यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३५-२

सकाळी ११ चा सुमार असावा.  पंतप्रधानांना त्याच सुमारास हे कळले. त्यासरशी त्यांनी स्वतःच आपली 'बुलेट-प्रुफ' गाडी काढली आणि श्री. साळवे यांच्यासह ते इंडियन मेडिकल इस्टिट्यूटमध्ये दाखल झाले.  स्वतः पंतप्रधान तेथे आले आहेत ही गोष्ट ते साहेबांच्या रूममध्ये पोहोचल्यावर इतरांना समजली.  लगेच धावाधाव सुरू झाली.  तज्ज्ञ डॉक्टर तेथे आले.  एकूण हलगर्जीपणाबद्दल श्री. राजीव गांधी यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.  त्यांना आवश्यक त्या उपचाराची सर्व व्यवस्था ताबडतोब करण्याचे फर्माविले.  साहेबांची अस्वस्थता पाहून त्यांच्या डोळ्यांत पाणी तरारले.  लवकर बरे व्हा, निवडणुका जाहीर झाल्या आहेत, मला तुमची गरज आहे, माताजी तर निघून गेल्या असे राजीवजींच्या तोंडून ऐकताच साहेबांचे डोळे भरून आले.  पंधरा मिनिटांनंतर निरोप घेताना राजीवजींनी सांगितलं की, काळजी करू नका.  कसलीही गरज भासली तर कळवा.  मुंबईला जायचंच असं ठरविलंत तर विमान तयार ठेवतो !

श्री. राजीव गांधी निघून गेल्यानंतर कितीतरी वेळ साहेब स्वस्थ पडून होते.  डोळ्यांतून अश्रू वाहत होते.  तो संपूर्ण दिवस त्यांच्या मनात, स्वतःच्या निवडणुकीपेक्षा एकून देशाच्या निवडणुकीविषयीचे विचारच घोळत असावेत.  दिवसभर त्या संबंधातच बोलत होते.  निवडणुकीची तयारी कशी करायची यासंबंधी सांगत होते.  

दि. २५ नोव्हेंबरच्या सकाळी साहेबांचा निवडणूक अर्जाचा फॉर्म भरला.  त्यांनी सह्या केल्या.  डॉक्टरांचे आवश्यक ते सर्टिफिकेट त्याला जोडले.  त्याच दिवशी फॉम घेऊन मी सातारला परतावे आणि २६ ला वेळेवर अर्ज दाखल करावा असा त्यांचा आग्रह होता.  दरम्यान त्याच दिवशी सकाळी श्री. प्रतापराव भोसले आणि श्री. शंकरराव जगताप दिल्लीत पोहोचले.  साहेबांची प्रकृती पाहावी म्हणून ते आले होते.  ते तेथे आल्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज घेऊन जावे आणि तो दाखल करावा असे मी सुचविले.  त्यावर साहेब म्हणाले, 'ठीक आहे, ते तर जातीलच पण तूही बरोबर जा.'

माझ्यासमोर मोठाच पेच उभा राहिला.  साहेबांना त्या अवस्थेत सोडून दिल्लीतून बाहेर पडणं प्रशस्त नव्हतं.  वसंतरावदादा मुंबईहून विमान पाठविणार होते.  डॉक्टरांना पाठविणार होते.  साहेबांना मुंबईला घेऊन जाणं अधिक महत्त्वाचं होतं.  निवडणूक अर्ज वेळेवर दाखल करणं हेही आवश्यक होतं.  श्री. प्रतापराव भोसले ते काम निर्विवाद करणारे होते.  दुसरे असे की, तशी वेळ निर्माण झाली तर निवडणूक अर्ज वेळेवर दाखल होईल अशी व्यवस्था करण्याचं आश्वासन स्वतः श्री. राजीव गांधी यांनीही दिलं होतं.  साहेबांचा तर आग्रह मीही सातार्‍यास जावे असा होता.  शेवटी श्री. प्रतावरावांशी चर्चा करून त्यांनीच अर्ज घेऊन जावे आणि पुढची पूर्तता करावी असे ठरविले आणि त्यानुसार श्री. प्रतापराव उमेदवारी अर्ज घेऊन तेथून रवाना झाले.  विमानाची आणि डॉक्टरांची प्रतीक्षा करीत मी तेथेच थांबलो.

दि. २५ ची दुपार उलटून गेली ती मुंबईहून निघणारे विमान किंवा कोणीच पोहोचले नाही.  वसंतरावदादा मुंबईत पोहोचताक्षणीच त्यांनी विमानाची व्यवस्था करून ठेवली, परंतु तज्ज्ञ डॉक्टरांना निरोप पोहोचून त्यांनी निघण्यात बराच वेळ गेला.  याचे कारण त्या दिवशी रविवार होता.  डॉक्टर आपल्या घरी नव्हते.  दुपारी उशिरा केव्हातरी त्यांना निरोप मिळाले.  मात्र निरोप मिळताच लगेच ते विमानतळाकडे जाण्यास निघाले.  त्यांना घेऊन विमान दिल्लीच्या विमानतळावर उतरले त्या वेळी संध्याकाळ झाली होती.

इकडे पंतप्रधानांनी खडसावल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांनी थोडा वेळ धावपळीने तपासणी करून ते जे निघून गेले ते पुन्हा फिरकले नाहीत.  त्यांच्या सूचनेनुसार शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार सुरू राहिले.  पूर्वीही साहेबांची एकच किडनी काम करीत होती.  दोन-तीन दिवसांच्या आजारपणात तेही काम थांबले असावे.  कारण नेहमीप्रमाणे नैसर्गिकरीत्या लघवी होणे बंद झाले.  त्यामुळे अन्य उपाय करून लघवी मोकळी करण्यात आली.  त्या दिवशी त्यांच्या रक्तदाबात एकाएकी चढउतार सुरू झाला.  कधी एकदम वाढायचा तर कधी एकदम कमी व्हायचा.  रक्तदाब नीट, काळजीपूर्वक तपासला जात नसावा असा माझा संशय होता.  कारण रक्तदाबाबद्दल दोन डॉक्टरांचे एकमत नव्हते.  एका डॉक्टरला रक्तदाबाचे प्रमाण बरोबर वाटत होते तर दुसरे डॉक्टर रक्तदाब बराच कमी झाला आहे असे समजावून सांगत होते.

प्रकृतीत असा चढ-उतार सुरू होता तरीपण स्वतः साहेबांचा आत्मविश्वास ढळला नव्हता.  मधून मधून ते निवडणुकीच्या तयारीविषयी सूचना देत होते.  बदलत्या राजकारणाविषयी बोलत होते.  दुपार उलटून गेल्यावर मुंबईला जाण्याविषयी बोललो त्या वेळी होकार-नकार त्यांनी काहीच दिला नाही.  मुंबईला, सातारला जायचं म्हणून त्यांनी घरी बॅग भरून ठेवली होती.  सर्व तयारी केली होती.  हॉस्पिटलमध्ये 'चेक-अप' करून परत येऊ आणि लगेच मुंबईला जाऊ याच विचारात ते होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org