व्याख्यानमाला-१९७४-२४

आज आपल्या देशात नेमके हेत घडलेले आहे. हाच आपल्या रोजच्या अनुभवाचा भाग आहे. म्हणून आर्थिक वा सामाजिक उद्दिष्ट ठरवीत असताना त्याचे निर्गुण रुप काय आणि सगुण रुप काय हे ठरवले पाहिजे. ज्याला हिंदुस्थानात समता निर्माण करायची आहे, आर्थिक आणि सामाजिक समता निर्माण करायची आहे त्याला कठोरपणे सांगितले पाहिजे की हिंदुस्थानसारख्या समाजामध्ये छेलारामसारख्याचे जे त्याचे वैभव आहे, ते राहाणार नाही,ते राहाता कामा नये. हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. कारण छेलाराम हा या समाजाच्या आजाराचे प्रदर्शन आहे. या समाजामध्ये एखाद्या व्यक्तीने, एखाद्या छोट्या समूहाने सा-या समाजाला तुच्छ लेखून स्वत:च्या वैभवाचे नागवे प्रदर्शन करण्याचा जो निलाजरेपणा वाढला आहे. अशा अल्प समाजाचे छेलाराम प्रतीक आहे. हे प्रतीक जनतेमध्ये राहू शकते? हे प्रतीक परिवर्तनाच्या कुठल्या प्रतिमेमध्ये राहू शकते? याचे स्पष्ट 'नाही' हेच उत्तर असले पाहिजे. आणि कुठलेही सरकार असो त्या सरकारला लोकांना समतेच्या जवळ न्यायचे आहे, ज्या सरकारला लोकांच्यामध्ये नवे काहीतरी घडत आहे असा अनुभव निर्माण करायचा आहे, त्या सरकारला अशा प्रकारचे वर्तन करण्याचे स्वातंत्र्य कोणालाही राहाणार नाही याची खबरदारी घ्यावीच लागणार आहे. जे सरकार अशी जबरदारी घेणार नाही ते समाजमानसात समाजवादाच्या आणि समतेच्या मूल्याबद्दलचा संभ्रम आणि संशय निर्माण करण्याचा अपराध करणार आहे.

आज आपल्याला असे दिसत आहे की, राष्ट्रीयीकरणाची कल्पना घ्या, राष्ट्रीय सेवेची कल्पना घ्या. या प्रत्येक कल्पनेचे अवमूल्यन जे झालेले आहे आणि हे सर्व म्हणजे एक प्रचंड थोतांड आहे, प्रत्यक्षामध्ये काही नाही अशा प्रकारचे जे दूषित वातावरण समाजामध्ये निर्माण झाले आहे त्याचे कारण केवळ निर्गुणाची चर्चा आणि सगुणाची उपेक्षा हे गेल्या पंचवीस वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर कालातला समाजाचा अनुभव. उद्याचा जो स्वर्य निर्माण होणार आहे त्याची थोडीफार पुसट ओळखदेख सातत्याने तुम्ही जनतेला करुन दिली पाहिजे. सर्व अविकसित देशांच्यामध्ये थोडेफार असेच झालेले आहे.

सगुण-निर्गुंणातला फरक कसा महत्त्वाचा आहे हे आपण कृपा करुन लक्षात घ्या. प्रत्येक मोठ्या शहरामध्ये आणि क-हाडसारख्या छोट्या शहरामध्ये झोपडपट्ट्यांची चर्चा आपण नेहमी करतो. झोपडपट्टीमध्ये घाण आहे, झोपडपट्टीमध्ये सर्व प्रकारचे सामाजिक दुर्गुण आहेत इत्यादि. आपण बोलत असतो. काही त्याच्यात सत्यांश असतो; काही काल्पनिक गोष्टी असतात. आज मुंबईसारख्या शहरामध्ये साठ लाख वस्ती जिथे झालेली आहे. त्या शहरामध्ये १० ते १२ लाख लोक झोपडपट्टीमध्ये किंवा फुटपाथवर राहातात ही वस्तुस्थिती आहे. आणि ही स्थिती कानपूर, मद्रास आणि दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरांमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हांला पाहयला मिळेल. ला आपल्याला असे विचारायचे आहे की ह्या गरीब देशामध्ये जे कोणी राज्यकर्ते असतील त्या राज्यकर्त्यांना ह्या परिस्थितीची काही बोच आणि जाण असेल तर किमान त्यांनी स्वत:च्या आचरणात तरी काहीतरी प्रत्यंतर आणून दिले पाहिजे की नाही? गांधी ज्या वेळेला दिल्लीमध्ये जाऊन भंगी कॉलनीमध्ये राहायचे तेव्हा ते काही थोतांड नव्हते. ते एक प्रकारचे आयडेंटीफिकेशन होते की मी या भंग्यांच्याकडे राहातो. गांधींनी तेव्हा सांगितले की भंग्याची मुलगी हिंदुस्थानचा राष्ट्राध्यक्ष झालेली पाहावी हे माझे स्वप्न आहे. नुसता भंगी नव्हे. भंगी हा तर समाजातला सगळ्यात उपेक्षित, आणि उपेक्षितांच्यातला उपेक्षित म्हणजे हिंदुस्थानातील स्त्री. तेव्हा भंग्याची मुलगी हिंदुस्थानचा राष्ट्राध्यक्ष झालेली मला पाहायची हे माझे स्वप्न आहे हे जे काही गांधी सांगत हे गांधी भंगी कॉलनीमध्ये रहात याला काहीतरी यथार्थता होती. हिंदुस्थानचे राष्ट्रपती दुर्देवाने आज ज्या व्हाईसरॉयच्या बंगल्यात राहातात. १६०० एकरांचे आवार आहे त्या बंगल्याचे आणि दुनियेतील बलाढ्य राष्ट्र असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईटहौसचे आवार साडेतीन एकरांपेक्षा जास्त नाही. सगुण-निर्गुणाचा हा मुद्दा आहे. एक दिवसात गरिबी दूर करता येत नाही. हा वादाचा मुद्दा नाही. पण गरिबी दूर करण्याचा ज्यांनी संकल्प केलेला आहे त्यांनी गरीबांच्या बरोबर एकरुप होण्याची काहीना काही पद्धती आणि मार्ग शोधून काढून तसे केल्याशिवाय गरीबांना त्यांच्यात काही पथ्य वाटणार नाही. गरिबी हटाव हे जर थोतांड व्हायचे नसेल तर याशिवाय अन्य मार्ग नाही ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या.समाजवादाच्या आशयाशी याचा संबंध जवळचा आहे. कारण सबंध अविकसित राष्ट्रांच्यामधून आज आपण असे पाहतो आहोत की नव्याने सत्ताधारी बनलेले लोक सर्वत्र भारतीय राज्यकर्त्यांचे प्रमाणेच साधारणत: वागत आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org