व्याख्यानमाला-१९७५-१६

आपण विचार करा की ४७ सालानंतर हे आम्ही किती स्विकारलं? आमच्या जीवनात हा समाजसुधारणेचा महान मंत्र होता ज्या राष्ट्रांनी तो स्वीकारला त्यांना मी म्हणतो चीनचे उदाहरण मी देतो आम्ही ४७ सालानंतर स्वतंत्र झालो. चीन ५० साली झाला पण माओनी प्रत्यक्षात अमलात आणलं ते असं की बाबांनो खूप काम केलं पाहिजे आणि आपल्या गरजा शक्य तितक्या कमी करावयास पाहिजेत. चौ एन लॉय प्राईममिनिस्टर सायकलवर बसून जातो. असल्या प्रकारचे कठोर जीवन, खडतर जीवन त्या राष्ट्राने स्विकारले. आपल्या राष्ट्राची शक्ती जगात काय आहे हे आपल्याला वेगळे सांगायला नको. आपल्याला सुदैवाने गांधी मिळाले पण त्यांचा आम्ही शेवटी देव केला आणि शिकवण विसरलो आमच्या समाजाच्यापुढे समस्या निर्माण झाल्या. आज जी जीवनमूल्ये आम्ही स्वीकारली आहेत त्या जीवनमूल्यांमुळे काय होणार आहे? कोणाचाही असल्या गोष्टींवर विश्वास नसेल पण कृष्णाच्या सोन्याच्या द्वारकेने यादवांना खराब केले हे आपण लक्षात ठेवा. सोन्याची द्वारका झाली आणि यादवांत भांडणे झाली म्हणून यादव खलास झाले. आज जी समृद्ध राष्ट्रे आहेत, त्यांची सामाजिक परिस्थिती काय आहे, याचा जर तुम्ही विचार केलात तर आपण जे आहोत ते फार बरे आहोत. हे समाधान फारसे सोपे नाही. तर असे समृद्धीच्या पाठीमागे लागणे हे समाज बलवान करण्याचे लक्षण नव्हे. समाज बलवान होतो तो पैशामुळे होत नाही तर तो जीवनमूल्यांमुळे. आगरकरांनी दिलेली बुद्धिवादी परंपरा अमलात आली पाहिजे. त्यांनी बुद्धिवादी परंपरेला अत्यंत महत्त्व दिले आहे. समाज स्थैर्याचे दृष्टीने आर्थिक समतेच्या दृष्टीने भारताची लोकसंख्या मर्यादित होणे हे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. कुटुंबनियोजनाबद्दल लोक तुच्छतेने बोलतात. चेष्टेने बोलतात. पण जे मर्यादित असलेले उत्पन्न हे जर भारतातील प्रत्येकाला मिळावयास पाहिजे, खायला मिळावयास पाहिजे निदान एकदा तरी, आणि हे जर नसेल तर आमच्या संविधानात अर्थ नाही. संविधान आमच्या जीवनाचा भाग झाला पाहिजे, मानवाला ज्या जीवन ठेवण्याला आवश्यक गोष्टी त्या उत्पन्न व्हावयास पाहिजे, पण त्याचबरोबर लोकसंख्याही मर्यादित करावयास पाहिजे.

तेव्हा ही आर्थिक समस्या सामाजिक सुधारणेचा भाग आहे आणि दुसरी गोष्ट सांगितली आता जी जीवनमूल्ये आहेत आजच ती बदलली पाहिजेत. काहीतरी एक शास्त्र प्रकारची जीवनमूल्ये असतात त्याच आधारावर मानव जात जगली आहे, तरली आहे ती शाश्वत जीवनमूल्ये आम्ही समाजामध्ये आणली तर आम्ही क्रांती करू ती जर आणली नाहीत तर हानी होणार आहे.

तर बंधूंनो, मला एवढेच सांगावयाचे आहे की आपल्याला ह्या समाजसुधारणेच्या गोष्टी आता राजा राममोहन रॉय, न्यायमूर्ती रानडे, आगरकर किंवा जोतिबा यांच्या मान्य असणा-या समस्यांपेक्षा आथा वेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि या समस्या सोडविताना त्या पूर्व पिढीकडे आपण जरूर पहावे. त्यांनी दाखविलेला मार्ग आपण जरूर चोखाळावा. त्यात ज्योजिबांनी पेटवलेली ज्योत आपल्याला खरोखरच उज्ज्वल असा मार्ग दाखवते आहे. मग गांधीजींनी दाखविलेला मार्ग मात्र आमच्या समाजाला धैर्य आणण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा मार्ग हा समाज सुधारणेचा मार्ग आहे. आजच्या समस्या गांधींच्या मार्गाने आपण गेल्यास आर्थिक विषमता पुष्कळ कमी होईल आणि जीवनमूल्ये ही चांगल्या प्रकारची होऊ शकतील पण जर आम्ही या बाबतीत गांधीजींना विसरलो तर इतिहास मात्र आम्हांला क्षमा करणार नाही.

कदाचित मी जे बोलतो आहे हे आपणास अतिरंजित वाटत असेल. पण या विषयावर मी थोड्या अधिकाराने बोलू शकतो. या विषयावर मी सारखे चिंतन करीत अशतो, विचारविनिमय करीत असतो. अखेर आपल्या ह्या समाजाचे काय होणार आहे आणि म्हणून मी आपल्या गावी आलो आणि माझे विचार मी आपणापुढे मांडले. इतिहास आपल्याला क्षमा करणार की नाही याचं उत्तर आम्ही आपले जीवन यापुढे कसे ठेवतो यावर अवलंबून असेल इतके सांगून मी माझं भाषण पुरे करतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org