व्याख्यानमाला१९७३-१६

व्याख्यान तिसरे - दिनांक : १४-३-१९७३

विषय- “ भारतीय राष्ट्रवाद आणि ऐहिकनिष्ठ ”

व्याख्याते - प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार, पुणे.

नगराध्यक्ष श्री. पी. डी. पाटील, श्री. शंकरराव करंबेळकर आणि बंधुभगिनीनो. प्रथमता: केळकर जन्मशताव्दीच्या निमित्त येथे आयोजित केलेल्या निबंधस्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थानी पारितोषिके मिळविली, त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. माननीय यशवंतराव चव्हाण यांचा वाढिवसाच्या निमित्ताने आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. हा उपक्रम मला स्वत:ला अतिशय औचित्यपूर्ण असा वाटतो. भारतातील आजच्या मान्यवर राजकीय नेत्यांमध्ये तात्त्विक विचारांबद्दल ज्यांना अत्यंत खोल आणि उत्कट अशी आस्था आहे अशा नेत्यांपैकी मा. यशवंतराव हे एक आहेत. तेव्हा त्यांचा गौरव करण्याच्या दृष्टीने जी काही योजना करावयाची, तिच्यामध्ये ज्ञानप्रसाराला आणि विचारमंथनाला महत्वाचे स्थान असणे नि:संशय आवश्यक आहे. आपले राष्ट्र सध्या एका कठीण अशा परिस्थितीतुन जात आहे. त्यादृष्टीने पुढील पाचदहा वर्षे फार महत्वाची आहेत. या दहावर्षात आपल्या समाजाला वेगवेगळ्या दिशांनी वळण लावण्याचे जे प्रयत्न होतील, त्यावर  आपल्या राष्ट्राची प्रगती आणि येथील लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे. आजच्या व्याख्यानासाठी ‘भारतीय राष्ट्रवाद आणि ऐहिकनिष्ठा’ हा विषय मी बुध्दि पुर:सर निवडलेला आहे. हा विषय केवळ चर्चेचा नाही. आपल्या राष्ट्रीय जीवनाशी त्याचा खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपासून आपल्या नेत्यांनी जो ध्येयवाद मनोमन स्वीकारला तो आता आपल्या राष्ट्राच्या घटनेमध्ये अंतर्भूत झाला आहे. तो साकार व्हावयाचा असेल, तर प्रस्तुत विषयावर सखोल चिंतन व चर्चा करून आपणांस काही निर्णय घ्यावे लागताल. हा विषय फार कठीण. गुंतागुंतीचा  आणि वादग्रस् आहे. त्याबाबत मतभेद होणे स्वाभाविक आहे. त्यासंबंधी जे विचार मी आपल्या समोर मांडणार आहे, ते आपल्या लगेच मान्य झाले पाहिजेत असा माझा आग्रह नाही. हे केवळ एक प्रगट चिंतन आहे. एकमेकांशी संवाद साधण्याची ही धडपड आहे. म्हणून वस्तुनिष्ठ दृष्टीने विचार करून माझी जी मते बनली आहेत, ती मी आज प्रांजलपणे आपल्यासमोर ठेवणार आहे.

आज आपल्या अशा फुटीरपणाची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. प्रांतीयता, जातीयता, संकुचित धर्मिनिष्ठा अशा रा्ट्रविघातक जाणिवांना ऊत आला आहे. यामधून आपले राष्ट्र बलवान आणि ऐश्वर्तसंपन्न होणार नाही . उलट आपली लोकशी या संकुचित जाणिवांच्या योगे धोक्यात येईल. केवळ ऐहिकनिष्ठेची मी आज चर्चा करणार नाही. ‘ भारतीय राष्ट्रवाद आणि ऐहिकनिष्ठा, हा आजचा माझा विषय आहे. या दोन्ही संकल्पनांचा आशय प्रथम स्पष्टपणे समजून घेतला पाहिजे ही आधुनिक काळात सर्वत्र स्थिरावलेली अशी एक युगकल्पना आहे. आंतरराष्ट्रवादाचा तोंडाने सतत उद्घोष करणारे रशिया आणि चीन यांच्यासारखे देश घेतले, तरी प्रत्यक्षात त्यांची धोरणे राष्ट्रवादीच  असतात सामूहिक जीवनात प्रत्येक माणसाला अनेक वेगवेगळे ऋणानुबंध असतात, निरनिराळ्या निष्ठा असतात. प्रत्येक मनुष्य एकाचवेळी कुटुंब, जात, गाव, प्रांत, धर्म या सर्वांचा घटक असतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org