यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch ९-२

गृहमंत्री, अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्री म्हणून यशवंतरावजींनी चांगल्या प्रकारे कार्य केले असले तरी संरक्षणमंत्रिपदासारखे उठावदार कार्य ते केव्हाही दाखवू शकले नाहीत.  गृहमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांच्या सर्व निर्णयांची समर्थपणे मल्लीनाथी करण्याचे कार्य यशवंतरावजींनी कुशलतेने केले.  मात्र त्या काळात स्वतःची वेगळी छाप ते केव्हाही पाडू शकले नाहीत.  ठिकठिकाणी राष्ट्रपतींची राजवट लागू केल्यानंतर संसदेच्या सभागृहात जी चर्चा चालत असे त्यामध्ये घटनेचा सोइस्कर अर्थ लावण्याची संसदपटूता यशवंतरावजींनी जरूर दाखवली.  परंतु ते कार्य एखाद्या वकिलासारखे होते.  कित्येक प्रकरणी स्वतःच्या मनाविरुद्ध त्यांना वकिली करावी लागत होती हे मी जवळून पाहिले आहे.  संस्थानिकांचे तनखे आणि सवलती रद्द करण्याचा निर्णय माझी उपसूचना मान्य करून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने घेतली.  गृहमंत्री म्हणून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यशवंतरावजींवर आली.  त्या कामी सर्व अधिकार काँग्रेस संघटनेने दिलेले असतानाही संस्थानिकांचा वापर आपल्या राजकारणासाठी करण्याचा जो प्रयत्‍न इंदिराजींनी केला त्याला विरोध करण्याचे सामर्थ्य यशवंतरावांनी केव्हाही दाखवले नाही.  उलट भरपूर नुकसानभरपाई देण्यास मान्यता देऊन ज्या उद्देशाने संस्थानिकांचे तनखे व सवलती रद्द करण्याचा निर्णय झाला त्याची पायमल्ली करण्यालाच त्यांचे हातभार लागले.

अर्थमंत्री या नात्याने यशवंतरावजी यांची कारकीर्द प्रभावी ठरली नाही.  देशाच्या आर्थिक धोरणांना नवी दिशा देण्याचे सामर्थ्य अर्थमंत्र्याच्या हाती असते.  त्या दृष्टीने विचार करताना काँग्रेसने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आर्थिक धोरणांमध्ये धडाडीचा पुरोगामी बदल यशवंतरावजी केव्हाही करू शकले नाहीत.  हाताखालील नोकरशाहीने पंतप्रधानांच्या सचिवालयाच्या आदेशानुसार निर्णय घ्यावे आणि त्याचा पाठपुरावा आणि समर्थन करावे यापलीकडे यशवंतरावजी जाऊ शकले नाहीत.  सुशिक्षित बेरोजगारांची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रीयीकृत बँकांनी ठोस पुढाकार घ्यावा असे मी सुचवले होते.  बँकेच्या प्रत्येक शाखेने दरमहा किमान दोन सुशिक्षित बेकारांना स्वयंरोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभे करावे अशी माझी सूचना होती.  खिरापतीसारखे पैशाचे वाटप बँकांनी करू नये, मात्र बेकार तरुणांना मार्गदर्शन करून पैसे परत करू शकतील असे छोटे व्यवसाय करण्यासाठी व स्वतःचे पायावर उभे करण्यासाठी त्यांना मदत करावी अशी व्यवहार्य योजना होती.  यशवंतरावजी अर्थमंत्री होते तेव्हा देशामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३० हजार शाखा होत्या.  माझ्या सूचनेची अंमलबजावणी व्यवस्थित झाली असती तर दरमहा ६० हजार तरुणांना अथवा प्रतिवर्षी ७ लाखापेक्षा अधिक तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे शक्य होते.  माझ्या सूचनेवर चर्चा करण्यासाठी बँकेच्या अध्यक्षांच्या एका बैठकीमध्ये यशवंरतावजींनी मला बोलावले होते.  सिंडिकेट बँकेसारख्या काही राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षांनी माझी सूचना उचलून धरली.  बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांनी ती अंमलात आणण्याचा निर्धार व्यक्त केला.  अशा प्रकारे पाठिंबा मिळत असतानाही बँकांना तसा आदेश देण्यास यशवंतरावजी अथवा रिझर्व बँक तयार झाली नाही.  सामाजिक व आर्थिक बदलासाठी थोडा फार धोका पत्करून खंबीर व निर्धारपूर्वक भूमिका घेणे आवश्यक असते.  त्याखेरीज सामाजिक व आर्थिक परिवर्तन होण्याची सुतराम शक्यता नाही.  तशा प्रकारचा ठोस निर्णय घेण्याचे कार्य अर्थमंत्री या नात्याने यशवंतरावजी केव्हाही करू शकले नाहीत.  गरिबीत जन्माला आलेला व गरिबीची जाण असलेला नेता संधी मिळाली असतानाही गरिबीविरोधी लढाईमध्ये अग्रभागी राहून खंबीरपणे लढला नाही ही जाणवी नेहमीच क्लेश देऊन जाते.  

यशवंतरावांची परराष्ट्रमंत्रिपदाची कादकीर्द मध्यवर्ती शासनातील त्यांच्या सर्व कारकीर्दीमध्ये सर्वांत कमी प्रतीची ठरली.  परराष्ट्र मंत्रालयातील कॅबिनेट दर्जाच्या चेअरमनच्या नेतृत्वाखाली काम करणारे फॉरेन पॉलिसी कमिशन आणि पंतप्रधान इंदिरा गांधींचे सचिवालय यांच्या मार्फत ते खाते चालविले जात होते.  त्या सर्व काळात यशवंतरावजी केवळ नामधारी परराष्ट्रमंत्री होते.  त्यातच आणीबाणी पुकारली गेली आणि त्या निर्णयाचे समर्थन करण्याची पाळी यशवंतरावजींवर आली.  मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि संरक्षणमंत्री म्हणून देशाच्या अस्मितेला साज चढविणारा नेता आणीबाणीच्या काळात अगदी निस्तेज ठरला.  इंदिराजींनी जी लाचारांची फौज निर्माण केली तिच्या अग्रभागी राहण्याचा दारुण प्रसंग जगजीवनराम व यशवंतराव यांच्यासारख्या धुरंधर नेत्यांवर आला आणि खुर्चीसाठी त्यांनी आपली मान खाली झुकवून प्रत्यक्ष लाचारीलाच कुर्निसात केला.

उभा महाराष्ट्र यशवंतरावजींबरोबर होता.  त्याचबरोबर मुख्यमंत्रिपद व संरक्षण मंत्रिपदाचे यशस्वी वलय त्यांचे भोवती होते.  तरीही यशवंतरावजी भारतीय सरकारचे केवळ मंत्री म्हणून वावरले.  सर्व भारताचे लोकनेतृत्व ते केव्हाही करू शकले नाहीत.  पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काँग्रेसमधील पुरोगामी शक्तीचे नेतृत्व करण्याची सुसंधी यशवंतरावजींना मिळाली होती.  आम्हा सर्व तरुण मित्रांचा तो आग्रह होता.  हा आग्रह त्यांच्यापर्यंत पाहोचवण्याचे काम मी स्वतःच केले होते.  दुदै्रवाने आपल्या सत्तेला धोका निर्माण होईल असे कोणतेही पाऊल उचलण्यास यशवंतरावजी तयार नव्हते.  ''सत्तेवर राहून सर्वसामान्य समाजाचे जितके भले करता येईल ते सर्व मी करीन परंतु सत्तेला धोका निर्माण होईल असे कोणतेही काम मी करू शकणार नाही'' ही यशवंतरावजींची सरळ भूमिका होती.  साहजिकच आणीबाणीचया काळात धावत्या रेल्वेतून उडी घेण्याऐवजी त्या रेल्वेबरोबरच जाणे अधिक पसंत केले.  त्या उलट इंदिराजींनी पडेल तो धोका पत्करण्याचे मान्य केले.  म्हणूनच आम्ही सर्व मित्रांनी त्यांना साथ देण्याचे ठरविले.  काँग्रेसमध्ये आम्हा तरुण मित्रांची शक्ती हळूहळू वाढत असली तरी त्या वेळी काँग्रेसमधील एस. के. पाटील, अतुल्य घोष, मोरारजीभाई आदी नेत्यांबरोबर समर्थ मुकाबला करण्यासाठी तितक्याच तोलाच्या नेत्यांची आम्हाला गरज होती.  ते नेतृत्व देण्यास यशवंतरावजी तयार झाले असते तर इंदिरा गांधींऐवजी त्यांचेच नाव आम्हाला अधिक जवळचे होते.  त्यांनी नकार दिल्यामुळेच आम्हाला इंदिराजींना पाठिंबा द्यावा लागला.  यशवंतरावजींनी मान्यता दिली असती तर काळाच्या ओघात ते या देशाचे पंतप्रधान झाले असते आणि भारतीय राजकारणाला चांगले वळण लागले असते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org