व्याख्यानमाला१९७३-२४

संबंध समाजामध्येच या फुटीरतेची साथ फैलावली आहे. सर्वसामान्य लोकाना भांडणे नको असतात. कोणताही दंगा झाला की त्यात निरपराध गरीब लोकच बळी पडतात. सत्ताधारी वर्ग आपल्या स्वार्थासाठी लोकांच्या धर्मश्रध्देचा वापर करतात. त्यातून प्रश्न सुटत नाहीत म्हणून लोकांच्या मनावर ऐहिकनिष्ठ बुध्दिवादी विचार-सरणीचे संस्कार घडवून आणण्याचे कार्य कुणीतरी हाती घेतले पाहिजे यादृष्टीने सर्वात परिणामकारक साधन म्हणजे शिक्षण होय. पण इंग्रजांच्या काळापासून आपल्या देशात चालत आलेल्या शिक्षणपध्दतीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही अद्याप कांही मूलभूत झालेला नाही. तपशिलात थोडे फेरफार झाले असतील पण आपली मनोरचना. आपले संस्कार अजून जुनेच आहेत. सामाजिक समतेचा प्रश्न घ्या. सुशिक्षित माणसाच्या मनात सामाजिक विषमतेबद्दल चीड असली पाहिजे, पण तसे आज दिसून येत नाही. तंत्राविशारदांचा एक नवा वर्ग आपल्याकडे आज निर्माण होत आहे. तो समाज पराङमुख आहे. महिन्याला २००० रूपये पगार मिळाला म्हणजे झाले. समाज जाईनाका खड्ड्यात! अशी या लोकांची वृत्ती आहे. राजकारणाबद्दल त्यांना आस्था नाही उद्या कोणत्याही पक्षाचे राज्य आले तरी औद्योगिकरणासाठी तंत्रज्ञाची गरज भासणारच याबद्दल त्यांची खात्री आहे. त्यामुळे त्यांचे सामाजिक ऋणानुबंध सुटत जाऊन वृत्तीने ते उपरे बनत आहेत. त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. त्याना मराठी बोलता येत नाही, याचा आईवडीलांना अभिमान वाटतो. हा वर्ग बुध्दिमंतांचा आहे. पण त्यांच्या दृष्टीने शिक्षण हे व्यावसायिक उत्कर्षाचे एक साधन आहे;  कणखर ध्येयनिष्ठा देणारी, जीवन उजळून टाकणारी प्रेरणा नव्हे. परंपरा अजिबात टाकून द्यावी असे माझे म्हणणे नाही. परंपरेचा फास आपल्या मानगुटीला बसलेलाच आहे. तो सोडू म्हटले तरी सुटणार नाही. पण परंपरेचा व्यतिरिक्त गौरव नको. मात्र परंपरेशी विद्रोह करूनही उपयोग नाही. वस्तुनिष्ठ व विवेचक दृष्टीने आपल्या जुन्या वाङ्मयाचा परामर्ष घेण्यास आपण शिकले पाहिजे. ज्ञानेश्वरी घ्या, तुकारामाची गाथा घ्या. त्यात जातिभेद आहे, वर्णश्रमधर्म आहे अस्पृश्याला तुच्छ लेखले आहे. महिलांच्या दास्याला मान्यता आहे. म्हणून ते वाङ्मयच नामशेष करून कसे चालेल? ते विद्यापीठामध्ये ठेवू नका असेही लोकांचे म्हणणे आहे. ते बरोबर नाही ऐतिहासिक दृष्टीने विचार करण्यास आपण शिकले पाहिजे. पाश्चात्य देशातील प्लेटो आणि ऑरिस्टॉटल हे विचारवंतही त्यांच्या काळात गुलामगिरीची तरफदारीची करीत होते. खालच्या वर्गातील लोकांना तुच्छ लेखीत होते. म्हणून त्यांचे तत्त्वज्ञान युरोपीय लोकांनी फेकून दिले नाही. जुने वाङमय फेकून दिले म्हणून अंत:करणातील जुने संस्कार फेकले जात नाहीत. म्हणून जे कालबाह्य आहेत ते आपण त्याज्यच मानावे पण त्यातील चिरंतन अशाही टिकवून धरावी.

मी स्वत: आस्तिक नाही. पण मी ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेशेवराचे जे उतुँग व्यक्तिमत्त्व आहे तुकारामांच्या वाणीमध्ये रंजल्या गांजल्याविषयी जो कळवळा आहे. त्याचे मला आकर्षण वाटते. मात्र १९७३ साली तुकारामांचे तत्वज्ञान उपयोगी पडेल असे कोणी सांगू लागले, तर ते मी मानणार नाही गांधी नेहरूंचे तरी सर्वाच्या सर्व विचार मला कुठे पटतात. त्यांच्या काळात त्यांनी मोठी कामगिरी केली. पण आजचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे विचार पुरे पडणार नाहीत माणूस कितीही मोठा असला. तरी तो अपूर्णच असणार. त्याच्या विचाराला व कर्तृत्वाला कालाच्या नवबौध्द विद्यार्थ्यालाच ज्ञानेश्वर तुकारामाच्या वाङ्मयाचे रसग्रहण करता येईल. इतक्या व्यापक निरामय व वस्तुनिष्ठ दृष्टीने आपण इतिहासाकडे पाहू शकलो, तरच इतिहासाचा उपयोग होईल नाहीतर इतिहास शापच ठरेल.

सत्तेच्या राजकारणातून जीतिवादाचे पोषण होते हे खरे आहे पण तेवढ्यावरून सताच निषिध्द मानणे श्रेयस्कर नाही सत्ता हा शाप असता तर स्वराज्य मिळविण्याचा खटाटोप तरी आपण का केला असता ? मात्र सत्तास्पर्धेतही काही पथ्ये पाळली गेली पाहिजेत. ती पथ्ये आज कुठलाही पक्ष पाळताना दिसत नाही. आपण मुस्लीम लीगच्या नावे ओरडतो. पण लीगचे पुनरूज्जीवन कोणी केले ? डावे उजवे दोन्ही प्रकारचे पक्ष याला जबाबदार आहेत. कॉंग्रेसनेही वेळोवेळी लीगशी समझोता केला. सत्ताधारी पक्षाचे एक जाऊ द्या, पण क्रांतीचे निशाण घेऊन जे बाहेर पडले, त्यांनीही आपले साथीदार निवडताना तारतम्य बाळगले नाही. म्हणुनच संयुक्त आघाड्यांचे राजकारण अपेशी ठरले. क्रांती करण्याची आपणा सर्वांची इच्छा आहे, पण तिच्यासाठी आवश्यक असलेली तपस्या सातत्याने चालू ठेवण्याची आपली तयारी नाही. युरोपमध्ये जी सामाजिक क्रांती झाली तिची तयारी तीनचारशे वर्षे चालू होती. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना झगडा करावा लागला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org