यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २०

२०. अंतरी नाना कळा असलेला माणूस (सुधीर फडके)

श्री. यशवंतराव चव्हाण यांचा माझा निकटचा जरी नाही तरी दाट परिचय होता.  अनेक वेळा अनेक कारणांनी त्यांची भेट झाली होती.  यशवंतरावांचं व्यक्तित्व अथांग होतं, पण तितकंच लोभस आणि बहुरंगी होतं.  अर्थातच त्यांच्या आठवणीने मन उदास व अस्वस्थ झालं.  महाराष्ट्राच्या व भारताच्या राजकीय इतिहासात राजकारणापेक्षा जास्त साहित्य, संगीत, कला यात येणार्‍या पैलूदार व्यक्तित्वाबरोबर जवळचासंबंध आला याचा अभिमान वाटतो.  त्यांच्या वागणुकीतील जिव्हाळा माझी राजकीय मतं पूर्णपणे भिन्न असूनही कमी झाला नाही.

यशवंतरावांना संगीताविषयी प्रेम होते.  स्वर, सूर, शब्द या तिन्हीवर त्यांचे प्रेम होते.  यशवंतराव मुख्यमंत्री असतानाची गोष्ट आहे.  नंतरही त्यांनी मला वारंवार बोलाविले.  लोभ कायम होता.  केवळ गाण्यापुरता नव्हे तर व्यक्ती म्हणूनही.

यशवंतराव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गणेशोत्सवात दोनदा सह्याद्रि या निवासस्थानी माझ्या गाण्याचा कार्यक्रम झाला होता.  एकदा सुगम संगीत, एकदा गीतरामायण. दुसरा कार्यक्रम संपल्यावर मी जायला निघालो तेव्हा यशवंतराव म्हणाले, ''थोडं थांबाना''.  आपणाला कधी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या नाहीत, असं म्हणून माझ्या साथीदारांना सांगतू ते मला बाजूला घेऊन गेले.  आम्ही दोघच होतो.  यशवंतराव म्हणाले, ''सुधीर, मी तुम्हाला केव्हापासून ओळखतो तुम्हाला माहीत आहे ?  तुम्ही १९४१ च्या शेवटी कराडला आला होता पंडित देशपांड्यांच्याकडे.  त्या वेळी तुम्ही आजारी होता.  कासेगावकर वैद्य तुम्हाला औषध देत होते.  त्या वेळपासून मी तुम्हाला ओळखतो.''  महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इतकी जुनी आठवण ठेवतो याचं मला आश्चर्य वाटलं.  वास्तविक त्या वेळी मी कोणीच नव्हतो.  एक भटक्या माणूस होतो.  त्यानंतर यशवंतरावांनी त्यांच्या लहानपणापासूनच्या अनेक गोष्टी सांगितल्या.  अर्धा पाऊण तास आम्ही बोलत होतो.  शेवटी यशवंतरावांनी मला विचारलं, तुम्हाला काही अडचण असली किंवा काही हवं असलं तर मला कधीही सांगा.  मी अवश्य ते सर्व करीन.  मी म्हटले, ''यशवंतराव, मी तुमच्याकडं वर मान करून येतो तसंच नेहमी यायची माझी इच्छा आहे.''  मला काहीही नको.''  तरी यशवंतरावांनी विचारलं, ''तुमच्याकडं हे आहे का, ते आहे का.''  मी प्रत्येक गोष्टीला होकार दिला.  शेवटी म्हणाले, ''टेलिफोन आहे का ?''  मी म्हटंल, अजून नाही, पण मी त्यासाठी आवेदन केलं आहे.'' लगेच त्यांनी श्री. डोंगर्‍यांना बोलावून सांगितलं की दोन दिवसांनी मुंबई टेलिफोनचे मॅनेजर मला भेटायला येणार आहेत, त्या वेळी सुधीरचा टेलिफोन द्यायला सांगायचं आहे याची नोंद करून ठेवा.  त्यानंतर दहा बारा दिवसांनी मी जनरल मॅनेजरला भेटलो त्या वेळी त्यांनी त्यांची डायरी दाखवून यशवंतरावांनी त्यांना तसे सांगितल्याची मला खात्री दिली.  त्याच वेळी फ्री प्रेसचे त्या वेळचे संपादक श्री. नायर तिथे भेटले.  ते टेलिफोन ऍडव्हायझरी कमिटीचे सभासद होते.  त्यांनीही शिफारस केली आणि माझ्या घरी टेलिफोन आला.  

यशवंतराव भारत सरकारचे संरक्षणमंत्री झाले त्याच वेळी चीनचे आक्रमण चालू होते.  दिल्लीला जायला त्यांना दोनचार दिवस अवधी होता.  सह्याद्रि या त्यांच्या निवासस्थानी संरक्षण साहाय्य निधी नानारूपानं देणग्या देण्यासाठी झुंबड उडाली होती.  मी त्यांना अगोदर निरोप पाठवून त्यांची एकट्याचीच भेट मिळावी अशी विनंती केली, व त्यांनी होकार कळविला होता.  ठरल्याप्रमाणे मी योग्य वेळी सह्याद्रीवर पोचलो.  पुष्कळ गर्दी होती.  त्यांच्या एका कार्यवाहांनी मला बसायला सांगितलं.  यशवंतरावांना ११ वाजता बाहेर जायचे होते.  त्यांनी मला १० वाजता बोलावलं होतं.  ११ वाजायला आले तरी गर्दी कमी होईना.  मी बसूनच होतो.  ११ वाजता यशवंतरावांनी मला पाहिलं आणि म्हणाले की मला ब्रिटिश कौन्सिलरला भेटायला जायचं आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला.  मोटारीत आपल्याला बोलता येईल.  मोटारीत यशवंतराव, डोंगरे, ड्रायव्हर आणि मी होतो.  मी यशवंतरावांना म्हटलं, ''चीनच्या आक्रमणाच्या वेळी मलाही काही काम करायची इच्छा आहे.  गाण्याच्या रूपानं.  परमेश्वरानं मला जी थोडीबहुत शक्ती दिली आहे त्याचा उपयोग करून मी कुठंही उभा राहिलो या तरी शेकडो लोक मी माझ्याभोवती जमवू शकतो, प्रचार करू शकतो.  एक गोष्ट मात्र स्पष्ट करतो की मी काँग्रेसवाला नाही, त्यामुळे सरकारला हवा असलेला प्रचारच करीन असं नाही.  पण राष्ट्राच्या हिताविरुद्ध कोणताही प्रचार करणार नाही.  अशा वेळी मी करणार असलेल्या प्रचारास सरकारी अडथळा होणार नाही ना ?''  यशवंतराव हसले आणि म्हणाले, ''मला तुमची मतं माहीत आहेत आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.  त्यामुळे तुम्ही काहीही प्रचार केलात तरी तुम्हाला कसलाही अडथळा होणार नाही.''  मी म्हटलं, ''मला तिबेट मुक्तीचाप्रचार करायची इच्छा आहे.''  त्यावर यशवंतराव म्हणाले, ''हा प्रचार या वेळी करू नये असं मला तरी वाटतं.  पण तुम्हाला करायचा असेल तर करू शकता.''  क्षणभर थांबून पुढे ते जे काही म्हणाले ते अत्यंत महत्त्वाचं आहे.  यशवंतराव म्हणाले, ''आता चीन आक्रमण करू शकला त्याचे कारण आपण तिबेटवर त्याला मुकाटपणाने कब्जा करू दिला हेच आहे.  ब्रिटिशांनी अत्यंत शहाणपणाने तिबेट स्वतंत्र ठेवला होता तो का याचा विचार न करता आपण तिबेटचा घास चीनला घेऊ दिला त्याची फळ आता भोगतो आहेत.  पण भविष्यात आपल्या फौजा जेव्हा समर्थ होतील तेव्हा तिबेटची मुक्ती आपणाला करावीच लागेल.''  नेहरूंच्या विचाराशी सतत जुळवून घेणार्‍या पण मुक्त खर्‍या राष्ट्रीय विचारांच्या यशवंतरावांचं दर्शन स्पष्टपणे आजही माझ्या दृष्टीपुढं आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org