यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch १२-५

गोळवलकर गुरुजींशी विचारविमर्श

लोकमान्य टिळकांचे व्यवहारी राजकारणांतील सूत्र होते 'साधनानाम् अनेकता' आणि त्या सूत्राबरहुकूम व्यवहार भारताच्या राजधानीत कै. श्री. यशवंतरावजी व रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री. गुरुजी (मा. स. गोळवलकर) यांच्याद्वारे सुमारे सहा वर्षेपर्यंत (१९६३ ते १९६९) घडून येत होता.  परस्पर विश्वासाने या कालखंडात दोघेही अनेक प्रसंगी भेटून विचारविमर्श करीत असत.  श्री. यशवंतरावजींची राजकीय विचासरणी ज्ञात असूनही या भेटी ज्या वेळी होत त्या वेळी रा. स्व. संघातील आपल्या सहकारी कार्यकर्त्यांना या भेटीमागील हेतू विशद करताना श्री. गुरुजी सांगत असत की, देशाचे संरक्षण व आंतरिक सुरक्षा व व्यवस्था हे दोन्ही राष्ट्रजीवनाचे पैलू पक्षातीत भूमिकेवरूनच विचारात घेतले गेले पाहिजेत.  तेव्हा राजकीय मतमतांतरे दूर ठेवून संरक्षणमंत्री (वा केंद्रीय गृहमंत्री) श्री. चव्हाण यांना भेटून, त्यांचे कानी आपले भारतभ्रमणातील निरीक्षण व अनुभव घालणे हे आवश्यकच आहे.  उचित वाटल्यास त्यांनी या माहितीचा उपयोग प्रशासनासाठी करून घ्यावा.  कारण राष्ट्रजीवनाचे हे दोन्ही पैलू नित्य विशुद्ध राष्ट्रवारी भूमिकेवरूनच साकल्याने विचाराधीन राहिले पाहिजेत.

श्री. गुरुजींची ही जी भूमिका होती तिचा आदर करीतच कै. यशवंतरावजी त्यांना भेटण्यासाठी नेहमी सिद्ध असत; उत्सुक असत.  शिवाय या भेटीगाठी वा हा विचारविमर्श नेहमीच अनौपचारिक स्वरूपाचा असल्याने 'प्रकाशनार्थ' (पब्लिसिटी) नसे.  त्यामुळे बोलणेही मनमोकळेपणी व आवश्यकतेनुसार अगदी अवघ्या दहा मिनिटांपासून तो कधी तासभरही होत असे, आणि त्याची वाच्यता उभयपक्षी कोठेही होत नसे.  कारण 'राष्ट्रहित' सर्वोपरि हेच सूत्र या व्यवहारात अनुस्यूत असे !

या परस्पर विश्वासाचा प्रारंभ मुंबईस मुख्यमंत्री म्हणून श्री. यशवंतरावजी वावरत होते त्याच वेळी झालेला होता.  त्या कालखंडातच एका अनौपचारिक गप्पागोष्टींच्या ओघात श्री. गुरुजींनी भविष्यवाणी केल्यागत मुख्यमंत्र्यांना सांगितले होते की, आपणाला लौकरच दिल्लीस जावे लागेल !  पुढे तसेच घडल्याने श्री. यशवंतरावजींची स्वाभाविकच श्री. गुरुजींच्याकडे श्रद्धायुक्त भावनेने पाहण्याची रीत झालेली होती.

ना. बा. लेले

पं. नेहरू आणि यशवंतराव

''पंडितजींनी मला फार जिव्हाळ्याने वागवलंय'' एकदम त्यांना (यशवंतरावांना) काही तरी आठवलं, ते म्हणाले, ''रणजित, मी एकच आठवण सांगतो; मी त्या वेळी डिफेन्स मिनिस्टर होतो.  पण त्या खात्याचा एक सैन्यप्रमुख सदैव विरोध करीत असे.  त्यामुळे मी त्रासलो होतो.  आणि त्या त्रासातच एके दिवशी नेहरूंच्या नावे मी माझ्या संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा खरडला आणि तो नेहरूंच्या हाती जाण्याची व्यवस्था केली.  नेहरूंनी मला रात्री नऊ वाजता बोलाविलं मला वाटलं, पंडितजी आता राजीनामा स्वीकारणार.  मी त्या तयारीनंच तिथे गेलो आणि नेहरूंच्या भेटीला जात असताना लिफ्ट मध्येच बंद पडली.  अर्धा पिंजरा मजल्यावर, अर्धा खाली अशा अवस्थेत मी अडकलो.  पळापळ सुरू झाली.  पंडितजींना हे कळलं.  ते धावत खालच्या मजल्यावर आले मी पंडितजींना पाहात होतो आणि पंडितजी मोठ्यामोठ्यानं हसत होते.  पंडितजींना मी एवढ्या मोठ्यानं हसताना कधीच पाहिलं नाही.  सेवक पळत होते.  शेवटी एकदाची लिफ्ट सुरू झाली.  पंडितजी आणि मी त्यांच्या चेंबरमध्ये गेलो.  काही क्षणापूर्वी मला लिफ्टमध्ये अडकलेला पाहून खळखळून हसणारे पंडितजी, त्यांनी दरवाजा बंद केला.  त्यांच्या चेहर्‍यावरचं हास्य लोपलं.  गुलाबासारखा चेहरा सूर्यबिंबासारखा लाल झाला.  आपल्या शेरवानीच्या खिशातून माझ्या राजीनाम्याचा कागद माझ्या तोंडासमोर फडफडवत ते म्हणाले, ''ये क्या बदतमीजी है, ये क्या करते हो ।  मला राजीनामा पाठवतोस !''  कशासाठी ते मी त्यांना सांगितले.  ते हसून म्हणाले, ''मूर्ख आहेस.  तो ऑफिसर आहे ना.  जो त्रास देतो आहे त्याला संरक्षणमंत्री व्हायचं होतं.  म्हणून मी त्याला तुझ्या हाताखाली घातलं.  तू मला सांगितलं असतंस तर मी सारं निभावून नेलं असतं.  पण यापुढे असा राजीनामा पाठविण्याचा खुळेपणा करू नकोस.  त्यांनी तो राजीनामा माझ्यादेखत टराटरा फाडला आणि माझ्या तोंडावर फेकून ते म्हणाले, 'पुन्हा असा मूर्खपणा करू नको.''' असे होते पंडितजी.

श्री. रणजित देसाई
'लोकराज्य'

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org