व्याख्यानमाला-१९७५-४

ज्येष्ठ मित्रांनो,

सुरुवातीलाच मी आपले आभार मानतो. आपण मला वारंवार व्याख्यानांसाठी येथे बोलावले आणि एका अर्थाने अतिपरिचयही झाला असेल. पण अतिपरिचयामुळे जी अवज्ञा होते असा नियम आहे तो नियम आपण मोडला. मला तुम्ही आज ह्या पुस्तिकेच्या प्रकाशनासाठी आणि व्याख्यानमालेच्या उदघाटनासाठी बोलावले आहे. सुरुवातीलाच मी जाहीर करतो की गेल्या वर्षीच्या व्याख्यानाची ही पुस्तिका आता इथे प्रकाशित झाली आहे. या पुस्तिकेमध्ये गेल्या वर्षीची तीन व्याख्याने ही लेखरूपाने आलेली आहेत. पहिले व्याख्यान प्राचार्य ए. एम्. खान यांचे, दुसरे वि. अ. नाईक यांचे आहे आणि तिसरे सदाशिवराव बागाईतकर यांचे आहे. या तिन्ही लोकांनी मिळून लोकशाही आणि अविकसित देशातील समाजवाद असा विषय घेतला होता. हे तिघे व्याख्याते महाराष्ट्रात महशूर आहेत. ते विचारवंत म्हणून गणले जातात. ही पुस्तिका प्रसिद्ध केल्याबद्दल नगरपालिकेचे मी अभिनंदन करतो. तुम्ही मला बोलायला सांगितले आहे आणि व्याख्यानमालेत मी बोलतो आहे. या व्याख्यानमालेमध्ये बोलायला मला आनंद वाटतो. तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या गौरवासाठी आणि त्यांच्या वाढदिवसासाठी ही व्याख्यानमाला योजली आहे. मी स्वत: यशवंतरावांना खूप वर्षे विचारवंत म्हणून ओळखत आहे. तुमच्यापैकी काहींनी यशवंतरावांना जवळून पाहिले- १९४२ च्या चळवळीत. नंतर राज्यकर्ते म्हणून पाहिले. स्नेही म्हणून तुमचा परिय आहे अनेकांचा. माझा वैयक्तिक परिचय थोडाफार आहे. यशवंतराव हे महाराष्ट्रातले विचारवंत आहेत असे मी नेहमीच मानीत आलो आहे. ते महाराष्ट्रात असताना त्यांची व्याख्याने ऐकण्याचा योग येई. एक त्यांचे व्याख्यान मला आठवते. पुण्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी ते व्याख्यान दिले होते. प्रचंड मोठा शामियाना होता. हजारो लोक जमले होते. पुण्यातील पंडित महापंडित जमले होते.

२।३ पिढ्यांनी मंडळी जमली होती. आणि यशवंतरावांनी व्याख्यान दिले त्या व्याख्यानामध्ये काही विचार इतके मौलिक आणि इतक्या नेटक्या भाषेमध्ये मांडले की तासदीडतास ते व्याख्यान झाल्यानंतर टाळ्चा कडकडाट झाला आणि मला वाटते की कराडच्या या माणसाने नुसते पुणेच जिंकले असे नव्हे तर सबंध महाराष्ट्र त्यांनी मांडलेल्या विचारांनी जिंकला होता. अध्यक्षपदी होते न्यायमूर्ती गजेंद्रगडकर. हे व्याख्यान आटोपल्यानंतर गजेंद्रगडकर म्हणाले, इतका प्रभावी विचारवंत फार क्वचित. त्यातील काही विचार मी वारंवार माझ्या व्याख्यानामधून यशवंतरावांचे म्हणून मुद्दाम आवर्जून सांगितले आहेत. २।३ वर्षापूर्वीचा असा प्रसंग. आम्ही समाज प्रबोधन संस्थेने-ज्या संस्थेचा मी कार्यकर्ता आहे – इंग्रजीमध्ये महाराष्ट्रावरील ग्रंथ प्रकाशित केला: इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. त्याचे चार संपादक. त्यांतील मी एक होतो. आणि आमचे प्रमुख डॉ. वि. म दांडेकर होते. (त्या प्रकाशनाचा वृत्तांत काही दैनिकांमधून विशेषत: ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये रकानेच्या रकाने भरून आला). पुस्तक प्रकाशनाच्यावेळी वि. म. दांडेकरांनी काही विचार मांडले. महाराष्ट्र राज्याबद्दल. काही उल्लेख यशवंतरावांबद्दल आले. आणि सभेचा सबंध नूर बदलला. मी व्यासपीठावर होतो. माझी जबाबदारी दुहेरी होती. मी एक संपादक होतो, आणि त्या प्रकाशन समारंभाचा योजकही होतो. योजक म्हणून शेवटी मला चार शब्द आभाराचे असे बोलायचे होते. आभार मानताना मी आवर्जून उल्लेख केला की यशवंतराव हे नुसते सत्तेवर असणारे मंत्री एवढेच त्यांचे महत्त्व नाही आहे. त्यापेक्षा त्यांचे अधिक महत्त्व आहे. हा माणूस इतर विचारवंतांच्या पलिकडे पुष्कळदा असतो. आणि त्या दृष्टीने त्यांनी दांडेकरांची टीका मानावी असे आग्रहाने त्यांना मी सांगितले. दांडेकर हे स्वत: विचारवंत. आणि एक विचारवंत दुस-या विचारवंतावर टीका करतो आहे. एक पंडित राज्यकर्त्यावर टीका करतो आहे असे समजू नये. राज्यकर्ता आणि पंडित यांचा हा वाद नाही. सत्ता आणि पांडित्या यांचा विग्रह नाही. एक विचारवंत आणि दुसरा विचारवंत यांच्यामधला विचारवंतांचा हा विग्रह आहे. असे मी त्या ठिकाणी सांगितले होते आणि आज पुन्हा इथं हे सांगतो. याचे कारण असे की आपल्यापैकी अनेक लोकांनी यशवंतरावांना जे अनेक वर्षं जाणले आहे ते महाराष्ट्रातला एक विचारवंत म्हणून. सुदैवाने हा विचारवंत सत्तेवरही आहे. आयुष्यात असे काही योग असतात, त्यातील हा एक सुयोग आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org