व्याख्यानमाला-१९७५-८

वाढत्या किंमतीमुळे सबंध समाजामध्ये उत्पादनाच्या बाबतीमध्ये एक विकृती येते. आणि ती विकृतीसुद्धा तितकीच भयावह आहे. जितकी मंदी वार्ईट तितकी ही विकृतीही वाईट. मी उदाहरण देतो. आम्ही मंदी आहे असं केव्हा समजू? उत्पादन कमी होत आहे, रोजगारी कमी होत आहे मग आम्ही म्हणतो मंदी येते. पण उत्पादन तेवढेच राहाते. रोजगार तेवढाच आहे. मंदी आलेली नाही पण ‘आवश्यक’ उत्पादन कमी होत आहे आणि ‘अनावश्यक’ उत्पादन वाढत आहे. मग आम्ही म्हणतो ही विकृती झाली. मंदी नाही पण उत्पादनाची विकृती आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसात मध्यवर्ती सरकारचे अंदाजपत्रक जाहीर होते. या अंदाजपत्रकाबरोबर वर्षाचा आढावा दिला जातो. या वर्षाचा जो आढावा देण्यात आला आहे त्यामध्ये म्हटले आहे इथं उत्पादन वाढत आहे. पण कशाचे? रेफ्रिजेटरचे उत्पादन वाढत आहे. एअर कंडिशनचो उत्पादन वाढत आहे. प्रेशर कुकरचे उत्पादन वाढत आहे. पंख्याचे उत्पादन वाढत आहे. एकंदर उत्पादन एवढे एवढे. त्याचे जर आपण दोन भाग केले चैनीच्या वस्तू-अनावश्यक वस्तू हा एक भाग. दुसरा भाग-जीवनावश्यक वस्तू, सामान्याला हव्या असणा-या वस्तू. तर उत्पादन तेवढेच राहून किंवा वाढूनही आवश्यक वस्तूंचे उत्पादन कमी झाले तर ही विकृती आहे. ही विकृती अजूनपर्यंत आमच्या लक्षात आली नाव्हती. एक पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबुबुउल हक याने पहिल्याने हा दावा मांडला आणि नंतर भारताच्या पंतप्रधानांनी त्या विचाराचा पार्लमेंटमध्ये उल्लेख केला. त्यानंतर आमचे अर्थशास्त्र जागे झाले. वाढ आनावश्यक वस्तूंची झाली आहे. प्रेशर कुकरचं उत्पादन वाढत आहे पण त्या प्रेशरकुकरमध्ये शिजवायचं जे अन्न त्याचे उत्पादन वाढत आहे का? रेफ्रिजेटरचे उत्पादन वाढत आहे पण त्या रेफ्रिजेटरमध्ये दूधदूभते ठेवायचं त्याचं उत्पादन वाढत आहे का? आता लक्षात येईल- उत्पादनाची विकृती म्हणजे काय ते. भाववाढ जशी होते त्याप्रमाणे नुसती मंद येईल असे नव्हे तर त्याप्रमाणे ही विकृती वाढत जाते. मी तुम्हाला उदाहरण देतो. जशी भाववाढ होते त्याप्रमाणे देशातील विषमता वाढते. गरीब आणखी गरीब होतात, श्रीमंत आणखी श्रीमंत होतात. मग जे अधिक श्रीमंत झाले त्यांच्यासाठी लागणा-या वस्तू ह्या साहाजिकच अधिक उत्पन्न व्हायला हव्यात. आणि जे अधिक गरीब होतात त्यांच्यासाठी लागणारे उत्पादन हे पूर्वीपेक्षा करायला हवे. ह्याच पद्धतीने, तुमच्या लक्षात येईल की, आवश्यक वस्तूंचे दुर्भिक्ष होत आहे. कारण म्हणजे भाववाढ.

सरकारने जे कर योजावयाचे ते कर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर. वस्तूंवरचे कर हे अप्रत्यक्ष कर म्हणतात. ते वाढताहेत. त्यामुळे वस्तूंच्या किंमती वाढताहेत. आणि वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे लोकांच् हातातून वस्तू दिसताहेत. पण प्रत्यक्षात कर-संपत्तीवरील कर, उत्पन्नावरील कर हे ज्या प्रमाणात वाढायला पाहिजेत त्या प्रमाणात वाढत नाहीत. गेल्या २५ वर्षांमध्ये अप्रत्यक्ष कर १८ पटीने वाढले आणि प्रत्यक्ष कर फक्त ८ पट वाढले आहेत. म्हणजे श्रीमंतावरील कर गेल्या २५ वर्षामध्ये ८ पटीने वाढले आणि सामान्यांवरचा करभार १८ पटीने वाढला. याच्यातून विषमता निर्माण होते आणि विषमता निर्माण झाली की विकृती निर्मा होते. मी तुम्हाला आणखी कांही उदाहरणे देतो. मालाची जी बाजारपेठ असते ती बाजारपेठ श्रीमंतांसाठी किती आणि गरिबांसाठी किती याची आकडेवारी आपण गोळा केली तर ती आकडेवारी अशी आहे- १० टक्के श्रीमंत हे ३५ टक्के वस्तू विकत घेतात आणि राहिलेले ९० टक्के राहिलेले गरीब लोक बाकीचे उत्पादन विकत घेताता. त्यामुळे १० टक्के श्रीमंत लोक ज्या राष्ट्रीय उत्पादनाच्या ३५ टक्के घेतात त्याच तयार करणे हे व्यापा-यांच्या आणि उद्योजकांच्या फायद्याचे होते. अन्न निर्माण करण्याऐवजी प्रेशरकुकर निर्माण करणे हे फायद्याचे होते. तुमच्या जवळचे उदाहरण देतो. हरित क्रांतीचे. हरित क्रांतीमध्ये जे हायब्रीड बियाणे वापरले जाते त्याला पाणी खूप लागते. खत खूप लागते! पण या जादूच्या बियाण्याने उत्पादन वाढले असले तरी विषमता केवढी वाढली याचा तुम्हाला हिशेब देतो. गव्हाच्या उत्पादनाचा जो खर्च येतो त्याची हिस्सेवारी आपण जर काढली तर ती हिस्सेवारी अशी आहे : एकंदर उत्पादन खर्चापैकी ४० टक्के खर्च हा खतावर होतो. ३० टक्के खर्च हा व्याज आणि इतर भांडवलावर होतो. असा ७० टक्के. ५।। टक्के खर्च हा पाण्यावर होतो. २।। टक्के खर्च बीबियाण्यावर आणि जंतुनाशकावर होतो. आणि बाकी राहिलेला २२।। टक्के खर्च हा माणूस आणि बैल यांच्यावर होतो. आणि माणसाला त्यातील ११।। टक्के आणि बैलाला ११ टक्के असा हा खर्च होतो. एकंदर जो आपण खर्च करतो त्या खर्चातील माणसाचा वाटा किती? ११।। टक्के.जे उत्पादन आपण करू ते विकत घ्यायचं आहे. जे विकत लोक घेतली त्यातील जे मजूर असतील त्या मजुराला त्या उत्पादनाचा वाटा किती येईल? ११।। टक्के. जुन्या पद्धतीने शेती केली असती तर मजुराचा उत्पादन विकत घ्यायचा वाटा अधिक असता. हा अशा जर तुम्ही विचार करत गेला तर लक्षात येईल की गेल्या काही वर्षांमध्ये किंमतवाढीमुळे, आणखी इतर काही कारणामुळे विषमता सारखी वाढते आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org