यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch १२

१२. सत्तेवर नसलो तरी काय करीन ? (रामभाऊ जोशी)
    (यशवंतरावांशी झालेल्या अप्रकाशित गप्पा-चर्चा)

''सत्ता ही अशी वस्तू आहे की, ती केंद्रीत बनते.  सत्ताधीशाकडून अधिकाधिक सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्‍न सुरू होतो.  सत्ताधीशाचा सारा नूरच बदलून जातो.  द्वेष, स्पर्धा, जातीचे, मोठेपणाचे संस्कार, हितसंबंध हे सर्व सत्ताधीशाच्या ठिकाणी जमा होत राहतात.  त्यातून काही अपुरेपणा निर्माण होतो.  वस्तुतः सत्तेची जबाबदारी सांभाळत असताना काही पथ्यं ही सांभाळावीच लागतात.  ही पथ्यं सांभाळणं न सांभाळणं हे, तो सत्ताधारी जेव्हा सत्तेच्या ठिकाणी नव्हता तेव्हा त्याच्या प्रेरणा कोणत्या होत्या, मूल्यं कोणती होती, कोणत्या उद्देशानं त्यानं सत्तेचा स्वीकार केलेला आहे यावर बरंचस काही अवलंबून असतं.''

दिल्लीत १ रेसकोर्स रोड, या यशवंतरावांच्या निवासस्थानी गप्पा सुरू होत्या.  अगदी मोकळेपणानं.  १९७५ साल, अन् फेब्रुवारी महिना असावा.  मोकळेपणानं गप्पा सुरू होत्या. १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ, भूमिगत अवस्थेत राहून करावं लागलेलं कार्य, १९४६ ची सार्वत्रिक निवडणूक, पार्लमेंटरी सेक्रेटरीपदाच्या कामातील अनुभव आणि १९५२ च्या निवडणुकीनंतर मंत्रिपदाचा लाभ मिळून सत्तेमध्ये प्रत्यक्ष पदार्पण... असा गप्पांचा ओघ सुरू होता.

पार्लमेंटरी सेक्रेटरीपदापासून तो मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीपर्यंत आणि नंतर दिल्लीत एकाहून एक जबाबदारीची मंत्रिपदे स्वीकारल्यानंतर केलेले निर्णय, मूळ प्रेरणांची, मूल्यांची जपणूक, कामाची निश्चित केलेली दिशा याविषयी यशवंतराव खुल्या मनानं सांगत होते.  जणू काही मन मोकळं करण्याचा 'मूड' होता.  

यशवंतराव तीस वर्षांहून अधिक काळ सत्तेत राहिले.  महाराष्ट्रात असताना सर्वश्रेष्ठ सत्तास्थान त्यांनी भूषविले.  केंद्रामध्ये ज्येष्ठ-श्रेष्ठ सत्तास्थानांपर्यंतची मजल गाठली.  अनेकविध भल्याबुर्‍या अनुभवांनी त्यांची शिदोरी काठोकाठ भरलेली.  नाना देशींच्या नाना लोकांची संगत लाभलेली.  स्वतः प्रत्युत्पन्नमती आणि पराकाष्ठेचे संयमी !  ते मन मोकळं करीत आहेत असं दिसलं तेव्हा सावरून बसणं क्रमप्राप्‍तच ठरलं.  ते मोकळेपणानं बोलण्याची आणि मोकळेपणानं ऐकायला मिळण्याची अशी संधी मिळणं विरळा !  प्रारंभीच्या जुजबी बोलण्यातून गप्पा मूलभूत गोष्टींकडे झुकत चालल्या त्याच वेळी खरं म्हटलं तर मी स्वतःला सावरलं होतं.  त्यांचं बोलणं वेगानं होत होतं.  टाचण करून घेणंही अवघड होतं.  अन् समोरचा कोणी टाचणं घेतोय असं दिसलं तर यशवंतरावांचं बोलणं सूत्ररूप धारण करीत असे किंवा सांधा बदलून भलत्याच रुळावरुन प्रवास सुरू होत असे.  याचा अनुभव माझ्या संग्रही त्यापूर्वी जमा झालेला होता.  भल्याभल्यांशी गप्पा करताना, त्या वेळी यशवंतरावांच्या सन्निध असण्याची संधी वर्षानुवर्षे मिळत राहिलेली असल्यानं त्यांच्या लकबी परिचयाच्या होत्या.

तरीपण त्या दिवशी एक धाडस करायचं ठरवलं.  यशवंतरावांच्या समोरच, त्यांच्या चहाच्या मेजावर टेपरेकॉर्डर होता.  मी तिथं पोहोचलो तेव्हा ते एक अप्रतिम सुरेल ठुमरी ऐकण्याच्या स्वानंदात होते.  ठुमरीची अखेरी झाली, वेणुताईंचं चहाचं दाक्षिण्य पूर्ण झालं.... त्या दिवशी यशवंतराव विशेष प्रसन्न वाटले.  मग तो संगीताचा परिणाम असो किंवा मनावर ओझं यावं असं त्या दिवशी काही घडलेलं नसो, प्रसन्न दिसले एवढं खरं !

प्रसन्नपणानंच मग गप्पा सुरू झाल्या.  गप्पांचा ओध स्वातंत्र्य चळवळीकडे, विशेषतः बेचाळीसच्या चळवळीकडे वळला तेव्हा कायम लक्षात राहाव्यात अशा काही घटनांची हकिगत त्यांनी सांगितली.  सातारा जिल्ह्यातील बेचाळीसच्या चळवळीचा उठाव सामान्य थरातील माणसांच्या सहकार्यानं प्रामुख्यानं झाला आणि तो दीर्घकाळापर्यंत टिकून राहिला याचं यशवंतरावांना समाधान होतं.  चळवळीला उठाव यायचा तर मोठं मनुष्यबळ जतन करावं लागतं.  माणसं मिळवणं आणि विश्वासानं टिकवणं हे पथ्य ज्याला पाळता आलं तोच चळवळीचं नेतृत्व करू शकतो, चळवळीला जोर प्राप्‍त करून देऊ शकतो, सातत्य टिकवू शकतो !

बेचाळीसची चळवळ ही स्वातंत्र्याची ''करेंगे या मरेंगे'' अशी चळवळ असली तरीही परक्या इंग्रज सरकारजी इतराजी होऊ नये म्हणून, रावसाहेब, रावबहादूर, सावकार, वतनदार, श्रीमंत शेतकरी यांचा चळवळ्यांना सुप्‍त विरोध होताच.  चळवळ नेटानं पुढं न्यायची आणि ईप्सित साध्य करायचं तर कुणी विरोधी असतील तर त्यांना प्रेमानं जिंकावं लागतं.  आपल्या काही चुकांमुळे विरोध निर्माण होत आहे काय, आणि तसा तो होत असेल तर, चूक सुधारून विरोध नाहीसा होऊ शकेल काय, निदान तो पातह करता येईल का, याकडेही लक्ष ठेवणं अवश्य असतं हे दुसरं सूत्र !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org