यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २८

२८. साहित्यिकाबद्दल आस्था (आनंद यादव)

विद्यार्थी झाल्यापासून यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा मनावर उमटला होता.  हे व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहिले होते ते प्रामुख्याने त्यांच्या वक्तृत्वाने.  सातारा जिल्ह्यात त्यांची खूप भाषणं ऐकली.  विद्वत्तपूर्ण, आक्रमक, पल्लेदार अशी कोणतीही ''भाषणबाजी'' न करता यशवंतराव खास स्वतःच्या शैलीत बोलत.  हे बोलणे बहुजनांचेच पण त्यातही वेगळे असे होते.  ज्ञानेश्वर जर गद्यात बोलले असते तर ते जसे झाले असते तसे यशवंतरावांचे मृदू बोलणे होते.  मृदू बोलणारी माणसे कधी आग ओकणारे बोलत नाहीत.  ती दुसर्‍याला समजून घेत घेत दुसर्‍याला आपले म्हणणे समजून देत असतात.  कारण मुळातच ही माणसे संवेदनाशील असतात, भावनाप्रधान असतात - यशवंतराव तसे होते.  त्यांचे ज्ञान चौफेर होते पण त्याचे त्यांनी कधी ''डोस'' पाजले नाहीत.  शांतचित्ताने, एकचित्ताने ते दुसर्‍याचे जे ऐकत तेच त्यांच्या वाणीतून प्रगट रूप घेई.  हे करताना महाराष्ट्र दुभंगणार नाही याची ते काळजी घेत.  म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरूंप्रमाणे त्यांची गुणग्राहकवृत्ती ठेवली आणि महाराष्ट्राला एका उच्च स्थानावर नेऊन ठेवले.

त्यांचे साहित्याबद्दलचे प्रेमही त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे.  सुमारे पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी माझी ''गोतावळा'' कादंबरी वाचली होती आणि तीवर ते खूष होते, हे मला नंतर निर्मलकुमार फडकुले यांच्याकडून कळले होते. फडकुलेंकडे माझी चौकशी करत त्यांनी तेव्हा एकच मार्मिक आणि नेमका प्रश्न विचारला होता, ''गोतावळा''तील भाषा मराठी रसिकांना मान्य होईल का पण ?  राजकारणात अखंड मग्न असतानाही साहित्य-प्रवाहाकडे त्यांचे किती सुक्ष्म लक्ष होते !  त्याच वेळी त्यांनी येथून पुढे बहुजनांच्या भाषेला महत्त्व येणार आहे याचे समाधान व्यक्त केले होते.

साहित्याप्रमाणे साहित्यिकांबद्दलही त्यांना आस्था होती.  रणजित देसाई, ना. सी. फडके, वि.स.खांडेकर, यांचे सारे साहित्य त्यांनी अभ्यासू वृत्तीने वाचले होते आणि त्या त्या लेखकांशी चर्चाही केली होती.  साहित्यिकांबद्दल आदर बाळगण्यात.  त्यांचा सन्मान करण्यात त्यांचा अवीट आनंद वाटायचा.  ग.दि.माडगूळकर, ना. धों. महानोर अशा साहित्यिकांना आमदारकी बहाल करण्यात त्यांचाच जास्त पुढाकार होता.  गुणांची कदर व्हावी हीच भावना त्यामागची होती.

कर्‍हाडजवळ कार्वे नावाचे गाव आहे.  तेथे संभाजीराव थोरात हा वाङ्‌मयप्रेमी माणूस राहतो.  या संभाजीरावांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन समारंभ होता.  त्याचे अध्यक्ष अर्थातच यशवंतराव होते.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलाविणे आले होते आणि यशवंतरावांपुढे आपले विचार मांडता येतील या हेतूने मी ते स्वीकारले होते.  आत्मचरित्राबद्दल बोलणे झाल्यावर मी आमच्या ग्रामीण साहित्य चळवळीचे विचार तेथे मांडले आणि आता परिस्थिती बदलली आहे, नव्या पिढीला घडविण्यासाठी यशवंतरावसारख्यांनी दैनंदिन राजकारणातून काढता पाय घ्यावा असेही सूचित केले.

त्यांची-माझी शेवटची भेट कोवाडला रणजित देसाई यांच्याकडे झाली तेव्हाही मी त्यांना हा विचार बोलून दाखविला होता.  या दोन्ही वेळेला यशवंतरावांना माझ्या म्हणण्यात तथ्य वाटले होते आणि यशवंतराव म्हणाले होते, ''यादव, हे सोडून द्यावं आणि तुमच्या चळवळीमागे लागावं असं मलाही वाटतंय, पण आत राजकारणातून माघरी येणे अशक्य आहे.''

दुसर्‍याला मोठेपणा देत देत हा माणूस मोठा होत गेला आहे,  ते रागवत, चिडत नसत.  व्यथित होत, त्यांनी ज्या तडजोडी केल्या त्या या व्यथेमुळेच.

अशी व्यथा साहित्याने दूर होऊ शकते, वाङ्‌मयातून माणूस घडतो, संस्कृती घडते हे यशवंतराव जाणून होते.  परंपरेला वाट पुसतच परंपरा घडते, यावर त्यांचा विश्वास होता.  भाषणे करण्याचा ओढा तर होताच.  म्हणूनच त्यांच्या भाषणाच्या पुस्तकाला 'निवडक भाषणे' असे नाव न मिळता ते 'सह्याद्रीचे वारे' नावाने लोकांसमोर आले.  आपल्या आत्मचरित्राला त्यांनी नाव दिले : 'कृष्णाकाठ !'

या कृष्णाकाठी साहित्य संमेलन व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.  त्याप्रमाणे ऐन संघर्षाच्या काळातच ते झाले.  यथास्थित सरबराई होऊनही काही गंगाजळी उरली.  हे पैसे साहित्यासाठीच कारणी लागावेत असाच यशवंतरावांचा आग्रह होता.  त्या दृष्टीने त्यांनी अनेक साहित्यिकांशी विचारविनिमय केला.  त्यातूनच 'कराड पारितोषिक' आकाराला आले.  राजकारणापासून अलिप्‍त असलेले.  कोणाही व्यक्तीचे नाव न चिकटलेले हे पारितोषिक यशवंतरावांचया कर्मभूमीच्या नावाने आता प्रतिष्ठापात्र ठरले, हेही यशवंतरावांचे एक वेगळेपण.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org