यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३५-३

दि. २५ च्या संध्याकाळी ७-७.३० पर्यंत ते स्वस्थ निजून होते.  मधून मधून बोलत असत तेवढेच.  ७॥ वाजता दिल्लीचे माजी गव्हर्नर श्री. पी.जी.गवई प्रकृती पाहण्यासाठी म्हणून आले.  त्यांना पाहताच साहेबांनी किंचित हसून त्यांना प्रतिसाद दिला म्हणाले, ''गवई, तुमच्यावर अन्याय झालाय, मला कल्पना आहे.  परंतु काळजी करू नका.  निवडणुकीनंतर परिस्थिती बदलेल, बदलणार आहे.  तुमच्यावरील अन्याय दूर होईल. काळजी करू नका.''

''साहेब, मी फक्त आपली प्रकृती पाहावी म्हणून आलोय, तुम्ही विश्रांती घ्या.''  गवई म्हणाले.  चर्चा आणखी लांबली तर साहेबांना त्रास होईल म्हणून मी श्री. गवईंना खूण केली.  ते निरोप घेऊन लगेच बाहेर गेले.  श्री. गवई बाहेर पडले आणि श्री. उन्ही कृष्णन आले.  त्यांना पाहून साहेब बोलले, ''अरे तुम्ही मंडळी इथं दिल्लीत काय करताय ?  निवडणुका जाहीर झाल्या आहेत, आपापल्या मतदारसंघात जा.''  उन्ही कृष्ण निरोप घेऊन बाहेर पडले तेव्हा ७-४५ वाजले होते.

आणि नंतरची पाचच मिनिटं !  आम्ही शेजारी बसलो होतो.  साहेबांनी पाणी मागितलं.  पाणी घेतलं, अन् त्यांच्या श्वासातून वेगळाच आवाज येतोय असं वाटलं.  त्याच वेळी एक डॉक्टर आत आले.  त्यांनी पाहिलं अन् तसेच ते माघारी धावले.  काही सेकंदांतच नर्ससह ते आत पोहोचले.  छातीवर दाब देऊन त्यांनी श्वासोच्छ्वास सुरू ठेवण्याचा प्रयत्‍न केला पण......७-५० वाजले होते.  सर्वांना सोडून साहेब बोलता बोलता निघून गेले.  दिवसभर निवडणुकीव्यतिरिक्त काही बोललेच नाहीत.  अन् ते बोलणंही बघता बघता खुंटलं.... आयुष्याची दोरी तुटली.  मुंबईचे डॉक्टर तेथे पोहोचले तेव्हा सारं संपलं होतं.  त्यांनी डोक्याला हात लावला.  दोरी तुटल्यावर असलेले अन् नसलेले डॉक्टर काय करणार होते !

दहाच मिनिटांत श्री. राजीव गांधी आले.  अंत्यदर्शन घेतलं.  चौकशी केली.  मुंबईला नेणार म्हणून सांगितलं तेव्हा ते म्हणाले, दिल्लीत साहेबांची माणसं आहेत.  पार्थिव देह येथे घरी न्या.  सकाळपर्यंत ठेवा.  सकाळी दोन तीन तास त्यांना इथं राहू द्या.  त्यांनीच आपला एक विश्वासू माणूस तेथे ठेवला.  पार्थिव देह लवकरात लवकर घरी पोहोचेल अशी व्यवस्था करा असं त्याला बजावलं.

सकाळी १ रेसकोर्स रोड, या साहेबांच्या निवासस्थानी दुःखितांची रीघ लागली.  राष्ट्रपती आले, मंत्री आले, लष्करी व शासकीय अधिकारी आले, दिल्लीतले महाराष्ट्रीय आले, पत्रकार आले, नोकरचाकर, सामान्य माणसं यांना आवरणं मुष्कील ठरलं.  पार्थिव देह गनकॅरेजवरून पालम विमानतळावर पोहोचला तेव्हा पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांनी साहेबांना अखेरचा निरोप दिला.  तिथं लष्करी विमान तयार ठेवलं होतं.

२२ वर्षांपूर्वी नोव्हेंबरमध्येच साहेब दिल्लीत पोहोचले आणि आता केवळ दिल्लीच नव्हे तर जग सोडून निघून गेले तेही नोव्हेंबरमध्येच !  पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी बोटाला धरून साहेबांना दिल्लीत आणलं.  पंडितजींच्या नातवाला आपल्या त्याच बोटाचा आधार देऊन दिल्लीत उर्वरित कालक्रमणा करावी असा निश्चित विचार करून उतरत्या वयातही निवडणुकीतील डावपेचांची आखणी करण्यात साहेबांनी आपलं मन गुंतवलं होतं.  आजारी स्थितीतही तेच बोलत होते.  परंतु ते घडायचं नव्हतं !

सौ. वेणूताईंच्या रूपानं १ जून १९८३ ला चव्हाणांच्या वृंदावनातील तुळस दिल्लीतून निघून गेली; उरलं सुरलं वृंदावनही पृथ्वीनं आता पोटात घेतलं.  नियतीला पुढचं काही घडवायचं नसावं !  नशीब महाराष्ट्राचं !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org