यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-मंत्रालयातील वर्षे-ch १७

१७. भास्करराव सोमण  ( माजी नौदलप्रमुख )

मंत्री म्हणून त्यांचा, आमच्या कामात कधीच हस्तक्षेप नव्हता

यशवंतरावजी संरक्षणमंत्री असताना मी नौदलाचा प्रमुख होतो.  त्या काळात यशवंतरावांच्या स्वभावाचे दर्शन घडलं त्याची मला जाणवलेली विशेषतः म्हणजे ते कुठलाही गंभीर प्रश्न समोर ठाकला तरी 'अस्वस्थ' होत नसत.  शांतपणे तो प्रश्न सोडवण्याचा विचार करत.

ते मंत्री आणि आम्ही प्रत्यक्ष काम करणारे प्रमुख या आमच्या नात्यात तर त्यांच्या सभ्य व्यक्तिमत्त्वाची छटाच पदोपदी जाणवली.  ते कधीही, मंत्री असूनही आमच्या निर्णयात हस्तक्षेप करत नसत.  एखादं खात्यांतर्गत काम व्हावं, अशी त्यांची जरी इच्छा असली, ते काम आमच्या अखत्यारीत शक्य नसेल आणि म्हणून आम्ही जर त्यांच्या 'कामाला' 'नको' म्हटलं तर ते सक्ती करत नसत.  'मंत्री' म्हणून स्वतःच्या अधिकारात परस्पर करू शकण्याच्या कामांबाबत परस्पर घेऊ शकण्याच्या आदेशांबाबत, ते आम्हा दलप्रमुखांचा सल्ला घेत.  ते आमच्या सूचना कधीही धुडकावत नसत.  आमचं सर्व म्हणणं शांतपणे ऐकून घेत.  चिनी आक्रमणानंतर आम्ही दलप्रमुख आपआपल्या मागण्या मांडत असू.  मी नौदलाचा प्रमुख होतो  त्याच बरोबर तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या समितीचाही प्रमुख होतो.  साहजिकच समितीचा प्रमुख म्हणून, मी माझ्या नौदलाच्या मागण्यांना शेवटच्या क्रमाने प्राधान्य ठेवत असे.  वाय. बी. म्हणाले की तुमच्या स्वतःच्या नौदलाचं प्रपोजल जे आहे, त्याला तुम्ही प्राधान्य का देत नाही ? मी त्यांना म्हणालो की, साहेब माझ्या 'समितिप्रमुख' या नव्या जबाबदारीत, मी माझ्या दलाचं घोडं दामटणं, मला बरं वाटत नाही आणि चीन-पाकिस्तानच्या बाबतीत नौदलापेक्षा 'वायुदलाचं' महत्त्व जास्त आहे.  मला प्रॉयॉरिटी समजते.  मी माझ्या खात्यात यामुळे जर अप्रिय झालो तर मी तोंड द्यायला तयार आहे.  माझं म्हणणं साहेबांनी शांतपणे ऐकून घेतलं.  पुन्हा कधीही हा विषय काढला नाही.  त्यांच्या बरोबर काम करताना कधीच अडचण येत नसे.  कारण ते परस्परात सुसंवाद उत्तम राखीत.

आम्हा दल-प्रमुखांवर 'वाय.बी.' चा संपूर्ण भरवसा होता.  १९६५ च्या पाकिस्तान युद्धाच्या वेळी खूप अफवा उठत.  आम्ही 'आ, डोंट वरी' म्हटलं की ते विश्वास ठेवत.  त्या काळात अशीच एक अफवा उठली की शत्रुपक्षाचं विमान आपल्या भागात उतरवतायत.  त्यांचा रात्री अर्ध्या तासात फोन आला.  मला म्हणाले, तुम्ही काय करणार ?  मी उत्तरलो, ''मी शांतपणे झोपणार आहे.  ह्या सार्‍या अफवा आहेत, घाबरण्याचं कारण नाही.''  सकाळी उजाडल्यावर आमची मीटिंग होती.  मीटिंगमध्ये 'वाय.बी.' नी पहिला प्रश्न केला, ''सोमण, झोप कशी लागली ?''  रात्रीच्या अस्वस्थ काळातल्या माझ्या फोनवरील उत्तरावरची त्यांची ही दिलखुलास 'प्रतिक्रिया' आमच्यावरचा विश्वास दाखवणारीच होती.

त्यांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या काळातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे 'संरक्षण योजना' (डीफेन्स प्लॅन).  या योजनेबाबत त्यांचे मार्गदर्शन खूप झालं.  या योजनेनुसार चिनी आक्रमणानंतर लगेच ठरवण्यात आलं की, तिन्ही दलांचं एकत्र को-ऑर्डिनेशन हवे.  'वुई वर्क ऑन इट वुई प्रोडयूस ए प्लॅन.'  रोज परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचं ठरवलं गेलं.  आमच्या निर्णयावर वाय. बी. पूर्ण विश्वास ठेवत.  आत्मविश्वास बाळगत.

युद्धकाळात वा एरवीही, काय झालं तर काय करायचं, त्याबाबत तिन्ही दलांनी संयुक्त विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.  याबाबतीतलं 'वाय.बीं.'चं मार्गदर्शन मोलाचं म्हणता येईल.

शब्दांकन :  सुधीर गाडगीळ

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org