व्याख्यानमाला-१९७५-२२

आर्थिक नियोजनात आपणास अनंत अडचणी आल्या २० वर्षामध्ये आपण फाटलेल्या किंवा जीर्ण होत जाणा-या कापडाला ठिगळं लावावीत तशी ठिगळं लावून आपण आपले आर्थिक नियोजन केले हे फक्त कागदावरच नियोजन राहीलं आहे. पण त्याही बरोबर हे ही लक्षात घ्यायला पाहिजे की ब्रिटीशांनी ज्या वेळेला आम्हाला स्वतंत्र केलं त्या वेळेला आमच्या हातामध्ये विकासाची उत्पादनाची व्यापाराची कांही साधन नव्हती. भांडवल निर्मिती नव्हती. आज १९७५ मध्ये ४० टक्के लोक दरिद्री आहेत पण ४७ साली याहीपेक्षा वाईट स्थिती होती. आणि म्हणूनच आम्ही नियोजन करायच ठरवल. ह्या आर्थिक नियोजना करत आम्हाला असे दिसून आले की अनेक प्रकारच्या नव्या आर्थिक संस्थाच निर्माण करायला पाहिजेत. आणि त्यासाठी आम्ही सहकारी चळवळीला पाठिंबा दिला. सामुदायिक विकास योजना काढल्या. नव्या कर्ज संस्था काढल्या. अनेक प्रयोग केले हे प्रयोग यशस्वी झाले नाहीत याची मिमांसा सामाजिक सदर्भात मला करायची आहे. या नव्या संस्था यशस्वी कां झाल्या नाहीत तर नव्या संस्थामध्ये दोष निर्माण झाले. कित्येक संस्था किडल्या. या नव्या संस्थांच हसं झालं, त्यांचे कारण आपण संस्था उभ्या केल्या पण संस्था चालविणारी माणसें उभी केली नाहीत. कुठल्या ही संस्था पडद्यामागे निष्ठेने काम करणा-या कार्यकर्त्याशिवाय चालत नाही हे आपण लक्षात घ्याव.

दुसरे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की संस्थेची चौकट निर्माण करून भागत नाही. ही संस्था ज्या पायावर उभी आहे तो पाया भक्कम असायला पाहिजे. शून्यापासून ब्रम्ह आपल्याला निमाण करायचं, आपल्याला ब्रिटीशाकडून जे मिळालं ते माळरान मिळालं होते. आणि आपण जिद्द बाळगली होती. महत्वाकांक्षा बाळगली होती, की आपल्याला एक मंदीर एका पिढीत उभे करायचे आहे. मोठी धाव घ्यायची होती ती धाव घेण्याची ताकद आमच्या सर्वांच्यामध्ये नव्हती. आणि म्हणून आम्ही या संस्थांचा वापर नीट केला नाही. नव्या संस्था निर्माण केल्या हे श्रेय मात्र आपण विसरता कामा नये. कित्येक मागासलेल्या पण आपल्याच बरोबरीने स्वतंत्र झालेल्या देशामध्ये नियोजन सुरूही झालेले नाही. या मागासलेल्या देशामध्ये कित्येक प्रकारच्या नव्या चौकटी आणलेल्या नाहीत. मला असं वाटतं की जमेची बाजू ही आपण लक्षात घ्यायला पाहिज, पण त्याच बरोबर या नव्या संस्था निर्माण झाल्या ख-या पण या संस्था चालवण्याकरता आपल्याला आर्थिक निधी लागतो, पैस लागतो, भांडवल लागते हेही लक्षात घ्यावयास पाहिजे.

ज्या योजना आम्ही सगळ्या साकार करणार आहोत त्याकरता लागणारी मदत संचयरूपाने, कर्जरूपाने लोक आम्हाला देऊ शकतील. उरलेली मदत परदेशातील समृद्ध लोक आम्हाला देतील ही आमची आशा संपली. या सगळ्या पुढारलेल्या देशांनी समृद्ध देशांनी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा एक टक्का भाग जरी दिला तरीसुद्धा सगळे मागासलेले देश पुढच्या २५ वर्षांमध्ये त्यांच्या बरोबरीने जाऊ शकतील. मात्र त्यांनी एक टक्का आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातील द्यायला पाहिजे. तो द्यायलासुद्धा त्यांनी तयारी दर्शविली नाही. त्यांनी शस्त्र पुरवठा केला इतर पुरवठा केला पण त्यांनी अनेक प्रकारच्या राष्ट्रीय आणि आर्थिक अटी त्यांनी घातल्या. त्यामुळे आपल्या देशाला कोट्यावधी डॉलर्स अमेरिकेकडून किंवा रशियाकडून मिळाले असले तरी ही मिळालेली मदत विनापाश अशी नव्हती. अनेक प्रकारची बंधने होती. आणि शिवाय ती मदत आपण दुदैवाने नीट वापरू शकलो नाही. आणि त्यामुळे आर्थिक घडी आपल्याला नीट उभी करता आली नाही. ज्याला आपण आर्थिक दुष्ट चक्र म्हणतो त्या आर्थिक दुष्ट चक्रामध्ये आपण सापडलो असून त्यातून बाहेर अजून आपल्याला येता आले नाही. हे आर्थिक दुष्ट चक्र कसे मोडायचे? आपल्याला शून्यातून ब्रम्ह निर्माण करायचे होते आपल्यामध्ये सहा लाख खेड्यातून विखुरलेले ८५ टक्के लोक निरक्षर आहेत. अडाणी आहेत अंधश्रद्धाळू आहेत. त्यांना मार्गदर्शन अजून होत नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org