व्याख्यानमाला-१९७५-१०

मी दोन उदाहरण देतो : हायब्रीड बियाण्यांचा निर्माता नॉर्मन बोर्लो ह्याने गेल्या काही दिवसामध्ये एक मुलाखत दिली आहे. तो म्हणाला की, पहिल्या वेळी मी हे मिश्र बी काढले त्यावेळेला मला उमेद होती की १० वर्षांमध्ये सगळं जग हे भरपूर अन्न मिळून संतुष्ट होऊन जगेल. पण आज मला ही उमेद राहिली नाही. त्याचे कारण असे- आज लोकसंख्येच्या वाढीचा वेग भयानक वाढला आहे. म्हणजे हे जे हायब्रीड बियाणे त्या बियाण्यापेक्षा-मानवाची निर्मिती, अधिक जोराने माणसांची ब्रीड हाय होत आहे. ही जर वाढ झाली तर हेच सरकार आज यापेक्षा अधिक बलवान ही सरकार आले तरी अन्नाचा प्रश्न सुटणार नाही. कम्युनिष्टांच्याही लक्षात हे आले आहे. पूर्वी कम्यूनिष्ट असे मानीत लोकसंख्या वाढी आहे वगैरे जो सिद्धांत आहे तो खास भांडवलशाही सिद्धांत आहे. एकदा कम्युनिस्ट पद्धत आली म्हणजे मग सर्वांना भरपूर अन्न, सर्वांना भरपूर वस्त्र देऊन आबादीआबाद निर्माण करता येईल. पण आज चीनमध्ये हेही मानले जात आहे की लोकसंख्येच्या वाढीवर आवर घातला पाहिजे आणि ही लोकसंख्येची वाढ जर कमी करता आली नाही तर इथं बाका प्रसंग येणार आहे. दुसरे उदाहरण घ्या. भाववाढ होते वगैरे सगळे बरोबर आहे. त्या बरोबर लोक चिडले आहेत हेही बरोबर आहे. पण लोकांनी चिडून पुन्हा शिस्त मोडायची हे मला पटत नाही. भिलाईच्या पोलाद कारखान्यामध्ये उत्पादनात खंड पडण्याचा काळ हा उत्पादन होण्याच्या काळापेक्षा ज्यास्त आहे. एवढेच नव्हेतर जे उत्पादन होत असे ते उत्पादन आता होऊच दिले जात नाही. मजूर आपल्या घरी ज्या चुली मांडीत त्या आता कारखान्याच्या दर्शनी भागातच मांडीत आहेत. उत्पादन खाली येत आहे. एकदा आम्ही रेल्वेची चाके कोरियाल निर्यात करीत असू. पण आता कोरियाकडून रेल्वेची चाके आयात करीत आहोत. आणि ही चाके यंत्रे तयार करतात ती यंत्रे आता वापरली जात नाहीत. ती भिलईहून बंगलोरला उचलून न्यायची होती. त्याला मजूरांनी विरोध केला. चाके होत नाहीत आणि चाके तयार करणारी यंत्रेही उचलता येत नाहीत. ती यंत्रे गंजू लागली असतील.

मला असं दिसतं ती जी किमान शिस्त कमी होत आहे. उत्पादन कमी होतं त्याचा आलेख मांडता येतो, किती मजुरीचे दिवस बुडाले त्याचा आलेख काढता येतो. पण शिस्त कमी होते याचा आलेख जरी काढता आला नाही तरी तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकाला ज्यांनी १९४७ सालापासून पुढची वर्षे पाहिली आहेत त्याला मनाशी हा आलेख काढता आला पाहिजे. ही केवळ जबाबदारी ही सरकारचीच आहे-आम्ही मात्र सासूद ही भूमिका चालणार नाही.

उपाय योजना करायला एखादे दशकच फक्त उरलेलं आहे. हा एका दशकाचा हिशेब गेली २।३ दशके लोक ऐकत आलेले आहेत. १९५०।६० या कालामध्ये एकच दशक उरल्याचे लोक म्हणत होते. १९६०।७० मध्ये एकाच दशकाची संधी उरल्याचे लोक म्हणत होते. त्याच पद्धतीने तुम्ही म्हणाल हाही वक्ता एकच दशक उरल्याचं म्हणतोय. कोणी आणखी दोन दशके उरल्याचे म्हणेल. होय. पण अराजकाचे असे दशक मिळवायचे आहे काय? हा माझा प्रश्न आहे. जी पुढची दशके मिळत जातील ती दशके अधिकाधिक भ्रष्टाचाराची, अधिकाधिक दुर्भिक्षाची, अधिकाधिक हिंसेची, अधिकाधिक अराजकाची असतील ती दशके अंगावर ओढून घ्यायची नसतील तर मी म्हणेन की वेळ थोडा उरलेला आहे. थोडक्यात काय चाललं हे जाणून घेऊन त्यावर उपाय योजना करणे हे आवश्यक झालं आहे.

तुमचा मी आभारी आहे. असेच प्रेम राहू द्या!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org