यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-मंत्रालयातील वर्षे-ch १६-१

संरक्षण विभागातर्फे आलेले रिपोर्ट, लहान मोठा बातम्या, प्रसिद्ध झालेली पुस्तके, आम्ही तयार केलेले ब्रीफ्स यांचा ते जाणीवपूर्वक अभ्यास आणि वापर करीत.  काही वेळेस लोकसभेत संरक्षण खात्यासंदर्भात प्रश्नोत्तरे होत.  आवश्यक असणारी सर्व माहिती आमच्याकडून घेऊन त्याचा वापर करून ते प्रश्नांना अगदी यथार्थ उत्तर देण्यात वाकबगार, निष्णात होते.  युद्ध आणि निरनिराळ्या देशांत प्रसिद्ध झालेली संरक्षणाविषयीची पुस्तके वाचण्याचा त्यांचा छंद सर्वश्रुत आहेच.  जगातील युद्धआघाडीवर कोणकोणत्या घटना झाल्या व त्यातून काय घेण्यासारखे आहे याचे चिंतन यशवंतरावांमध्ये सातत्याने चाललेले असे.

वागण्यात, बोलण्यात यशवंतराव ''थरो जंटलमन'' होते.  त्यांच्या आपुलकीने तिन्ही संरक्षणदलांचे प्रमुख, उच्चाधिकारी, सचिव यांच्यातील परस्पर सामंजस्य आणि एकसूत्रीपणा लक्षणीय प्रमाणात वाढलेला होता.  सर्वांगीण स्वरूपात आत्मविश्वास निश्चितच मोठ्या प्रकर्षाने वाढल्याचे जाणवून येत होते.  प्रथम सेनादल त्याला जास्तीत जास्त सहायक ठरणारे वायुदल यांच्यात सुधारणा, आधुनिकीकरण, अद्ययावतता येण्यासाठी यशवंतराव अर्थातच जास्त सखोल लक्ष देत असत.  त्या काळात नौदलाकडे आपपरभावाने वागणूक दिली जात आहे असा गैरसमज निर्माण न होण्यात यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा, संपर्काचा, घटना हाताळण्याचा फार यशस्वी वाटा श्री. राव यांनी निदर्शनास आणला.  संख्येने कमी असले तरी गुणात्मक मोजपट्टीनुसार भारतीय नौदल कार्यक्षम करण्याचे प्रकल्प यशवंतरावांनीच सुचविले होते.  त्या पाणबुड्यांचा समावेश, डीप सी डीलिंग, ऑईल एक्सप्लोरेशन वगैरेंचा उल्लेख करता येईल.

यशवंतरावांच्या समवेत तब्बल चार वर्षे सल्लामसलत, कार्य करताना फार महतत्वाचे, अद्वितीय प्रसंग घडले नाहीत असे नव्हे असे सांगण्याचा स्पष्टवत्तेफ्पणा श्री. रावांनी केला व अर्थात मला तो आवडलाही.  एखाद्या मोठ्या व्यक्तीची उगाचच जवळीक निर्माण करणे, व्यक्तिमाहात्म्य वाढविणे, तात्काळ हात जोडण्याची मनोवृत्ती मला राव यांच्यात आढळली नाही.

मुलाखतीच्या अखेरच्या टप्प्यात श्री. राव म्हणाले, ''स्वतंत्र बुद्धिमत्ता आणि तिचा व्यावहारिक वापर करणारे असे फारच थोडे मंत्री असतात.  अशा मंत्र्यांच्या यादीत यशवंतरावांचा नंबर खूपच वरचा आहे.''  विचारांशी प्रामाणिक, वर्तमानकाळाची गरज आणि निकट भविष्यकाळातील मागणी हे विचारात घेऊन त्यांनी संरक्षणमंत्रिपद यशस्वीपणे सांभाळले.  घेतलेल्या निर्णयाशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही किंबहुना तसा प्रसंगच निर्माण झाला नाही.  भारतीय जनतेची शक्ती आणि तिच्याशी बांधिलकी यांचा त्यांना कधीच विसर पडला नाही.  त्यांचे  पाय जमिनीत पक्के झाले होते.  त्यामुळे अर्थातच आत्मविश्वासाला कधीच तडा गेला नाही.  साधी, पूर्ण विचारांती, आणि झटकन निर्णय घेण्याची त्यांची कुशलता अनेक वेळा प्रकट झाली.  भारत देशावर चिनी आक्रमणाने आलेले सावट दूर करण्यात यशवंतरावांची संरक्षणमंत्री म्हणून झालेली कारकीर्द निश्चित स्वरूपात नोंदविली जाईल.

बोलण्यात जितके मृदू तितकेच निर्णयात कठोर, जिद्दीने, प्रसंगावधानाने परिस्थितीचा ताबा घेण्याचा आवाका आणि चिरकाल लक्षात राहण्यासारखा सच्छील प्रामाणिकपणाचा गुणात्मक संगम यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता.  तो जवळून पाहण्याचा मला अनुभव आला हे श्री. राव यांचे समाधान.  

शब्दांकन :  अनिल दांडेकर

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org