व्याख्यानमाला१९७३-८

गतिमान नेतृत्वाचं एक व्यवच्छेदक लक्षण कोणतं असेल तर समाजामध्ये वेळोवेळी नव्याने उद्यास येणा-या सामाजिक व आर्थिक शक्तींचा अन्वयार्थ लावणे, त्या शक्तीचं स्वरूप समजावून घेणे  आणि त्या कल्पनांच्या मध्ये ध्येय धोरणामध्ये बदल घडवून आणणं हे गतिमान नेतृत्वाचे वैशिष्ट्य असते. यशवंतरावांच्या जीवनाचा जर आपण अभ्यात केला तर मला असं वाटत त्यांच्या व्यक्तिमत्वामधील वेगळेपण हे दिसत आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या शक्ती होत्या त्यांचे स्वरूप त्यांनी समजावून घेतले आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जे जे काही शक्य होते ते दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्व प्रश्नांचे स्वरूप बदलून गेले आणि एक विकासाच्या काळाचं नवं, आव्हान पुढं येत असतं आणि ते ते प्रत्येक आव्हान समर्थपणे स्वीकारत ते पुढे चाललेले आहेत. त्यामुळेच त्यांचे जीवन हे एका दृष्टीने गतिमान नेतृत्व आहे. अशा एका नेतृत्वापासून प्रेरणा घेऊन आपण ही व्याख्यानमाला सुरू करता आहात त्याबद्दल मी आपणास अत्यंत अंत:करण पूर्वक धन्यवाद देतो. या व्याख्यान मालेच्याव्दारे आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये या मूलभूत प्रेरणांची उपासना होईल अशा त-हेची उमेद बाळगून मी माझ्या मुख्य विषयाकडे वळतो. माझा आजचा विषय आहे तो ‘भारतीय समाजवाद काही विचार’  असा आहे. हा  विषय मी मुद्दाम घेतलेला आहे. कारण दिवसातून जे शब्द वारंवार उच्चारले जातात त्यापैकी समाजवाद हा एक शब्द आहे. त्यामुळे या विषयाची या तत्त्वज्ञानाची एकदा शास्त्रीय पध्दतीने मीमांसा झाली पाहिजे म्हणून मी हा विषय घेतलेला आहे. त्याबरोबर दुसरी गोष्ट अशी की माझी श्रध्दा आहे की तीन मूलतत्त्वे ही आपणाला पुढील दशकामध्ये बळकट करावयाची आहेत. ही तत्त्वे म्हणजे- एक धर्मनिरपेक्ष राज्यांचं तत्त्व ज्यालां मी सिक्युलॅरिझम असे म्हणतो. दुसरे तत्त्व लोकशाही (Democracy) आणि तिसरे तत्त्व म्हणजे समाजवाद (Socialism) त्यामुळे पुढील दशकामध्ये धर्मनिरपेक्ष राज्याचं तत्त्व लोकशाही आणि समाजवाद या तीन मूल्यांची उपासना करून ही तीन मूल्ये आपल्या जीवनामध्ये बळकट करावयाची आहेत. याही दृष्टीने समाजावादी तत्त्वज्ञानाला एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि या दृष्टीने या संबंध तत्त्वज्ञानाचं गतिमान स्वरूप काय आहे, बदलतं स्वरूप काय आहे हे आपणाला समजावून घेण जरूरीचं आहे. माझ्या व्याख्यानाचं स्वरूप कसं असेल हे मला अगोदरच सांगितले पाहिजे. सगळ्या जगभर गेल्या १०-१५ वर्षामध्ये जी काही अत्यंत महत्वाची स्थित्यंतरे घडत आहेत त्यांची स्वरूपं समजावून घेणारी विकसनशील राष्ट्रे आहेत, त्याच्या मध्ये काय स्थित्यंतरे घडताहेत आणि हिदुस्थानसारख्या आशिया मधील राष्ट्रांमध्ये आपणाला नवी आव्हानं काय आहेत त्यांच्या स्वरूपासंबंधी ढोबळ मानानं माझ्या विवेचनांच स्वरूप राहीली. पहिली गोष्ट ही आहे की या मुलभूत कल्पना अत्यंत महत्वाच्या आहेत की ज्यामुळे जगाचा गेल्या १००/१५० , वर्षांचा इतिहास घडविला गेला आहे. या कल्पना म्हणजे समाजावाद, राष्ट्रवाद, साम्यवाद, व लोकशाही या होत. These are the ideas which influence the world.  या कल्पना अशा आहेत की त्यांनी सगळ्या जगाच्या इतिहासावर प्रभाव पाडलेला आहे. म्हणजे सबंध जगाची चेहरेपट्टी बदलून टाकली आहे. या तत्वज्ञानांनी या तत्वप्रणालीनी, या विचारांनी. समाजवाद हा एक त्यापैकीच विचार आहे. सगळ्याच कल्पनामध्यें १०/१५ वर्षामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. दुस-या महायुध्दानंतर बदल घडतो आहे. आणि गेल्या काही वर्षामध्ये फार मोठा बदल घडतो आहे. हा बदल अशा स्वरूपाचा आहे की, या सगळ्याच कल्पना समाजवाद, साम्यवाद (कम्युनिझन) राष्ट्रवाद, भांडवलशाही, लोकशाही आता एखाद्या वितळणा-या भांड्यात (Melting pot) ठेवाव्यात अशा स्वरूपाच्या झालेल्या आहेत. दुस-या महायुध्दा अगोदर त्यांच साचेबंद स्वरूप होतं आता बदलत चाललं आहे. त्यामुळे दुस-या महायुध्दाचे अगोदर या विचारांचा जो साचेबंदपणा होता तो आता नव्या स्वरूपात कालबाह्य होत चाललेला आहे. निरूपयोगी ठरत आहे. झपाट्याने बदल होत चाललेला आहे समाजवाद हा त्यापैकीच एक विचार आहे. त्यामध्ये फार झपाट्याने बदल होत आहे. मी फक्त दोन बदल तुम्हाला सांगतो व ते कसे होत गेले आहेत हेही सांगतो. युरोपमध्ये मुख्यत: औद्योगिक क्रांती आणि तंत्रविषयक क्रांती (Industrial Revolution and Technological Revolution.) यांच्यामुळे युरोप अमेरिकेमध्ये फार झपाट्याने बदल होत आहेत याचे कारण त्यांच्याकडील मोठमोठे विचारवंत हे होत. त्यानी गेल्या दहा वर्षांत Socialism च्या संदर्भात काही विचार मांडले आहेत. हे विचार जागतिक पातळीवर मांडले आहेत. त्या संदर्भात आपण विचार केला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org