व्याख्यानमाला-१९७४-१९

व्याख्यान तिसरे - दिनांक : १२-३-१९७४

विषय - "अविकसित देशातील समाजवादाचे स्वरूप"

व्याख्याते - श्री. सदाशिव बागाईतकर, पुणे.

अध्यक्ष महाराज आणि उपस्थित बंधुभगिनी :

बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यातील आमचे जेष्ठ सहकारी, आजचे भारताचे अर्थमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जी व्याख्यानमाला सुरु केली आणि त्या निमित्ताने या ठिकाणी येऊन त्यांच्यासंबंधीच्या शुभेच्छा व्यक्त करण्याची संधी मला दिली त्याबद्दल नगरपालिकेचा मी आभारी आहे. आज श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या वयाला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अधिक उत्कर्ष लाभो, यश मिळो अशी शुभेच्छा व्यक्त करुन, त्यांचे आणि त्यांच्या पत्नी सौ. वेणूताई चव्हाण यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षीच्या भाषणांची ही जी पुस्तिका प्रसिद्ध झालेली आहे. त्याचे प्रकाशन मी सुरुवातीला करतो आणि नंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

आजच्या व्याख्यानाचा जो विषय मी घेतला आहे तो विषय आहे 'अविकसित देशातील समाजवादाचे स्वरुप' समाजवाद आणि समाजवादासंबंधीच्या भिन्नभिन्न मतप्रणाली यांच्या सूक्ष्म व सैद्धांतिक वादविवादात मी जात नाही, भारतासारख्या अविकसित देशाला सर्वार्थाने आपला कायापालट करायचा असेल, आर्थिक, सामाजिक असे जे प्रश्न आपल्यापुढे उभे आहेत त्यांतून जर मार्ग काढायचा असेल तर समाजवादाशिवाय तरणोपाय नाही. यासंबंधी देशातील बहुसंख्य जनतेमध्ये, विचारवंतांमध्ये व्यापक एकमत आहे असे आपण गृहित धरतो. एका अर्थाने हे वस्तुस्थितीला धरुन आहे. परंतु हा जो 'समाजवाद' आहे त्याचा नेमका आशय काय, त्याच्या प्रेरणा कोणत्या, तो कशा पद्धतीने प्रत्यक्षामध्ये येणार आहे हा प्रश्न आज मतैक्याचा राहिलेला नाही. तसा तो नसणे हेही स्वाभाविक आहे.

समाजवादाचा विचार ज्या युरोपमध्ये प्रथम प्रसृत झाला त्या युरोपमध्ये सुद्धा आपण असे पाहतो की समाजवादाची अनेक भिन्नभिन्न रुपे आज पुढे आली आहेत. रशियामध्ये राज्यक्रांती झाली आणि पहिले कम्युनिस्ट राष्ट्र जेव्हा निर्माण झाले, कम्युनिस्ट सरकार बनले त्यावेळेला असे मानण्यात आले होते की या विसाव्या शतकामध्ये जे मन्वंतर घडायचे आहे, जो नवा मनू निर्माण व्हायचा आहे, त्याची ही नांदी आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org