यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांंचा राजकीय प्रवास-ch ८-९

या निष्कर्षाला पाठबळ मिळाले ते यामुळे की चरणसिंग यांच्या मंत्रिमंडळात उपप्रधानमंत्रिपद भूषविल्यानंतर आणि स्वर्णसिंग, वा अर्स, वा ब्रह्मानंद रेड्डी यांच्या अध्यक्षपदाखाली काँग्रेसमध्ये काही काळ व्यतीत केल्यानंतर यशवंतरावांनी अखेर 'स्वगृही' म्हाजेच इंदिरा काँग्रेसमधे समाविष्ट होण्याचा जो निर्णय घेतला, त्यामुळे आधीच्या थोड्याशा कालखंडात आपल्याकडून चूक केली गेली याची यशवंतरावांनी जणू कबुलीच दिली असे म्हणता येईल.  यशवंतरावांच्या एकंदर उज्ज्वल राष्ट्रीय जीवनाला गालबोट लावणाराच हा कालखंड होता असे आता प्रांजलपणे म्हणावयाला हरकत नाही.  

त्यात यशवंतरावांना कमीपणा येतो असे मला मुळीच वाटत नाही.  यशवंतरावांनी महाराष्ट्रावरच नव्हे तर राष्ट्रावरही ॠणाचा जो बोजा टाकला आहे तो उतरवून टाकणे कठीण आहे.  त्यांचे उतराई होण्याचा प्रयत्‍न करणेही तितकेच कठीण आहे.  त्यांच्या जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकला तर आश्चर्याने मन कुंठित झाल्याशिवाय राहात नाही.  सामान्य शेतकर्‍याच्या घरातील हा मुलगा अठराविश्वे दारिद्य्राला तोंड देत असतानाही उच्च विद्याविभूषित होतो हीच एक मोठी किमया आहे.  त्याठी जी जिद्द त्याने दाखविली त्याच्यापेक्षाही कितीतरी पटींनी मोठी जिद्द दाखवून हा गरीब मुलगा एकीकडे ऐरणीवरील घाव सोशीत, तावून सुलाखून निघत असताना राष्ट्रीय आंदोलनात स्वतःसाठी एक स्थान संपादन करतो ही एक अधिकच कौतुकास्पद घटना होय.  त्यानंतरचा यशवंतरावांचा जीवनपट जेव्हा माझ्या डोळ्यांसमोर तरळतो तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्राचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी एकापेक्षा एक मोठी पदे त्यांनी भूषविलेली मला दिसतात आणि कौतुकाने तसेच आदरमिश्रित आनंदाने माझे मन भरून येते.  अर्थात ही झाली सन्मानपदे.  त्यापेक्षा अधिक अभिमानास्पद असे कामगिरीचे जे डोंगर यशवंतरावांनी उभे केले आहेत ते राष्ट्रावरील यशवंतरावांचे ॠण होय.  ते ॠण फेडले जाऊ शकत नाही.  यशवंतरावांच्या स्नेहाचा, त्यांच्यामधील सहृदयतेचा, त्यांच्या निरागस प्रेमाचा लाभ घेण्याचे भाग्य लाभलेला एक सुहृद म्हणून मी एकच ग्वाही देईन की महाराष्ट्रात जे काही थोर पुरुष निर्माण झाले त्यांत कराडच्या यशवंतराव चव्हाण यांना मानाचे स्थान प्राप्‍त झाले आहे आणि ते तसेच अढळ राहील.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org