यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch ८-१

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तात्त्वि दृष्टीने गांधीजींच्यापेक्षा काहीसा निराळा ठसा उमटविण्याचा प्रयत्‍न केला.  त्यांची प्रेरणा समाजवादाकडे झुकणारी होती आणि आधी सांगितल्याप्रमाणे रशियन राज्यक्रांतीने त्यांच्या विचारांना काहीसे ठाम रूप दिले.  त्यांच्या भाषणात आणि लेखनात हळूहळू असा विचार डोकावू लागला की, परकीय सत्तेचे उच्चाटन करणे हे ठीक आहे.  पण गोर्‍यांची सत्ता गेली आणि तिच्या जागी देशी सत्ता आली एवढाच स्वातंत्र्याचा अर्थ होणार आहे काय.  त्यांनी 'व्हिदर इंडिया' हे एक छोटेखानी पुस्तक लिहिले आणि त्यात स्वराज्यानंतर कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि त्यात श्रमजीवी जनतेच्या हितसंबंधाना कोणत्या प्रकारचे संरक्षण दिले गेले पाहिजे याची चर्चा केली.  यशवंतरावांच्या राजकीय भूमिकेला कलाटणी देणारे हे बालबोध धडेच होते असे म्हणता येईल.  त्या वेळी त्यांचे कॉलेजातील शिक्षण चालू होते आणि त्याच वेळी राजकीय शिक्षणाचेही त्यांना बाळकडू पाजले जात होते.  या राजकीय शिक्षणाचा पाया गांधीजींना घातला.  त्याचा विकास नेहरूंनी घडविला.

पण या शिक्षणाला परिपक्वता एम. एन. रॉय यांच्या विचारांनी आणली, निदान आणावयाचा प्रयत्‍न केला असे म्हणणे अधिक संयुक्तिक होईल.  रॉय यांची विचारसरणी निखालस कम्युनिस्ट पंथाची होती.  कम्युनिस्ट इंटरनॅशनल या संघटनेने पूर्वेकडील विभागाचे प्रमुख म्हणूनच त्यांची नेमणूक केली होती.  त्यांचे कार्य अर्थातच प्रामुख्याने भारतामध्ये कम्युनिझमचा प्रचार करणे हे होते.  पुढील काळात पूर्वेकडील भारत व चीन या दोन खंडप्राय देशातील क्रांतीला चालना देण्याचेच कार्य त्यांनी केले.  रॉय यांनी कम्युनिसट इंटरनॅशनलच्या दुसर्‍या अधिवेशनात जो प्रबंध सादर केला होता त्यात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या बाबतीत कम्युनिस्टांनी कोणती भूमिका घ्यावी यालाच त्यांनी प्राधान्य दिले होते.  त्यांच्या विचारांचा दुवा यशवंतरावांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांशी जुळला याचे कारण असे होते की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व काँग्रेस या संस्थेनेच आपल्या हाती ठेवले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.  साम्राज्यशाही विरोधी लढ्याचे साधन म्हणूनच त्यांनी काँग्रेसची निवड केली होती.  रॉय यांच्या मागे वलय होते ते रशियन राज्यक्रांतीचे.  त्यापूर्वीचा त्यांचा जीवनेतिहासही तसाच स्फूर्तिदायक होता.  कारण पहिल्या महायुद्धात ब्रिटिश साम्राज्यशाहीला शह देण्यासाठी क्रांतिकारकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जर्मनीशी संगनमत करण्याचा प्रयत्‍न केला होता.  जर्मन शस्त्रास्त्रांच्या साहाय्याने भारतात बंड घडविण्याची या क्रांतिकारकांची योजना होती.  ती अयशस्वी झाल्यानंतरचे रॉय यांनी मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून रशियन राज्यक्रांतीच्या माहेरघरी म्हणजे मॉस्कोमध्ये पाऊल टाकले होते.  तेथूनच नंतर ते भारतातील क्रांतीचे कम्युनिस्ट मतांनुसार मार्गदर्शन करू पाहात होते.  यशवंतराव यांच्यासारख्या संस्कारक्षम तरुणावर या विचारसरणीचा प्रभाव पडला असल्यास नवल नाही.  रॉय हे त्या सुमारास गुप्‍त रीतीने अनेक पत्रके आणि जाहीरनामे प्रसृत करीत होते.  पण त्यांच्या भारताबद्दलच्या सुस्पष्ट भूमिकेचे दिग्दर्शन करणारे जे एक पुस्तक    या नावाने त्यांनी प्रकाशित केले होते ते यशवंतरावांच्या वाचनात आल्यानंतर यशवंतरावांच्या भूमिकेला निराळीच दिशा मिळाल्याशिवाय राहिली नाही.  

अर्थातच त्या काळचा विचार केला तर हे सारे विचारमंथनच होते.  एकीकडे गांधीवादी विचारसरणी, त्यानंतर समाजवादाकडे झुकलेली जवाहरलाल नेहरूंची विचारसरणी आणि त्याच्याही पुढे जाणारी रॉय यांची विचारसरणी यांच्यामधील एक प्रकारचा संघर्ष, आणि कधी कधी समन्वय यांचा प्रत्यय त्या काळच्या यशवंतरावांच्या जीवनात दिसून येतो.  गांधीजी आणि रॉय यांच्यामध्ये उघड उघड वैचारिक संघर्ष होता.  त्याच्या उलट गांधीजी गांधीजी व जवाहरलाल यांच्या विचारसरणीत फरक असला तरी समन्वयाच्याच भावनेने ते परस्परांशी वागत असलेले दिसून आले.  तशाच प्रकारचा समन्वय जवाहरलाल व रॉय यांच्याही आचारविचारात दिसून येत असे.  यशवंतरावांचे राजकीय जीवन या छायाप्रकाशाच्या, संघर्ष समन्वयाच्या प्रवाहातून वाहात असलेले ठायीठायी आढळून आले आहे.  या तीन प्रकारच्या वारशातून ते समृद्धही झाले असे म्हणावयास हरकत नाही.

एका परीने यशवंतराव व जवाहरलाल यांच्या राजकीय जीवनात बरेचसे साम्य दिसून येते.  अर्थात यशवंतरावांनी खरेखुरे गुरुस्थानी पंडित नेहरूंनाच मानले असल्यामुळे त्यांच्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचीच यशवंतरावांची प्रवृत्ती दिसून आली.  या प्रवृत्तीचे मोठ्या अभिमानाने कौतुक करीत असताना यशवंतरावांनी वेळोवेळी जाहीर केले की ''राष्ट्रीय प्रवाहापासून मी कधीच फारकत करून घेणार  नाही.''  त्यांच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीलाच ते मानीत असलेला राष्ट्रीय प्रवाह आणि रॉय यांच्या विचारसरणीचा प्रवाह यात निवड करण्याची त्यांच्यावर वेळ आली.  त्यांच्या राष्ट्रीय प्रवाह हे गांधी नेहरूंच्या नेतृत्वाखाली संघटित होणारे काँग्रेसचे राजकारण होते.  या राजकारणाला शह देऊ पाहणार्‍या कार्यक्रमाचा रॉय यांनी १९३६ साली तुरुंगातून सुटल्यानंतर पुरस्कार करावयाला सुरुवात केली.  रॉय हे काँग्रेसमध्येच सामील झाले होते.  पण काँग्रेसचे स्वरूप अधिक लढाऊ बनावे, काँग्रेसचा कार्यक्रम खराखुरा साम्राज्यशाही विरोधी बनावा, त्या कार्यक्रमात साम्राज्यशाहीबरोबर होणार्‍या तडजोडीला स्थान राहू नये असा रॉय यांचा आग्रह होता.  गांधीजींचे नकारात्मक आणि हृदयपरिवर्तनाचे राजकारण रॉय यांना मान्य नव्हते.  म्हणून काँग्रेसमध्येच राहून तिचे नेतृत्व बदलण्याचा विचार त्यांनी उघडपणे जाहीर करावयाला सुरुवात केली होती.  साहजिकच गांधीजी की रॉय अशी निवड करावयाची काँग्रेसजनांवर वेळ आली.  रॉय यांनी महाराष्ट्रामध्ये त्यातल्यात्यात चांगले पाय रोवले होते आणि सातारा जिल्ह्यात तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, आत्मारामबापू पाटील, भय्याशास्त्री वाटवे, ह. रा. महाजनी यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी रॉय यांच्या बाजूने त्या वेळी आपला कौल दिला होता.  यशवंतराव चव्हाण यांचे हे सारे मित्र आणि विशेषतः तर्कतीर्थ हे त्यांनी गुरुस्थानी मानले असल्यामुळे रॉयपंथाच्या तेही बरेच जवळ आले होते.  एम.एन.रॉय यांच्याविषयी तर त्यांच्या मनात विलक्षण आदरभावच नव्हे तर भक्तिभावही निर्माण झाला होता आणि पुढेही सत्तास्थानी आरूढ झाल्यानंतरही तो तसूभरही कमी झाला नाही याची मी निःशंकपणाने ग्वाही देऊ शकतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org