यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch ८

विभाग २. - यशवंतरावांचा राजकीय प्रवास

राष्ट्रीय व्यासपीठावर स्वयंप्रज्ञेने चमकलेले यशवंतराव (द्वा. भ. कर्णिक)

Bliss was it in that dawn to be alive
But to be young was very heaven

हे एका कवीचे गौरवोद्‍गार ज्या कालखंडाला सार्थ ठरले होते त्या कालखंडात यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली.  उज्ज्वल असेच ते दिवस होते.  तरुण पिढी त्या दिवसांच्या आव्हानाने तशाच आवाहनाने भारून गेली होती.  भारतीय राजकारणातील गांधीयुगाला त्या सुमारास उणीपुरी दहा वर्षे उलटून गेली होती.  पण गांधीजींच्या कायदेभंगाच्या आणि प्रतिकाराच्या, संघर्षाच्या, सत्याग्रहाच्या मोहिमेला आता परिपक्वता आली होती.  त्यांच्या जोडीला पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय राजकारणाच्या प्रांगणात चमकू लागले होते आणि त्यांनी तरुण मनाला मोहिनी घालण्यासाठी जो संदेश दिला होता तो 'लिव्ह डेंजरसली' हा होय.  गांधीजींचा संदेश सत्याग्रहाचा होता.  पंडितजींचा क्रांतीचा होता.  त्या क्रांतीच्या कल्पनेमागे रशियन राज्यक्रांतीचे वलय उभे होते.  रशियन क्रांतीने आपली संघर्षमय दहा वर्षे पुरी केली होती त्या वेळी सोव्हियट सरकारच्या आमंत्रणावरून मोतीलाल व जवाहरलाल नेहरू यांनी मॉस्कोला भेट दिली होती.  त्या क्रांतीने उभ्या जगाला असे हादरवून टाकले होते की  Ten days that shook the world या नावाने एक वृत्तान्तवजा त्या रोमांचकारी घटनेचा इतिहास लिहिला गेला.  जवाहरलाल नेहरू यांचे संस्कारक्षम मन साहजिकच या क्रांतीने भारून गेले.  यशवंतरावांचा राजकीय पिंड त्या क्रांतीच्या तत्त्वज्ञानावरच पोसला गेला असे म्हणावयास हरकत नाही.  त्यांचेच काय पण सार्‍याच तरुणांची मने त्या क्रांतीच्या विचारातूनच राजकीय घटनांची चिकित्सा करू लागली होती.  मला आठवते कॉ. बुखारिन यांचे 'ABC of Communism' हे पुस्तक आम्हाला जणू क्रमिक पुस्तकासारखे वाटू लागले होते.  त्या पुस्तकाच्या आधारे आम्ही मार्क्सिझमच्या मूलभूत सिद्धान्ताकडे वळलो होतो.

योगायोग असा की पंडितजींनी ज्या वेळी मॉस्कोला भेट दिली त्या सुमारास सुप्रसिद्ध क्रांतिकारक एम. एन. रॉय हे मॉस्कोमध्ये उच्चपदावर आरूढ झालेले होते.  इतिहासाचा आढावाच घ्यावयाचा म्हटले तर वसाहतीतील स्वातंत्र्य आंदोलनाच्या बाबतीत कम्युनिस्ट इंटरनॅशनलने कोणती भूमिका घ्यावी याबद्दल लेनिन यांनी जो प्रबंध सादर केला होता त्याच्याशी काही बाबतीत मतभेद व्यक्त करणारा प्रबंध एम. एन. रॉय यांनी लेनिनला सादर केला होता.  लेनिन यांच्या मनाचा थोरपणा असा की भारतामधून आलेल्या एका विशीतील तरुणाने सादर केलेला प्रबंध आपल्या जोडीने कम्युनिस्ट इंटरनॅशनलपुढे मांडण्याचे स्वातंत्र्य त्यांनी रॉय यांना दिले.  पुढे हे दोन्ही प्रबंध विचारासाठी अधिवेशनापुढे ठेवण्यात आले.  यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती ही की रॉय यांनी कम्युनिस्टांच्या सर्वोच्च पीठात आपल्यासाठी एक स्थान निर्माण केले होते.  तत्त्वज्ञानात्मक चर्चेच्या बाबतीत आणि चिकित्सक विचारपद्धतीचे दर्शन घडवून आणण्याच्या बाबतीत रॉय यांनी आपली जी प्रज्ञा प्रकट केली होती तिचा आविष्कार त्यांच्या 'India in Transition' या विद्वज्जनांनी मान्य केलेल्या पुस्तकात दिसून येतो.  मार्क्सवादी विचारपद्धतीची पहिली ओळख भारतीय बुद्धिवंतांना करून देण्याचे श्रेय रॉय यांनाच द्यावे लागेल.  पंडित नेहरू यांनी समाजवादासाठी भावनात्मक पाया या देशात घालून दिला हे खरे आहे.  पण त्यासाठी वैचारिक दृष्टिकोण तयार करून दिला तो रॉय यांनीच होय.  यशवंतराव चव्हाण हे आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करताना रॉय यांच्या प्रभावाखाली आले हे त्यांच्या भावी राजकीय जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानावे लागेल.  

तसे पाहिले तर यशवंतरावांच्या राजकीय भूमिकेवर एकाच वेळी दोन तात्त्वि विचारपद्धतींनी ठसा उमटविलेला दिसून येईल.  ते राजकीय प्रांगणात उतरले ते गांधीजींच्या कायदेभंगाच्या आंदोलनात सामील होण्यासाठी.  हे आंदोलन भारताच्या स्वातंत्र्यासाठी पुकारण्यात आलेले सविनय कायदेभंगाचे आंदोलन होय.  स्वातंत्र्याची आकांक्षा त्यामागे होती.  या स्वातंत्र्याची मूलभूत कल्पना ही की परकीय सत्तेचे त्यातून उच्चाटन झाले पाहिजे.  भावनात्मक अशीच ही कल्पना होती आणि यशवंतरावांच्यासारख्या असंख्य लोकांनी या कायदेभंगात भाग घेतला तो निखालस भावनोत्कटतेनेच होय.  गांधीजींनी त्या वेळी ज्या ज्या काही घोषणा केल्या, कायदेभंगासाठी जे जे कार्यक्रम आखले त्यात अक्षरशः अंधभक्तीने लोकांनी त्यांना साथ दिली.  उत्स्फूर्त जनआंदोलन म्हणूनच या कायदेभंगाची, सत्याग्रही लढ्याची चिकित्सा करावी लागेल.  गांधीजींचे श्रेष्ठत्व असे की सबंध देशाला त्यांनी आपल्या घोषणांनी जाग दिली आणि कायदेभंगासाठी वाटेल त्या हालअपेष्टा सोसण्याचीही प्रेरणा दिली.  एवढे खरे की आसेतुहिमाचल अशी एक प्रचंड चळवळ उभारण्याची ताकद फक्त गांधीजींमध्येच होती.  त्यांनी जनमनावर अशी मोहिनी घातली की एकीकडे सत्याग्रह, दुसरीकडे चरखा व टकळी याभोवती गुंफला गेलेला आर्थिक कार्यक्रम आणि तिसरीकडे अस्पृश्यता निवारणाची सामाजिक चळवळ यासारख्या भिन्नभिन्न कार्यक्रमांची गुंतागुंत गांधीजींनी प्रचलित केली असतानाही निरनिराळ्या लोकांनी निरनिराळ्या भावुक ओढीने गांधीजींचे नेतृत्व स्वीकारलेले दिसून आले.  राष्ट्राचे स्वातंत्र्य हाच एक गांधीजींचा, इतर नेतृत्वाचा आणि जनतेचा ध्यास होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org