यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch १८

विभाग ४. -  सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व


हळुवार मनाचा सुसंस्कृत-सभ्य राजकारणी (शरद पवार)

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत आघाडीवर राहून कार्य करणाराला केव्हा ना केव्हा समज-गैरसमजाचं धनी व्हावं लागतं. राजकारणातील श्रेष्ठ व्यक्ती सामाजिक किंवा राजकीय बदलाचा निर्णय करीत असताना त्या व्यक्तीला राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा सर्वांगीण विचार जबाबदारीनं करणं आवश्यक असतं.  त्या निर्णयाचे परिणाम समाजजीवनावर घडणारे असतात.  राजकारणाच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या सामान्यांपासून श्रेष्ठ कार्यकर्त्यांच्या कार्यशक्तीवर त्याचे परिणाम घडतात.  राजकीय प्रतिमा निर्माण होण्यावरही हे परिणाम घडतात.  त्यामुळे निर्णय करणार्‍या व्यक्तीनं निर्णयाबद्दल आणि स्वतःच्या प्रतिमेबद्दलही सावध राहणं स्वाभाविक ठरतं.  हळुवारपणा आणि सभ्यता प्रामुख्यानं सांभाळावी लागते; याचं कारण विचारवंत आणि प्रगल्भ बुद्धीच्या श्रेष्ठ राजकारणी व्यक्ती निर्णयासाठी बसतात त्या वेळी त्यांचा निर्णय हा सुसंस्कृत सभ्यतेचं दर्शन घडविणारा असेल किंवा असावा अशी लोकांची वाजवी अपेक्षा असते.

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवरचे श्रेष्ठ राजकीय नेते, विचारवंत.  पन्नास वर्षांच्या राजकीय जीवनात आणि त्यातील तीस वर्षांच्या सर्वश्रेष्ठ सत्ताधारी जीवनात त्यांना घडोघडी निर्णय करावे लागले.  राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाचे निर्णय करीत असताना किंवा निर्णय केल्यानंतर त्यांना जबरदस्त आव्हानांना सामोरं जावं लागलं.  परंतु निर्णय केल्यावर ते स्वतः कधी सटपटले नाहीत किंवा पश्चात्ताप पावले नाहीत.  त्यांच्या कृतीतून किंवा उक्तीतून पश्चात्ताप झाल्याचं त्यांनी कधी दर्शविलं नाही.  याचा अर्थ ते दर्शविण्याची ऊर्मी त्यांनी या ना त्या कारणासाठी दाबून ठेवली असं नव्हे.  पश्चात्ताप करण्याच प्रसंग निर्माण झाला नाही किंवा त्यांनी तसा तो होऊ दिला नाही याचं कारण प्रत्येक निर्णय त्यांनी साफ मनानं केला.  कोणावर तरी जाणूनबुजून अन्याय करण्याच्या हेतूनं केला नाही.  ज्याच्या संबंधात निर्णय करावयाचा तो कोणत्या जातीचा आहे, धनिक आहे की गरीब आहे, स्वपक्षाचा आहे की विरोधक आहे, या राज्यातला आहे की त्या राज्यातला आहे असली परिमाणे लावण्यापासून ते नेहमीच दूर राहिले.  आपल्या एखाद्या निर्णयामुळे समाजातल्या एखाद्या घटकावर अन्याय तर झाला नाही ना याची दैनंदिन जीवनात तपासणी करण्याची सवय त्यांनी मनाला लावून घेतली होती.  स्वतःशी प्रामाणिक राहून निर्णय करीत राहिल्यामुळे पश्चात्ताप करून घेण्याची शक्यताच उरली नसावी.  त्यांच्याजवळ जे जे काही चांगलं होतं, भव्य होतं, उदात्त होतं ते ते त्यांनी निर्णयाच्या माध्यमातून समाजासाठी दिलं.  महाराष्ट्रासाठी, देशासाठी दिलं, राजकारणासाठी दिलं.  

संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीच्या वेळी, पं. जवाहरलाल नेहरू यांच्या साक्षीनं त्यांनी साफ मनानं सांगितलं होते की ''महाराष्ट्राजवळ जे चांगलं असेल, भव्य असेल, उदात्त असेल ते सर्व आम्ही भारतासाठी प्रथम देऊ.  भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होणार आहे.  महाराष्ट्र मोठा झाला तर भारत मोठा होणार आहे.''  यशवंतरावांनी जाहीरपणानं दिलेल्या या आश्वासनाचं, पुढच्या आयुष्यात त्यांनी स्वतः पालन केलं.  सहकार्‍यांनी आणि तमाम जनतेनं पालन करावं यासाठी किंबहुना तसं ते केलं जाईल यासाठी, ते कटाक्षानं सावध राहिले.  

यशवंतरावांनी केलेला प्रत्येक निर्णय अगदी सर्वमान्य असाच ठरला असं म्हणता येणार नाही.  काही निर्णय वादग्रस्त ठरले असतील.  संशय निर्माण करणारे ठरले असतील.  काहींनी त्यांच्या निर्णयशक्तीबद्दलच संशय व्यक्त केला तर काहींनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ग्रास घेण्याचा प्रयत्‍न केला.  स्वतःच्या संदर्भात त्यांनी जो पवित्रा स्वीकारला त्याचा अन्वयार्थ लावताना कोणी त्यांना राजकीय संधिसाधू ठरविण्याचा प्रयत्‍न केला.  यशवंतराव हे कुंपणावर बसलेले नेते आहेत असंही कोणी हिणवलं.  त्यांच्या मुत्सद्दीपणाला कोणी धूर्त म्हणून संबोधलं.

हे सर्व घडत राहिलं असलं तरी त्याचा प्रतिकार करण्यासाठी यशवंतराव क्वचितच सरसावले.  याचं खरं कारण यशवंतरावांचं मन साफ होतं.  सारा समाज आणि सारं राष्ट्र हे त्यांनी आपलं आराध्य दैवत मानलं होतं.  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी, लोकशाहीनिष्ठ, पुरोगामी नेतृत्वाचा आदर्श त्यांनी सातत्यानं समोर ठेवला होता.  व्यष्टिजीवन समष्टिजीवनात पूर्णपणे एकरूप, एकजीव बनवून आचार-विचारधर्म पाळण्याचं व्रत अंगीकारलं होतं.  संपूर्ण राष्ट्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती समर्थ, संपन्न बनली पाहिजे या ध्येयाची बांधिलकी, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांनी स्वीकारलेली असल्यानं, ते ज्यामुळं साध्य होईल, साध्य करता येईल त्या प्रत्येक साधनाचा त्यांनी प्रामाणिकपणे उपयोग केला.  साधनाचा उपयोग सामान्यांसाठी करीत असताना समाजातील ज्यांचा स्वार्थ दुखावला गेला त्यांनी दूषणे देण्यासाठी खडे व्हावे यात नवल ते काय ?

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org