यांच्या बरोबरीने जाऊन बसलो हा केवळ आनंद मिळविण्यासाठी ही गोष्ट झालेली नसते. उद्या वेगवेगळ्या प्रकारच्या नागरिक योजना आखायच्या आहेत त्यामध्ये या शक्तीचा कसा उपयोग करायचा या दृष्टीने त्याचा पायाभूत अशा प्रकारचा अंदाज घेण्यासाठी म्हणून हे प्रयोग झालेले असतात. म्हणजे वरच्या क्षेत्रांमध्ये पंडितजीनी जी नवी दृष्टी शास्त्राची आणून दिली त्याचे दर्शन, त्याची फळं आज आपण पहातो आहोत. म्हणून आज अवजड कारखाने दिसतात आपल्याकडे. ज्या वेळी पंडितजींवरती फार मोठी टीका होत असे, या गरिबांना पोटभर खायला मिळत नाही अशा वेळेला तुम्ही त्या पोलादाच्या भट्टया कशाला बांधता ? राऊरकेला, भिलाई, ते दुर्गापूर आणि त्या जमशेटपूरच्या टाटांच्या पोलाद लोखंडाच्या भट्ट्या हे हवं काशाला ? परंतू त्या दूर दृष्टी असलेल्या माणसाने जगाच्या स्पर्धेमध्ये हा देश टिकून राह्यचा असेल, या देशाचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल, आणि याची सर्व संरक्षणाची फळी जर मजबूत करायची असेल, तर आवश्यक अशा प्रकारच्या ज्या पायाभूत गरजा या देशातच पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून अत्यंत आवश्यक अशा प्रकारच्या गरजांना देखील दुसरं प्राधान्य देऊन राष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाची जी असलेली गरज पहिल्यांदा हातात घेतली. म्हणूनच आज आपण पोलादाच्या आणि लोखंडाच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकलेलो आहोत. या दृष्टीने ज्या वेळी आपण पहातो त्या वेळी ज्ञानाची एक कक्षा राष्ट्राच्या कार्यक्रमाच्या आलेखामध्ये कुठेतरी आपल्याला स्पष्टपणे उमटलेली दिसते. त्याचा आपणाला अभिमान वाटला पाहिजे. आणि विकसनशील देश म्हणून जरी आपण ओळखलो जात असलो तरी या देशाकडून तंत्रज्ञान, शास्त्रज्ञ, वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरींचा पुरवठा ‘आम्हाला करा हो’ म्हणून इतर राष्ट्रं आता आमचेकडे येऊ लागलेली आहेत. बंगलोरचा आमचा हिंदुस्थान व मशिन टूल नावाचा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लागणारी यंत्रे निर्माण करणारा प्रचंड अशा प्रकारचा प्रकल्प आहे. अलीकडे इराकने तिथल्या शास्त्रज्ञांच्या मदतीने, तिथल्या तंत्रज्ञांच्या मदतीने आपल्याही देशामध्ये तशा प्रकारचा कारखाना काढण्यासाठी नुकताच करार केल्याचे आपण कदाचित वाचले असेल. आपणाला कदाचित ठाऊक नसेल की अनेक देशांना वेगवेगळ्या कच्च्या मालाची गरज असल्यामुळे ती माणसे आज आमच्याकडे कारारासाठी येत आहेत. अल्युमिनियमसाठी इराणसारखं राष्ट्र आज आमच्याकडे येत आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org