यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch ९-३

आणीबाणीच्या काळात यशवंतरावजींना पुन्हा एकदा चांगली संधी प्राप्‍त झाली होती.  मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता इतका मूलभूत निर्णय घेतल्यानंतर त्याला सनदशीर विरोध करणे आणि त्या मुद्द्यावर मंत्रिमंडळापासून अलग होणे निश्चित शक्य होते.  त्या वेळी धावत गाडीतून खाली उडी मारण्यास यशवंतरावजी तयार झाले नाहीत.  परंतु १९७७ च्या निवडणुका पुकारल्यानंतर जगजीवनरामप्रमाणे जनता पक्षाबरोबर सहकार्य करण्याची भूमिका यशवंतरावजींना घेता आली असती.  तसे झाले असते तर काळाच्या ओघात पंतप्रधान होण्याचा मान यशवंतरावजींना निश्चित मिळू शकला असता.  त्यानंतर इंदिरा काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर जनता पक्षाचे शासन अडचणीत असताना यशवंतरावजींनी सहकार्याची भूमिका घेतली असती अथवा विरोधी पक्ष नेता म्हणून इंदिराजींपुढे मान तुकवण्याऐवजी खंबीरपणे काम केले असते तर पुढील काळात सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन पंतप्रधानकीकडे वाटचाल करणे शक्य झाले असते.  त्यासाठी लागणारी हिंमत व निर्धार यशवंतरावजींनी केव्हाच दाखवला नाही.  त्याऐवजी काँग्रेस प्रवेशासाठी महिनो न् महिने रांगेत उभे राहणे त्यांनी अधिक पसंत केले.  या भूमिकेमुळेच यशवंतरावजींचे नव्हे तर सर्व देशाचे व लोकशाहीचे नुकसान झाले असे मला वाटते.  त्या काळात झालेल्या मानहानीमुळे यशवंतरावांच्या कारकीर्दीला कायमचा डाग लागला.  

यशवंतरावजींच्या सोयीच्या राजनीतीऐवजी तत्त्वज्ञानावर आधारित वचनपूर्तीचे राजकारण करावे असा माझा आग्रह होता.  किंबहुना त्यावरच त्यांचे माझे तीव्र मतभेद झाले.  राजकीय दृष्ट्या आम्ही दूर गेलो.  हे खरे असले तरी यशवंतरावजींच्या अंगी कित्येक मौलिक गुण होते.  मानवतेवर आणि मानवतावादावर त्यांची श्रद्धा होती.  त्यांचा वाचनाचा व्यासंग गाढा होता.  संगीत, साहित्य, नाट्यकला, शिक्षण यांचे ते चहाते होते.  आजारी असतानाही जीवनभर वेणूताईंवर यशवंतरावांनी केलेले नितांत प्रेम म्हणजे एक महाकाव्यच होते.  कार्यकर्त्यांची त्यांना जाण होती.  समाजातील सर्व थरांतील व्यक्तींशी त्यांची जवळीक होती.  त्यामुळेच कामगादर, पददलित, साहित्यिक, कलाकार, कारखानदार, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अधिकारी, कार्यकर्ते, नेते आदी सर्वांच्याच मनात भावनाप्रधान यशवंतरावजींविषयी नेहमीच आदराची भावना होती आणि अद्यापही तीच भावना कायम आहे.  

यशवंतरावजी व वेणूताई आणि माझ्या सर्व कुटुंबाचे आपुलकीचे व प्रेमाचे नाते होते.  माझ्या राजकीय जीवनात यशवंतरावजींनी दिलली साथ मी केव्हाही विसरू शकणार नाही.  दिल्ली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे यशवंतरावजी अध्यक्ष होते.  १९७७ साली त्यांना मंत्रिपदापासून दूर व्हावे लागले.  सर्वसाधारणपणे मध्यवर्ती शासनातील कॅबिनेट दर्जाचा मंत्री संस्थेचा अध्यक्ष असे.  यशवंतरावजींनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मला संस्थेचे अध्यक्ष करावे असे सुचवले.  त्याप्रमाणे संस्थेचे कार्यकर्ते, मी संस्थेचा अध्यक्ष व्हावे अशी विनंती करण्यासाठी माझ्याकडे आले.  मी त्यांची विनंती अमान्य केली.  ''यशवंतरावजी मंत्री नसले तरी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत.  तेच अध्यक्ष राहतील व मी चेअरमन म्हणून काम करीन.''  असे मी निक्षून सांगितले.  त्यानुसार व्यवस्था करण्याचे ठरले आणि यशवंतरावजींचा राजीनामा परत करण्यात आला.  त्या वेळी यशवंतरावजींना भेटण्यासाठी मी गेलो होतो.  वेणूताईही उपस्थित होत्या.  घटना साधी होती परंतु यशवंतरावजींच्या डोळ्यांत आलेले पाणी मी पाहिले.  माझ्या मनाचीही कालवाकालव झाली.  आम्ही अधिकच जवळ खेचलो गेलो.  जनता राजवटीत मंत्रिपदावर असताना आम्ही सर्वजण वेळोवेळी भेटत होतो.  एकत्र कॉफीपान करताना अथवा जेवताना जीवाभावाच्या गोष्टी मोकळेपणे बोलत होतो.  त्या काळातही कळत नकळत आमच्या मित्रत्वाचे वस्त्र अधिक मजबूत व सुंदर बनत गेले.

डॉ. विक्रम चव्हाण व वेणूताईंच्या निधनानंतर यशवंतरावजी खूपच खचले.  त्या जबरदस्त तडाख्याने दिलेल्या आघातामधून यशवंतरावजी केव्हाही बाहेर पडू शकले नाहीत.  त्यांच्या जीवनातील संध्यासमयीचा तो काळ त्यांना व सर्वांनाच वेदना देणारा ठरला.  इंदिराजींच्या निर्घृण हत्येनंतर यशवंतरावजी अधिकच व्यथित झाले आणि त्या हळव्या बेसावध अवस्थेतच चपळ काळाने त्यांच्यावर अखेरची झेप घेतली.  महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आणि घराघरांत आदरणीय ठरलेल्या त्या महान नेत्याला काळाने दुसर्‍या विश्वात खेचून नेले.  महाराष्ट्राच्या कीर्तिमंदिराचे छप्परच कोसळून खाली यावे असा सर्वत्र भास झाला.  त्या शोकसागरात अवघा महाराष्ट्र बुडून गेला.  ते स्वाभाविकच होते.  कारण छत्रपती शिवाजीमहाराजानंतर महाराष्ट्राला तसेच महाराष्ट्रातील बहुजन व पददलित समाजाला एवढे भव्य नेतृत्व केव्हाही लाभले नव्हते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org