यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-मंत्रालयातील वर्षे-ch १७-३

यशवंतराव हे स्वतः शासकीय प्रशासनाचं पावित्र्य मानणार्‍यांपैकी होते.  प्रशासनातील जे काही चांगले आहे, हितकारक आहे, ते जपले पाहिजे, असे ते मानीत असत.  परंतु असे असले तरीही राजकारण आणि समाजकारणातील अनुभवी माणसं आणि प्रशासनकार्यातील कार्यकुशल व्यक्तींच्या विचारांकडेच त्यांचा कल अधिक होता.  ते सतत सनदी अधिकार्‍यांपुढे कारभाराच्या एकूण पद्धतीबद्दल सदैव आपली मते आणि विचार प्रत्यक्षपणे मांडत असत, आपल्या नवीन धोरणाबद्दल आग्रह धरीत असत आणि प्रसंगी अशा अधिकार्‍यांची मते पूर्णतः झुगारीत असत.  आवश्यक वाटले तर त्याला दटावण्याच्या बाबतीतही मागेपुढे पाहात नसत.  क्वचित प्रसंगी सनदी अधिकार्‍याच्या हटवादीपणाने किंवा हेकेखोरपणाने ते इतके जेरीस येत असत की, शेवटी राग अनावर झाल्याचे वरकरणी दाखवून नंतर त्या अधिकार्‍याला त्याचं नेमकं कुठे चुकतं आहे हे पटवून देत असत.  परंतु असे असले तरीही सनदी अधिकार्‍यांशी असलेले आपले स्नेहाचे संबंध त्यांनी कधीच तोडले नाहीत.  त्यांच्याबद्दल हृदयात नेहमीच आदरभाव आणि प्रेम त्यांनी कायम राखले होते.

कै. चव्हाण यांचे विचार नेहमी मोठे असायचे परंतु त्यात वादळीपण नसायचे.  त्यांची कल्पनाशक्ती उदंड असली तरीही ती हिंसक नसायची.  त्यांच्या कल्पनेला व्यवहाराची किनार असायची तर त्यांच्या विचारात आणि आचारात मात्र कल्पकता आणि योजकता असायची.  नेहरूंच्या जवळ असलेली स्वप्नं पाहण्याची कल्पकता त्यांच्याजवळ निश्चित नव्हती.  नेहरूंची कल्पकता ही परतत्त्वाने भारलेली असल्याने ती पृथ्वीवर आकारूच शकत नसे, तर ती अंतराळातच जमिनीपासून वर धुमारत असे.  पण यशवंतरावांच्या बाबतीत परिस्थिती अगदी उलट होती.  त्यांच्याजवळ कल्पकता असली तरीही त्यांचे पाय मातीत घट्ट रुतले होते आणि या पायांची पकड अशी घट्ट होती की, इतर सर्वसामान्य माणसाच्या पायापेक्षा त्यांच्या पाऊलखुणा वेगळ्या उमटत गेल्या.  मातीशी नातं सांगण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व इतरेजनांपेक्षा उंच होत गेलं होतं.  नभाला झाकळून टाकणारं हे व्यक्तिमत्त्व नसलं तरीही ते ज्या ज्या क्षेत्रात वावरले त्या त्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यात सर्वांना स्तंभित केले होते.  महाराष्ट्राचे नेतृत्व करीत असताना त्यांचा सहवास लाभलेली जी अनेक माणसे आहेत त्यांपैकी मी एक आहे.  या सर्व माणसांना यशवंतरावांचा सहवास आणि त्यांच्या बरोबर केलेले जे कार्य होते त्यापासून निश्चितपणे एक आगळा आनंद होता.  त्यामुळेच त्यांच्याबद्दल आम्हा सर्व मंडळींना नेहमी कृतज्ञता वाटत आली.

श्री. विनोदराव
(लोकराज्य, मार्च ८५)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org