व्याख्यानमाला-१९७६-१७

मा. यशवंतरावांच्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वासंबंधी नेहमीच मला आकर्षण वाटत आलेलं आहे. हे आकर्षण असण्याला दुसरं एक कारण आहे. त्याचा आजच्या माझ्या विषयाशी संबंध आहे. कालच्या माझ्या भाषणाचा बराचसा भाग असा होता.  – या देशाच्या  सामाजिक पुनर्रचनेमध्ये, परिवर्तनामध्ये पं. जवाहरलाल नेहरूंचे एक अत्यंत महत्तम अशा प्रकारच दान होतं -  ज्याला आपण योगदान म्हणतो, कॉँट्रिब्यूशन म्हणतो -  स्व. पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असे चकित करून टाकणारे वेगवेगळे पैलू होते. उत्तुंग बुध्दिमत्ता होती. कला आणि सौंर्द्य यांच्या विषयीचे जबरदस्त आकर्षण होतं. विद्या आणि संस्कृती यांच्य़ा संबंधीची अत्यंत सखोल अशी जाणीव होती आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये, विद्येच्या, कलेच्या, ज्ञानाच्या, संगीताच्या, शिक्षणाच्या, सामाजिक सेवेच्या अशा जीवनाच्या सगळ्या अंगामध्ये काम करणारी जी जी काही उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणस होती – या देशातली व जगातील सुध्दा, - त्यांचा आदर सत्कार करण्याची आत्यंतिक महत्वाची गुणग्राही वृत्ती त्यांच्या ठिकाणी होती. यशवंतरावांच्या ठिकाणी सुध्दा या गुणांचे दर्शन मला अनेक ठिकाणी घडलेलं आहे. म्हणून त्यांनी जरी विनम्रपणाने म्हटलं असलं की मंत्रीपदाची बिरुदावली बाहेर ठेऊन मराठी भाषेचा एक  रसिक म्हणून या ठिकाणी या साहित्यिकांच्या सोहळयामध्ये मी उपस्थित रहात आहे. तरी असं म्हणत असताना त्यांच्या ठिकाणाची ही रसिकता, त्यांच्या ठिकाणचा हा एक जीवनाकडे ममतेने. एका आपुलकीने पाहण्याचा जो गुण आहे त्याचे दर्शन मला घडलेलं आहे. आणि म्हणून आजच्य़ा या प्रसंगी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सगळे त्यांत सहभागी असाल.

काल मी मझ्या विषयासंबंधी बोलत असताना विशेषत: तीन महत्त्वाचे विचार तुमच्यापुढे मांडले. देश स्वतंत्र झाला, देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचे निश्चित स्वरूप काय असेल या संबंधीचं चिंतन स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अग्रणी म्हणून जे होते विशेषत: महात्माजी व त्यांच्या बरोबरीने पंडितजी आणि इतर ही अनेकांनी केले. – त्यांच्या विचारांच्या मंथनातून निर्माण झालेली एक निश्चित राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनाची जी संकल्पना होती त्या संकल्पनेचं स्पष्ट चित्र १९४९ मध्ये जाहीर झालेल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये उमटलेलं आपणाला दिसतं. आपण त्यासाठी कटिबध्द झाल्याची प्रतिज्ञा घेतल्याची जाणीव या आपल्या घटनेमध्ये दिसते या ठिकाणी लोकशाही राज्य असेल, या ठिकाणी प्रजासत्ताकराज्य असेल, समाजवादाची मानवतावादावरती आधारलेल्या मूलभूत तत्त्वावर श्रध्दा ठेवणारी समाजरचना असेल, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन अवलंबून सर्व धर्माना योग्य प्रकारची मोकळीक देणा-या अशा प्रकारचा सर्व समावेशक, सर्व समन्वयकारक विचार त्या मध्ये असेल. त्या मध्ये एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या कल्याणासाठी स्वतंत्ररीतीने उद्योग करण्यांचं स्वातंत्र्य असेल, त्याच प्रमाणे दुबळ्या, असहाय्य, पिढयानपिढ्या दारिद्र्याच्या आणि अज्ञानाच्या गर्तेत रुतून पडलेल्या अशा समाजाला एका सामाजिक जाणीवेने हात देऊन वर काढण्याचा आग्रही प्रयत्न असेल याची निश्चित जाण या घटनेमध्ये या घटनेच्या शिल्पकारांनी प्रगट करून ठेवलेली होती. भारतीय समाजाच्या परिवर्तनाच्या दिशेने निश्चित आपणाला काय साधायचं आहे हे संविधानाच्यावर अक्षरबध्द झालेलं अनेक वर्षं आपण पहात आहोत त्या राजकीय क्षेत्रामध्ये आपण किती प्रगती केली ? या संबंधी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असा एक जुजबी आढावा मी काल घेतला. आणि त्यातल्या त्रुटी काय होत्या त्या मी सांगितल्या. आज जरा मी खोलात जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या सगळ्या सामाजिक, राजकिय आणि आर्थिक परिवर्तनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या जीवनामध्ये आढळणारे अनेक प्रकारचे विरोधाभास हेच खरे आपल्या पायातले किंवा आपल्या मार्गातले धोंडे आहेत. याच ख-या आपल्या पायातल्या बेडया आहेत. अशा प्रकारचा विचार मी काल मांडलेला होता. अनेक उत्तमोत्तम तत्त्वे सांगणारी  भारतीय संस्कृती आपल्या हाताशी असताना आणि पाश्चात्य संस्कृतीकडून अनेक उत्तमोत्तम नवी मूल्ये आपल्याकडे आलेली असतांना या दोघांचा वापर आपला रथ पुढे नेण्यासाठी करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली असतानासुध्दा ज्या गतीने त्याची प्रगती व्हायला पाहिजे होती तेवढी ती आपल्याला दिसत नाही. त्याची कारणं काय ? याचे ओझरते उल्लेख मी काल केले होते. आज मी या गतीला प्रगतीच्या दृष्टीनं अधिक गती येण्याच्या दृष्टीनं आपण कुठे कुठे कमी पडतो या संबंधीचा विचार आपल्या पुढे मांडणार आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org