इंग्लंडमध्ये जो बदल होतो आहे तो असा की गेल्या १०,१२, वर्षात समाजवाद म्हणजे राष्ट्रीयीकरण ही कल्पना च्यवछेदक लक्षण मानली जाते समाजवादाचे वेगळेपण जर काय असेल तर उत्पादनांची साधने राष्ट्राच्या मालकीची असतात. आज इंग्लंडमध्ये गेल्या कांही वर्षामध्ये राष्ट्रीयीकरणासंबंधी असलेला उत्साहाचा लोंढा आज ओसरत चाललेला आहे. किंबहुना संबंध जगभर, पश्चिम जगामध्ये हा झपाट्याने ओसरत चाललेला आहे. त्याच्याकडील लेखवाचले, त्याच्याकडील ग्रंथ वाचले, त्यांच्याकडील विचारवंताशी चर्चा केली तर तु्म्हास असे आढळून येईल की १९४५ साली दुस-या महायुध्दानंतर राष्ट्रीयीकरणासंबंधीचा त्यांच्याजवळ जो उत्साह होता तो आता १९७३ साली राहिलेला नाही. इंग्लडमधील मजूर पक्षाचे निवडणुकांचे जाहीरनामे जर तुम्ही घेतलेत तर १९४५ साली राष्ट्रीयीकरणाच्या कल्पनांनी ते भारावलेले होते. जगातल्या सगळ्या प्रश्नांवर एकच तोडगा आहे. आणि तो म्हणजे राष्ट्रीयीकरण, अशा श्रध्देने त्यांनी आपला जाहीरनामा तयार केलेला होता. आता गेल्या दोन निवडणुकाचा जहीरनामा तुम्ही तर वाचला तर त्यांत राष्ट्रीयीकरणाचा कोठे उल्लेखही नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीयीकरणाचा चुकूनही उल्लेख नाही. हा जो बदल मजूरपक्षाच्या धोरणात झालेला आहे हा सुध्दा त्यांच्या तत्त्वप्रणालीचा प्रवाह आहे. त्यामध्येही दोन प्रवाह आहेत. Future of Socialism या नावाची त्यांची काही पुस्तके आहेत त्यांमधून मजूर पक्षामध्ये जे काही चिंतन चालू आहे ज्या काही प्रतिक्रिया चालू आहेत ते तुम्हाला पहायला मिळेल. राष्ट्रीयीकरणासंबंधीचा जो उत्साह ओसरत चालला आहे, त्याचं कारण ते असं म्हणताहेत की ज्या ज्या धंद्याचं राष्ट्रीयीकरण केलं त्या त्या धंद्याचं उत्पादन खाली गेलं, गुणवत्ता खाली खाली गेली व Administration वरील खर्च वाढत गेला आणि नफा त्यामध्येच जिरून गेला. राष्ट्रीयीकरणाच्यामागील कल्पना काय असते की करोडो रूपये जे भांडवलदारांच्या खिशात जातात ते राष्ट्राच्या मालकीचे करायचे. त्याच करोडो रूपयांतून गरीब माणसाच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना घ्यायच्या, कोठे गलिच्छ वस्ती निर्मूलनाचे कार्य हाती घेतील. कोठे मुलांना दूध देण्याचे कार्य हाती घेतील. गरीब माणसाच्या विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या योजना असतील त्या त्या घ्यायच्या हा राष्ट्रीयीकरणामागील मुख्य हेतू होय. परंतु प्रत्यक्षात अनुभव मात्र असा यायला लागला की, उत्पादन खाली खाली येत चालले, गुणवत्ता खाली येत चालली, खर्च वाढत गेला, व त्यामुळे नफा जिरून गेला आणि काही काही वेळेला होणारे तोटे भरून काढण्यासाठी गरीब माणसावर कर लादून ते धंदे तोट्यात चालवावयाचे. असा अनुभव इंग्लडमध्ये यायला लागल्याबरोबर ते असं म्हणू लागले की आम्हाला राष्ट्रायीकरणाबद्दल पूर्वी जे वाटत होते ते आता वाटत नाही आता त्यांचे असे सिध्दांत येत चाललेले आहेत की मालकी हक्क बदलणे म्हणजे मूलभूत क्रांती नव्हे “ Change of ownership is not basic Revolution” त्यांचेकडे मोठमोठे विचारवंत आहेत ‘ Future of Socialism या नावाचं पुस्तक लिहिणारा एक विचारवंत आहे त्याच्यामध्ये त्यानी असं म्हटलं आहे की मालकी हक्क बदलणे ही फार मोठी क्रांती नव्हे. गरीब माणसाच्या जीवनात सुख निर्माण करणे ही मूलभूत क्रांती होय. दारिद्र्य हटविणे. गरीब माणसाच्या जीवनात काही आकांक्षा निर्माण करणे हा मुलभूत बदल आहे. तुम्ही केवळ मालकी हक्क बदलण्याच्या कल्पनेमध्ये समाधान मानत असाल व त्यामध्येच मशगुल राहिला असाल तर तुम्ही मुलभूत उद्दिष्टापासून दूर राहिलेले आहात असा त्याचा अर्थ होईल. अशा त-हेचे चिंतन आज मजूर पक्षात चालू आहे. फ्रन्समध्ये चालू आहे. स्कॉंन्डेनेव्हीयन कंट्रीजमध्ये आहे नार्वे, स्वीडन, डेन्मार्क येथे चालु आहे. हे मी तुम्हाला अशासाठी सांगतो आहे की जगातील इतर भागांत समाजवादासंबंधी काय चिंतन चालू आहे, काय विचारप्रवाह चालू आहेत याचा अपणाला तोंड परिचय व्हावा. मी फार खोलात जाऊन या प्रश्नाची चर्चा करू शकत नाही. पण फक्त मी अंगुली निर्देश करतो आहे की बदल काय काय होताहेत आणि त्या दृष्टीने माझा सांगण्याचा हेतू एवढाच की परंपरागत कल्पनामध्ये गेल्या १०|१५ वर्षात दुत-या महायुध्दानंतर आणि विशेषत: आशियाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे बदल होताहेत. ज्या परंपरागत कल्पना आहेत त्या आपणाला जशाच्या तशा स्वीकारता येणार नाहीत. त्या पुन्हा पुन्हा तपासल्या पाहिजेत. युरोपात समाजवाद, आणि आशियातला समाजवाद यामध्ये २-३ महत्त्वाचे फरक वाटतात युरोपातील समाजवाद हा तिकडे औद्योगिक क्रांतीनंतर आला. औद्योगिक क्रांती नंतर त्याची राष्ट्रसंपत्ती अनेक पटीने वाढल्यानंतर त्यांच्याकडे समाजवाद आला. तेव्हा त्या समाजवादा समोरचा जो मुख्य प्रश्न होता, जे आव्हान होते ते हे की, या वाढलेल्या संपत्तीचं विभाजन करणे, न्याय्य वाटप करणे Equitable distribution करणं हा होता. आणि त्यांचां राष्ट्रीय संपत्ती पूर्वी पेक्षा ३०,४०,५० पट वाढलेली होती. ज्या राष्ट्रांची संपत्ती औद्योगिक क्रांतीपूर्वी १ कोटी होती, १०० कोटी होती, ती औद्योदिक क्रांतीनंतर ३ हजार ४ हजार कोटी अशी वाढली आहे. अर्थात ही संपत्तीं मूठभर लोकांच्या हातातच केंद्रित झाली होती ही गोष्ट खरी आहे.