यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch १२-६

'तो' निर्णय यशवंतरावांच्या घरीच झाला !

१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात विजय संपादन करताच यशवंतरावांच्या युद्धकुशल यद्धनेतृत्वाचे एक आगळे दर्शन भारतवासीयांना घडले.  चव्हाणांच्या भोवती कीर्तिवलय तयार झालेले असतानाच पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथे अकस्मात निधन झाले.

पंतप्रधानपद रिकाम झाले.  पंतप्रधानपदासाठी रीतसर निवड करावी लागणार होती.  त्यामुळे दरम्यानच्या काळासाठी हे पद श्री. गुलझारीलाल नंदा यांच्याकडे सोपविण्यात आले.  पं. नेहरूंच्या निधनानंतर त्यांनी असेच हे पद स्वीकारले होते.

नव्या पंतप्रधानाची रीतसर निवड करण्याचे मनसुबे सुरू होताच दिल्लीत काँग्रेसपक्षांतर्गत चलबिचल सुरू झाली.  दिवस उलटेल तशी हवा तापू लागली.  दिल्लीत ज्याला अनुकूल निर्णय करून घ्यायचा असतो त्याला आपल्या पाठीशी भक्कम-लॉबी उभी करावी लागते.  उत्त प्रदेशचे खासदार ज्या लॉबीत असतील ती लॉबी भक्कम हा दिल्लीचा परंपरागत शिरस्ता.  कारण त्या प्रदेशचे खासदार संख्येने सर्वाधिक.  ते वळतील तिकडे बिहार आणि उत्तर भारतातले बहुसंख्य खासदार वळतात.

मोठा बाका प्रसंग निर्माण झाला.  शास्त्रीजींच्या मंत्रिमंडळात दुसर्‍या क्रमांकाचा दर्जा न मिळाल्यामुळे मोरारजी देसाई रुष्ट होते.  बिहारच्या दिल्लीतील लॉबीने जगजीवनराम यांच्या नावाची दवंडी पिटली होती.  यशवंतरावांची भूमिका काय, यावर अंदाज व्यक्त होऊ लागले होते.  वृत्तपत्रांना रोज नवा मसाला मिळत राहिला.

निवडणुकीचा दिवस जवळ येत चालला त्याबरोबर खलबतखाने सुरू झाले.  टेहळणी पथकाच्या भेटीसाठी, त्यातून अंदाज घेऊन डावपेचांची आखणी, शत्रु-मित्रांची बेरीज-वजाबाकी, दिशाभुलीचं तंत्र या सर्वांना जोर चढला.

यशवंतराव शांत होते.  काहींनी त्याचा अर्थ ते दबा धरून बसले आहेत असा केला.  त्यांचा अंदाज घेण्यासाठी खासदारांची ये-जा सुरू होती.  ते कोणता पवित्रा घेणार आहेत याबद्दल त्यांच्या मनाचा ठाव कोणालाच लागत नव्हता.  त्यावरूनही तर्कवितर्क केले जात होते.

वस्तुस्थिती अशी होती की, निवडणुकीतील उमेदवार निश्चित करण्याचा अखेरचा टप्पा आला असताना यशवंतरावांचे निवासस्थान हे गुप्‍त खलबतखान्याचे प्रमुख केंद्र बदलं होतं.  त्या अखेरच्या चार-पाच दिवसांत, रोज रात्री ८॥ वाजता सी. सुब्रह्मण्यम, इंदिरा गांधी आणि अशोक मेहता यशवंतरावांच्या १ रेसकोर्स रोड, या कोठीवर मौजूद असत.  रात्री ९॥ पर्यंत, म्हणजे एक तासभर मंडळी खलबतखान्यात असत.  रात्री ८ नंतर यशवंतरावांकडील अन्य रहदारी बंद असायची.  स्वीय सचिव श्रीपाद डोंगरे यांचा त्याविषयी अगदी कटाक्ष.

खलबतखान्यातील मंडळी पांगली आणि आमचे (डोंगरे आणि मी) प्रश्नांकित चेहरे पाहिले की यशवंतरावांचं उत्तर, 'पाहू या, चर्चा चाललीय....!'

त्या दिवशी असेच आम्ही बंगल्यात गेलो.  यशवंतराव भोजनगृहात पोहोचले होते.  आम्हाला पाहताच यशवंतराव शांतपणानं उद्‍गारले- ''इंदिराजी''.  ''बरं झालं...'' वेणूताईंचा अभिप्राय.

हा ऐतिहासिक निर्णय यशवंतरावांच्या निवासस्थानीच झाल्यानं उत्सुकता संपली.

- रामभाऊ जोशी

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org