व्याख्यानमाला-१९७५-५

असाच आणखई एक प्रसंग. गं. बा. सरदार हे एख नाणावलेले महाराष्ट्रातील विचारवंत. त्यांच्या षष्ठ्यब्ध्दीपूर्तीसाठी आम्ही एक ग्रंथ तयार केला. त्या ग्रंथाचा संपादक मी होतो. आणि हा ग्रंथ यशवंतरावांच्या हस्ते आम्ही प्रकाशित केला. मला पुण्यातील माझ्या स्नेह्यांनी विचारले, कारे सरदारांसारख्या पंडिताच्या गौरवासाठी ग्रंथ आणि त्या गौरवग्रंथाचे यशवंतरावांच्या हस्ते का प्रकाशन व्हावे? माझे त्यावेळीही उत्तर होते की यशवंतराव हे मंत्री आहेत, सत्तेवर आहेत ही गोष्ट वेगळी, यशवंतराव विचारवंत आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही यशवंतरावांना बोलावले. ह्या विचारवंतांच्या गौरवासाठी आपण ही व्याख्यानमाला योजिली त्याचा मला आनंद वाटतो.

जो विषय मी बोलण्यासाठी योजला आहे तो असा : ‘आजची आर्थिक परिस्थिती व त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग.’ विषय महत्त्वाचा आहे. गेली अनेक वर्षे स्थित्यंतर घडत आहे. ह्या स्थित्यंतराला आपण एक अरिष्ट म्हणून समजलो व हे अरिष्ट ओळखल्यानंतर त्यातून मार्ग काय हा साहजिकच प्रश्न उद्भवतो एक काळ असा होता की अशी उमेद वाटे की आर्थिक विकास हा सतत होत राहील-मोठ्या वेगाने होत राहील आणि लोकशाहीला बळकटी येईल. लोकशाही आर्थिक विकासाला प्रेरणा देईल आर्थिक विकास हा लोकशाहीला पूरक होईल. जगापुढे हे पहिले उदाहरण यायचे होते. ज्या उदाहरणामध्ये आर्थिक विकास आणि लोकशाही ही एकमेकाला सहाय्य करीत दोन्ही पुढे जायची होती. त्यामुळे जगभर भारताच्या या प्रयोगाचे कौतुक व्हायचे. विशेषत: लोकशाही देशांमध्ये कौतुक व्हायचे. त्यानंतर आता ही २०।२५ वर्षे गेली आणि हे कौतुक संपलेले आहे. जगामध्ये भारताच्या लोकशाहीचे हसे होत आहे लोकशाही दुर्बल होऊ लागली आहे असे लोक म्हणू लागले. ही दुर्बलता आपल्या इथे प्रत्ययाला येत आहे. आणि विकास हा गेली ४।५ वर्षे झालाच नाही. गेली चार वर्षे झालाच नाही. गेल्या चार वर्षांमध्ये इथे दर डोई उत्पन्न कमी कमी होत आहे हे कसे? आता असा एक प्रभावी विचार फैलावू लागला आहे की भारतात जर विकास व्हायचा असेल तर लोकशाहीला छेद द्यावा लागेल. काही काळ तरी लोकशाही स्थगित करावी लागेल. गेल्या आठ दिवसांमध्ये टाईम्स ऑफ इंडियामध्ये माझे एक स्नेही ह. कृ. परांजपे यांनी दोन लेख लिहिले. त्यात एक मुद्दा असा होता की काही काळ-चार वर्षे असा काळ दिला आहे. या लोकशाहीला कदाचित अध्यक्षीय स्वरूप द्यावं लागेल-प्रेसिडेन्शियल डेमॉक्रसी इथं आणावी लागेल.

दर डोई उत्पन्न जिथे वाढायचे तिथे कमी होत आहे. हे घडते तरी कसे? मला याची तीन कारण स्पष्टपणे दिसत आहेत तीन दोष आहेत. आणि ही कारणे आणि हे दोष या देशातले नव्याने उद्भवलेले नाहीत, गेली २० वर्षे ही कारणे आणि हे दोश या देशाच्या अंगामध्ये –जसा मलेरिया भिनावा, जसा क्षयरोग ठाण मांडून बसावा-भिनलेले आहेत. जवळ जवळ १०।१२ वर्षांपूर्वी या तुमच्या करडामध्ये मी एक व्याख्यान दिलं होतं. विषय होता भाववाढ. म्हणजे भाववाढ ही इतकी जुनी गोष्ट आहे. ते तीन दोष असे: १) या शासनाचे स्वरूप २) इथली महागाई ३) इथली विषमता. तिन्ही रोग जुने आहेत.

लोकशाही शासन हे मवाळ असले पाहिजे असे मुळीच नाही. मात्र सगळ्या आशियाई देशामध्ये लोकशाही शासन हे मवाळ, दडपणाखाली लवणारे, अकार्यक्षम असे झाले आहे. गुणार मिरदाल नावाचा एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ आहे. त्याने ५।६ वर्षांपूर्वी ३ ग्रंथांमध्ये असा दावा मांडला की आशियातील सगळी लोकशाही राष्ट्रे ‘सॉफ्ट स्टेटस्’ आहेत. भारतामध्ये ही गोष्ट प्रकर्षाने दिसत आहे. आणि ह्या दोषाचे एक कारण मी असे मानतो की आपल्याला वाटेल की लोकशाही याचा अर्थ “जो जे वांछील तो ते लाहो” अशी पद्धती. त्यात पक्का विचार, पक्का निर्णय आणि कणखरपणा नाहीत. त्यामुळे आपण समाजाची आर्थिक साधने वाया घालवतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org