यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३३-२

महाराष्ट्रात प्रगतीची पहाट उजाडली.  गरीब आणि श्रीमंत, सुशिक्षित आणि अशिक्षित, शहरातला आणि खेड्यातला.  शेतीवरचा वा गिरणीतला, धंदेवाला आणि व्यावसायिक सारे म्हणून लागले, चव्हाणसाहेब आमचे आहेत.  याच वेळी चव्हाणसाहेबांची आणि माझी पहिली गाठ झाली पुण्याच्या सर्किट हाऊसवर.  मी लहानपणापासून संघात वाढलेला.  त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील संघस्वयंसेवकांच्या मनात असलेली मुसलमानधार्जिण्या काँग्रेसबद्दलची अढी माझ्याही मनात होती.  केसरीमध्ये ''कॉलेज विद्यार्थी असे का वागतात ?''  असा माझा लेख आला होता.  साहेबांनी मला तेवढ्यासाठी बोलावले होते.  मी त्या मोठ्या हॉलमध्ये गेलो तो साहेब समोरच कोचार बसलेले दिसले.  ''या, या, जोगळेकवर'' म्हणाले.  मी अदबीने लांबच्या कोचावर बसलो तर मला म्हणाले, ''इथे माझ्या शेजारी या आणि घरात थोरल्या भावाशी जितक्या मोकळेपणाने बोलाल तसे बोला.''  मग पंधरा मिनिटे मी माझे मुद्दे सांगितले आणि त्यांनीही तितक्याच तत्परतेने प्रत्येक प्रश्नावरचे मत सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व भागात यशवंतराव हे नाव सर्वतोमुखी होऊ लागले ते दिल्लीचे बोलावणे आले.  परिस्थिती चमत्कारिक  होती.  साहेबांनी डोंगर्‍यांना विचारले.  डोंगर्‍यांनी सासर्‍यांना म्हणजे माझ्या वडिलांना-बाबांना-विचारले.  ''ते तिथे आपण'' असा निरोप बाबांनी दिला आणि डोंगरे दिल्लीत आले.  'सह्याद्री'- ऐवजी '१ रेसकोर्स' हे नामाभिधान आले.  संरक्षण, गृह, वित्त, परराष्ट्र अशी खाती बदलत गेली, पण कामाचा खाक्या तोच राहिला.  डोंगर्‍यांची मुले शिक्षणासाठी बाबुलनाथ मंदिराजवळ एका जागेत आली आणि त्यांची आजी नातवंडांचे कौतुक करीत तिथली जबाबदारी सांभाळू लागली.  चव्हाणसाहेबांची आई रिव्हेरावर राहिली आणि त्यांचे मेव्हणे-वेणूताईंचे सख्खे बंधू-बाबासाहेब मोरे ह्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आईंची सेवा मनोभावे अखेरपर्यंत केली.  याबद्दल साहेब नेहमी गौरवोद्‍गार काढीत.

दिल्लीतील निवासस्थानी कार्यालयात असताना डोंगरेसाहेब आणि घरात आले की डोंगरेकाका अशा भूमिका असत.  सौ. वेणूताईंचा कामाचा उरक आणि येणार्‍याजाणार्‍यांची देखभाल करण्याची हातोटी वाखाणण्यासारखी होती.  डोंगर्‍यांवर त्यांचा पूर्ण विश्वास आणि लोभ होता.  वेणूताईंच्या आवडी-निवडी डोंगर्‍यांना समजलेल्या होत्या.  पुण्यात आले तर कुठल्या बेकरीतील बिस्किटे घ्यावी, तुळशीबागेतली कुठली वस्तू त्यांना आवडेल, हिंद साडी सेंटरमधील कुठली साडी आवडेल हे सारे त्यांना माहीत.  सरळ खरेदी करून घेऊन जात आणि त्यांची पारख खरी ठरे.

दिल्लीतील महाराष्ट्रीय मंडळींना अनेक वर्षांनी - काका गाडगिळांच्या नंतर - आपला माणूस आल्याचे समाधान झाले.  १९७० साली- म्हणजे ज्योत्स्नाच्या लग्नाच्या वेळी - बाबुलनाथच्या घरी साहेब, बाईसाहेब भोजनास आले होते.  एका शेजार्‍याच्या ब्लॉकमध्ये बसण्याची सोय होती.  शरद पवार, तळवलकर आदी मंडळी होती.  डोंगर्‍यांनी मला तिथे नेऊन 'हे शोभनाचे भाऊ' असे सांगितले.  मी करसल्लागार म्हणून व्यवसाय करतो हे कळल्यावर त्यांनी इन्कमटॅक्सबद्दल माझे मत विचारले.  साहेब त्या वेळी अर्थमंत्री होते.  मी त्यांना पंधरा मिनिटे त्या कायद्यातील अन्यायकारक तरतुदी सांगितल्या.  मोरारजींच्या हटवादीपणाने त्या कायद्यातील दंडाच्या तरतुदी म्हणजे न्यायाची थट्टा चालली आहे असे सांगितले.  ''सगळे नंतर लेखी पाठवा'' म्हणाले.  त्याप्रमाणे मी पाठवले.  मग साहेबांनी डोंगर्‍यांना सांगितले की जोगळेकरांना दिल्लीत बोलावा.  मी गेलो.  चार दिवस राहिलो.  माझी कामाची पद्धत त्यांना आवडली आणि मी त्यांचा झालो.

पुण्यात साहेब आले की विमानतळापासून ते परत जाईपर्यंत त्यांच्याबरोबर राहणार्‍या रामभाऊ जोशी, शामराव पवार, अशोकराव, एस. के. कुलकर्णी, भा. द. खेर यांच्याबरोबर माझी एक भर पडली.  चव्हाण परिवारात मी दाखल झालो.  वर्षातून एकदा दिल्लीत डोंगर्‍यांच्याकडे राहून बंगल्यातील ऑफिसात काम करू लागलो.  १९७३ साली मी जनसंघाच्या तिकिटावर पुणे महानगरपालिकेत निवडून गेलो.  मी विचारले, ''आता माझ्यावर जनसंघाचा शिक्का पडला, तरी यंदा दिल्लीस यावे का नाही ?''  साहेब म्हणाले, ''त्याचा याचा काय संबंध ?''

एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या मे महिन्यात मी दिल्लीस गेलो तेव्हा डोंगर्‍यांची प्रकृती बरी नव्हती.  पोटात जड वाटे.  पायावर सूज होती.  जलोदराचा संभव होता.  साधे चहाचेही व्यसन नसलेल्या डोंगरेसाहेबांवर हा भलताच आघात होता.  ते तयार नसतानाही मी त्यांना मुंबईला घेऊन आलो.  नंतर सहा महिने अतिशय अस्थिरतेचे, कठीण गेले.  धड बसता येत नाही, धड झोपता येत नाही अशा अवघडलेल्या स्थितीत डोंगरे आजाराशी लढत होते.  ते गेले त्याच्या आधी दोन दिवसाची गोष्ट.  कुणीतरी निरोप दिला- साहेब भेटायला येणार आहेत - दिल्ली - पुणे प्रवासात मधेच येणार आहेत.  त्या भयंकर आजाराने काळवंडत चाललेल्या चेहर्‍यावर एकदम तजेला आला.  त्यांनी तोंड धुऊन घेतले, अंगात नवीन मॅनिला घातला.  अंगावर अत्तर-गुलाबपाणी शिंपडून घेतले आणि ते साहोंची वाट पाहू लागले.  थोड्या वेळाने निरोप आला - 'प्रोग्रॅम कॅन्सल झाला' आणि डोंगरे त्याही स्थितीत माझ्याकडे पाहून विषण्णपणे हसले.  प्रोग्रॅम ठरणे आणि ऐनवेळी कॅन्सल होणे ह्याची किती पारायणे आपण केली याची कदाचित त्यांना आठवण झाली असावी.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org