व्याख्यानमाला-१९७४-१७

या परिस्थितीने काय घडले? या परिस्थितीत दोन त-हेच्या लोकांनी फायदा घेतला. एक कम्युनिस्ट आणि दुसरा संधिसाधू. कम्युनिस्टांनी राष्ट्रीयीकरणावर भर दिला आणि राष्ट्राची प्रगती किती झाली याचे मोजमाप करायचे असेल तर किती सेक्टर राष्ट्राच्या मालकीचे केले यावर त्यांनी भर दिला. आणि यामध्ये कामगार जे मागेल ते दिले पाहिजे हा विचार आला आणि त्यांनी तसा आग्रह धरला. एकंदरीने कामगारांच्या अपेक्षा पु-या करणे याचे नाव रँडिकँरिझम्. हा प्रकार कम्युनिस्टांनी काँग्रेसमध्ये शिरल्यानंतर केला जे संधिसादू होते ते निव्वळ संधिसाधूच घोषणा केली की संपले का. उच्चरवाने जी काही विचार परंपरा असेल ती एकदा उभे राहून घोषणा केली झाले. प्रत्येक व्यवहारामध्ये घोषणा असे यामध्ये मूलभूत आहे आणि म्हणून फार अनर्थ होतो. यामुळे आपण वचनांची खैरात करतो. आपली परंपरा अशी आहे की मंत्रांच्या सामर्थ्यांवर आपला विश्वास आहे. आणि त्यामुळे या घोषणाबाजीचा सुकाळ होतो. लोकांना वचनांची खैरात दिली जाते. आणि शेवटी पूर्तता झाली नाही म्हणजे लोकांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वैफल्य निर्माण होते ही वस्तुस्थिती आहे. ( गुजरातमध्ये चिमणभाई स्वत:ला जहालांचा मुकुटमणी समजत असतो.) एकाधिकार खरेदीमध्ये विशेष क्रांतिकारक काही नाही. परंतु एकाधिकार खरेदीचा निर्णय घेत असताना सर्वांनी हात वर उचलला. परंतु त्याची जबाबदारी काय याचा विचार कोणी केला नाही आणि ती पार पाडली पाहिजे याची काळजी घेतली नाही. चिमणभाईनी खेडूत समाजाच्या बरोबर संगनमत केले. त्यांच्याकडून लेव्ही मिळणार नाही याची उत्तम व्यवस्था केली आणि आज ते आपल्या गुजराथ प्रांतात प्रांतीय पक्ष काडू इच्छितात. या माणसाचे इतके भयंकर परिवर्तन होऊ शकले. म्हणजे याचा अर्थ उघडउघड असा होतो की नागवी सत्तास्पर्धा करणारा परंतु समाजवादाचा बुरखा पांघरणारा गट काँग्रेसमध्ये आहे.

म्हणून समाजवाद हा नुसता घोषणाचा नाही त्याला मोठा शिस्त असावी लागते. फार मोठा त्याग करावा लागतो. फार कष्ट करावे लागतात. चर्चिल हा लोकप्रिय पंतप्रधान पण त्याने आश्वासने दिली नाहीत. तर त्याचे उलट लोकांकडे मागणी केली. तुम्ही मला रक्त द्या. निढळाचा घाम द्या. आणि अश्रू द्या. त्याने वचने दिली नाहीत. रशियामध्ये आर्थिक प्रगती सहजासहजी झाली नाही. चाळीस वर्षे त्यांनी कष्ट केले होते. चाळीस वर्षे त्या ठिकाणी कामगारांचे जीवन अतिशय कंगाल झाले होते. आज रशिया जो दिसतो त्याचे फळ रशियाने अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कष्टांत आहे. हिंदुस्थानला हे नको आहे. त्याग करायला नको आहे. कष्ट करायला नको आहे. चीनमध्ये काय घडले. चीनमधील पक्षीय संघटना अत्यंत मजबूत आहे, फार मोठ्या प्रमाणात शिस्त ते लावू शकतात. ते लोकांच्यामध्ये वजन टाकू शकतात आणि त्याबरोबर चीन हा एकजिनसी समाज आहे. आपल्या देशात तसे नाही. चीन वाटेल त्या कष्टाला, वाटेल त्या त्यागाला तयार आहे अगदी अतिशय थोड्या पगारावर ते गुजराण करु शकतात. आपला देश छिन्नविच्छिन्न झालेला आहे. याठिकाणी प्रांतीय वाद आहेत. जातीयवाद आहेत. एकजिनसी असा देश नाही. या देशाला समाजवादी शिस्त लावणे सोपे काम नाही.

पण ही गोष्ट घडली पाहिजे. नाहीतर आपल्या देशामध्ये समाजवाद येण्याची शक्यता नाही. म्हणून मला आपल्याला असे सांगायचे आहे की, अधिक कष्ट करा आणि नसत्या घोषणा करु नका. व्यवहारवाद अंग बाणायला पाहिजे. यशवंतराव हे नुसते पोथीनिष्ठ समाजवादी नाहीत. यशवंतरावाजींनी अनेक वेळा सांगितले आहे की मी व्यावहारिक समाजवादी आहे आणि पोथीनिष्ठ समाजवादाला बांध घालणारे असे जर कोणी दिल्लीमध्ये असतील तर ते यशवंतरावजी आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org