व्याख्यानमाला-१९७५-१९

मला दिलेला विषय म्हटला तर अतिश साधा आणि सरळ आहे. तर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनामध्ये सतत सद्यःस्थितीविषयी विचार चालू असतात. सद्यःस्थितीमध्ये प्रत्येकाच्या मनात येणारे विचार हे अर्थात वेगवेगळे असतात. कारण सध्याची स्थिती अशी आहे हे प्रत्येकजण स्वतःच्या चष्म्यातून पाहात असतो. त्यामुळे म्हटले तर हा विषय कठीणही आहे. सद्यःस्थितीवर बोलायचे झाल्यानंतर त्यामध्ये आर्थिक प्रश्न आले सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्न आले. सध्याच्या स्थिमध्ये आपण मार्ग कसा काढू शकू, आपण अडचणीत आहोत का या विषयीही मतभेद असू शकतील. कारण हा विषयच असा आहे की जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करून जाणारा. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असेल आणि प्रत्येकाची वृत्ती वेगळी असेल. म्हणून सद्यः स्थितीवर बोलतांना एक मर्यादा मनामध्ये ठेवलेलीच आहे. मला जे जे वाटते. ते एक नागरिक म्हणून वाटते, विद्यार्थी म्हणून वाटते, शिक्षक म्हणून वाटते ते ते सर्व साधारणतः सर्वांना तसेच वाटत असावे. अनुभव हे सारखेच असतात. अर्थात काही मतभेद होऊ शकतात. सद्यःस्थितीबद्दल काहींना निराशा वाटते आणि सद्यःस्थिबद्दल आशा बाळगून असणारे लोकही खूप असतात. काही आशावादी, कष्ट करणारे, धडपडणारे लोक असे म्हणतात की आजची परिस्थिती जरी तुम्हाला निराशाजनक दिसत असली तरीसुद्धा मागे वळून पहा. पाच पन्नास वर्षापूर्वी होतो त्यापेक्षा आम्ही पुढे आलो आहोत. आणि यादीपेक्षा अधिक पुढे जाण्याची आम्हाला धडपड करायची आहे. या विषयाचे प्रतिपादन म्हणून ज्या दृष्टिकोनातून करावं त्या दृष्टिकोनातून करता येईल. इथं समजा परिसंवाद ठेवला असता आणि मला अशी बाजू घेऊन बोलायला सांगितले असते की- सद्यःस्थिती चांगली आहे असे प्रतिपादन तुम्ही करा तर ती तितक्याच  आग्रहाने व आवर्जून मी ती करू शकलो असतो आणि करता येईल. सद्यःस्थिती वाईट आहे, पूर्वीपेक्षा अधिक वाईट झाली आहे, तुलनात्मकदृष्ट्या ती वाईट आहे, जगातल्या इतर देशांच्या मानाने ती वाईट आहे अशा रीतीने प्रतिपादन करता येण्यासारखे आहे. चांगली आहे असेही करता येईल. पण म्हणूनच अमूक एक आग्रही भूमिका घेण्यासाठी हे विचारप्रदर्शन नाही. हे जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरून एखाद्या प्रश्नाकडे सर्व बाजूंनी आपण बघावे, सर्वस्पर्शी ज्ञान आपण मिळवावे आणि त्यातून ज्याला जो बोध घ्यायचा आहे तो त्याने घ्यावा असेच ह्या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे आणि म्हणून अमूक एक आग्रही भूमिका मी मांडणार नाही. सद्यःस्थिती हा विषयही असा आहे की दोरीवरून चालणा-या माणसाला जसे कठीण जाते तसेच प्रत्येक वक्त्याचेही व्हावे. वक्त्यालाही काही भूमिका असू शकतात. पण मी मात्र कुठल्याही त-हेची भूमिका या ठिकाणी घेणार नाही मी जिज्ञासूचीच भूमिका या ठिकाणी घेणार आहे. आणि ज्याला अभ्यासूची म्हणतात ती घेणार आहे. आणि त्यामुळे अमूक एक आग्रही प्रतिपादन केले पाहिजे, करता येईल असे मनात असूनही मी ते योग्य मानीत नाही. जितक्या बाजू आपल्याला बघता येतील तितक्या आपल्याला बघायच्या आहेत. आता असं करतांना अमूक बाजू आपल्याला वगळून चालेल असे म्हणून चालणार नाही. आर्थिक विषयावर प्रतिपादन करताना त्याचा स्पर्श राजकीय क्षेत्राशी येतोच. आणि राजकीय आणि आर्थिक क्षेत्राचा विचार करताना आपली सामाजिक प्रगती किंवा परिस्थिती ही आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. किंबहुना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक ही सर्वच क्षेत्रे अशी आहेत की एका क्षेत्रातील परिणाम दुस-या क्षेत्रावर होतो. आणि म्हणूनच या देशाविषयी प्रेम आणि आशा बाळगणा-या सर्वांना, आपल्याला असे वाटते की सद्यःस्थिती कशी आहे याचे मूल्यमापन कोणी कसंही करोत या सद्यःस्थितीतून बाहेर येण्यासाठी धडपड करण्याची जिद्द सतत आमच्यामध्ये राहू दे, आत्मीयता राहू दे आणि एक दिवस आम्हाला असा भाग्यशाली दिस दे कीज्या वेळेला याहीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आम्ही असू सद्यःस्थितीपेक्षा अधिक चांगली स्थिती आम्हाला प्राप्त होवो असे अमेरिकेतील धनाढ्य व सुखी लोकसुद्धा म्हणतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org