व्याख्यानमाला१९७३-१८

मालक व मजूर यांच्यामधील तंटा सोडविताना जे समाजवादाचे ध्येय आपण स्वीकारले आहे त्याला अनुसरूनच निर्णय घ्यावे लागतील. जुन्या काळात आपल्या देशातील निरनिराळ्या जातींमधील संबंध उच्चनीचभावावर आधारलेले होते. आता ते समतेवर आधारले गेले पाहिजेत. धर्मभावना ही समतेच्या आड येता कामा नये. म्हणजेच कक्षा यापुढे ईश्वरोपासनेपुरतीच मर्यादित राहिली पाहिजे. जोपर्यत मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दल माणसाच्या मनात भय किंवा कुतूहल राहणारच. हे कुतूहल नाहिसे करण्याची कोणत्याही शास्त्रामध्ये ताकद नाही. मरणाबद्दलची ही चिंता, ही भीती माणसाच्या मनांत जोपर्यत कायम आहे, तोपर्यत मन:शांतीसाठी तो कोणतातरी एक उपासनामार्ग स्वीकारणारच. तो स्वीकारण्याचे त्याला स्वातंत्र्य असले पाहिजे. सेक्युलॅरिझमचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने नास्तिकच बनले पाहिजे. जो उपासनामार्ग प्रत्यकाला योग्य वाटेल तो त्याने पत्करावा. मात्र सामाजिक संबंधांतील धर्मसंस्थेचा प्रभाव शक्य तितक्या लवकर नाहीसा झाला पाहिजे. सामाजिक संबंधांचा विचार करण्यासाठी अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र अशी निरनिराळी शास्त्रे उद्यास आली आहेत. त्यासाठी मनुस्मृतीचा, शरीयतचा अथवा बायबलचा काही उपयोग नाही.

भारतातील प्रत्येक धर्माला स्वत:ची विशिष्ट अशा परंपरा आहे. आपले समग्र पारंपारिक जीवन धर्मावर अधिष्ठित आहे. आपण नव्या युगात आलो, नवे शिक्षण घेतले. म्हणजे आपला सर्व जीवनक्रम नव्या युगाशी सुसंगत झाला असे होत नाही. जुन्या परंपरेचे संस्कार आपल्यावर कायमच राहतात. प्रत्येक धर्माच्या बाबतीत ही पूर्वपरंपरा वेगवेगळी आहे; पण आधुनिक युगात सर्वाच्या आकांक्षा मात्र सारख्या आहेत. उच्च प्रतीचे राहणीमान, शिक्षण यांची सर्वानाच ओढ आहे. त्यामुळे सामाजिक जीवनात ताण निर्माण होतात. जातीय समस्या उत्पन्न होतात. जातिवाद हा आजच्या काळात निर्माण झालेला एक बिकट प्रश्न आहे. हा जातीवाद ऐहिकनिष्ठेच्या मूल्यांशी विसंगत आहे. भारतात मुसलमान ,ख्रिस्ती, पारशी अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. म्हणूनच केवळ आपण सेक्युलॅरिझमला मान्यता दिली असे नव्हे. भारतात फक्त हिंदु धर्मांचेच लोक असते, तरी या ऐहिकनिष्ठ जीवनदृष्टीची आपणास गरज असती, कारण ब्राह्यणेतर, स्पश्य-अस्पृश्य आदिवासी आणि नागर या गटांमध्ये जे संघर्ष निर्माण होतात, ते ही या आधुनीक मूल्यांचा स्वीकार केल्याखेरीज सुटणार नाहीत. पूर्वीच्याकाळी जातीजातीत तंटे होत नसतील असे नाही. पण पूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यांत जमीन अस्मानाचे अंतर आहे. ब्रिटिशपूर्वकाळात भारतात एक राष्ट्रीयत्वाची जाणीव नव्हती. मराठेशाहीत मराठी भाषेचा व महाराष्ट्रीयत्वाचा अभिमान थोडाफार जागृत होऊ लागला होता हे खरे. तरीही सबंध भारतातील आणि महाराष्ट्रातीलही लोकांच्या जीवनाचे मुख्य अधिष्ठान गाव किंवा जात हेच होते. शहरांची संख्या फार थोडी होती. राजकारण शहरापुरते मर्यादीत होते. म्हणूनच अनेक साम्राज्याचे उद्यांस्त होऊनही इंग्रज येईपर्यत गावगाडा आणि जातिव्यवस्था या संस्था अबाधित राहिल्या. मध्ययुगात आपला देश म्हणजे अनेक गावांचां एक समुच्चय होता. समाजालाही जातीच्या समुच्ययाचे स्वरूप होते. आपली सगळी अस्मिता गाव व जात यांच्याशी निगडित होती. अजूनसुध्दा तुम्ही खेड्यात गेलात व तेथील माणसाला तु कोण असे विचारलेत तर तो सांगेल की मी वारली आहे, ठाकूर आहे, लोहार आहे, चांभार आहे. भारतीय आहे, महाराष्ट्रीय आहे, हिंदू आहे  असे म्हणण्या ऐवजी पहिल्याप्रथम तो जातीची ओळख देतो. शहरातील सुशिक्षित माणसांमध्ये आपला गाववाला भेटल्यावर प्रेमाचा जो उमाळा येतो, तो या संस्काराचाच अवशेष आहे इंग्रजांच्या आगमनापूर्वी भारतात अनेक लहानमोठी राज्ये नांदत होती. त्यांनी एकत्र येऊन कधीही परकीय आक्रमणाचा प्रतिकार केला नाही. परकीयांनी एक राज्य खालसा केले, तरी दुसरे राज्य निर्धास्त असे. इतकेच नव्हे तर आपल्या शेजा-याला नामोहरम करताना ते परकीयाना कधीकधी मदत करी. आज जिला आपण राष्ट्रीय एकात्मता म्हणतो ती कल्पना त्याकाळी अस्तित्वात नव्हती. पाश्चात्य विध्येचे संस्कार आणि इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य यांमधून भारतात एकराष्ट्रीयत्वाचा प्रादुर्भाव झाला. जुन्या काळी खेड्यातील लोकाना राजकारणात फारसा रस नव्हता. शेतसारा दिला की त्यांचे काम संपले. आपला राजा हिंदू आहे की मुसलमान आहे याची ते फिकीर करीत नसत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org