व्याख्यानमाला-१९७४-४

लोकशाहीचा आशय :

भारतीय लोकशाही : भारतीय लोकशाहीचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सर्व जगामध्ये लोकशाहीची म्हणून जी मूल्ये आहेत ती मूल्ये भारतीय लोकशाहीमध्ये आपण गेली पंचवीस वर्षे रुजवीत आहोत. स्वातंत्र्य, समता, न्याय ही ती महत्त्वाची मूल्ये होत. लोकशाही या शब्दाचा आशय मोठा आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्ति-स्वातंत्र्य होय. लोकशाहीची मूल्ये व त्यांतही ही व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य अध्यात्मिक आहे. मानवप्रेम, जीवनप्रेम अभिप्रेत असणारे हे ख-या अर्थाचे अध्यात्मिक मूल्य आहे. अध्यात्म या शब्दाचा नेहमीचा सर्वसामान्य रूढ अर्थ येथे घ्यावयाचा नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या या अत्यंत महत्त्वाच्या तत्त्वामुळेच असे म्हटले जाते की लोकशाही ही केवळ राज्यपद्धती नव्हे तर ती एक जीवनपद्धती आहे. लोकशाहीचे स्वातंत्र्य म्हणजे संघटनेचे स्वातंत्र्य, जमावाचे स्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्य होय. लोकशाही म्हटले की बंधुभाव, समता, न्याय या गोष्टी आल्याच. पण भारतीय लोकशाहीचे वैशिष्टय म्हणून जे मला सांगावेसे वाटते ते म्हणजे भारतीय लोकशाहीची धर्मनिरपेक्षता. धर्म-निरपेक्षता याचा अर्थ अधार्मिकता नव्हे. धर्माला आपण मानत नाही असा याचा अर्थ नाही. धर्मंनिरपेक्षता याचा अर्थ सर्वधर्म-समभाव असा आहे. राजकारणामध्ये धर्माला कोणतेही स्थान नाही. कुठल्याही धर्माला त्यात स्थान नाही. आपण सदसद् विवेक बुद्धीने, सल्लामसलतीने, सूज्ञपणे एखादा निर्णय घ्यावा व त्याप्रमाणे धोरण ठरवावे. बुद्धिप्रामाण्याच्या निकषावरुन जे काही योग्य असेल ते जनसेवेसाठी करावे यात खरा मानवधर्म आहे. आणि याचा स्वीकार भारतीय लोकशाहीने केला आहे.

लोकशाहीपद्धत : भारतीय लोकशाहीच्या विचाराच्या संदर्भात रजनी कोठारी या विचारवंताने लिहिलेल्या Party System in India या ग्रंथाचा उल्लेख करणे इष्ट होईल. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतामध्ये एकपक्ष वर्चस्व पद्धत ( one party dominance system) आहे. एका पक्षाचे वर्चस्व म्हणजे काँग्रेस पक्षाचे वर्चस्व हे ओघाने आले. काँग्रेस पक्ष पूर्वी राजकीय पक्ष नव्हता. स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस हे जनतेचे आंदोलन होते. जनतेची चळवळ होती. याचाच अर्थ असा की भारतीयांच्या आशाआकांक्षाशी काँग्रेस निगडित होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस संघटना राजकीय पक्ष म्हणून पुढे आली. अशा त-हेने काँग्रेस पक्षापुरतेच बोलायचे झाले तर हा पक्ष भारतीयांच्या आशाआकांक्षांचा प्रतीक म्हणून आहे. काँग्रेस पक्ष सर्वंकष व सर्वसमावेक्षक असा आहे. त्यामुळे त्याचे वर्चस्व असणे स्वाभाविक आहे. हा पक्ष एकमताने निवडून आलेला पक्ष ( a party of consensus) आहे. या पक्षापुढे काही कार्यक्रम ( a party of  programme ) आहे. या पक्षामध्ये कृतिशीलता (a party of action )  आहे. याच्याविरुद्ध दुसरा पर्यायी पक्ष नाही असे दिसून येते. बाकीचे सर्व पक्ष फक्त व्यासपीठापुरते (parties of platform) आहेत. कारण त्यांच्याकडून फक्त विरोधच होत असतो. असे असणे योग्य नाही. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अेका पक्षाचे वर्चस्व असणे धोकादायक आहे असे भय बाळगण्याचे कारण नाही. नुकतीच उत्तरप्रदेशामध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल पाहिला तर असे दिसून येईल की यापूर्वी तेथे जे यश काँग्रेसला मिळाले त्याच्या तुलनेने सध्याचे यश जास्त आहे. हा जनतेने दिलेला निर्णय आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org