यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३३-१

बहुजन समाजातील मुख्य मंत्री मिळाला म्हणून महाराष्ट्रात आनंदीआनंद झाला.  खेडोपाडींची माणसे येऊ लागली.  आमंत्रणे देऊ लागली.  महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा आता बदलणार याची नांदी वाजू लागली.  ह्या प्रचंड वेगाने आव्हान देणार्‍या प्रगतीच्या लाटांचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी डोंगरे जिवाचे रान करू लागले.  सकाळी पाच-सव्वापाचला फोन सुरू होत.  स्नान, पूजा, फराळ, कपडे करणे या सर्ववेळी लांबलचक वायर असलेला फोन ते सगळ्या घरात घेऊन फिरत.  रात्री १० वाजता घरी परत आल्यावर कागदपत्रे काढून बसत आणि बारा वाजेपर्यंत गावोगावचे ट्रंककॉल स्वीकारत आणि काम करीत झोपी जात.  प्रचंड मानसिक समाधानात दोन माणसे मशगुल होती.

साहेबांचे लहानपण गरिबीत गेले.  उमेदीच्या मनास परिस्थितीचे चटके कसे भाजून काढतात हे त्यांनी अनुभवले होते.  नुसते साध्या राहणीने जगायचे तरी अशा वेळी किती माणसांचे उपकाराचे ओझे घ्यावे लागते हे त्यांनी पाहिले होते.  एक ध्येयवेडा तरुण अंगचे कर्तृत्व देशकारणी वाहण्यासाठी धडपडत असता कौटुंबिक आपत्ती किती छळतात, राष्ट्राचा गाडा पुढे ढकलावा म्हणून सारे बळ एकवटून त्या कार्यात झोकून देऊन काम करणार्‍या तरुणाच्या घराची आढीच कशी कोसळतात, जग भले पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणो पण घरच्या दिवंगत भावांच्या कच्च्याबच्च्यांची आणि स्त्री कुटुंबियांची जबाबदारी एका भाच्याच्या पगारावर निभावून नेली जात आहे ही भयंकर जाणीव त्यांना अस्वस्थ करी.

चव्हाणसाहेब जवळजवळ पंचवीस वर्षे सत्तेवर होते.  या काळात समाजावरील पददलित वर्गातील, आर्थिकदृष्ट्या गरिबीतील कुणीही तरुण माणूस त्यांच्याकडे आला तर त्यांना अपार सहानुभूती वाटे.  त्याचे कारण हेच असावे की परिस्थितीच्या फुफाट्यात होरपळून निघणारा तरुण हा उद्याच्या जनतेच्या आशाआकांक्ष पुर्‍या करणारा होऊ शकतो हे सत्य त्यांनी अनुभवले होते.  त्यामुळे मला इतक्या थरातील तरुण-प्रौढ माणसे भेटतात, साहेबांचा विषय निघाल्यावर ते म्हणतात माझ्यावर कुणावर नसेल एवढा जीव साहेबांचा होता.  ते माझ्या एकट्याशीच मोकळेपणाने बोलत.  डोंगर्‍यांचेही एक तत्त्व होते.  आलेल्या माणसास त्याचे म्हणणे ऐकून घेतले गेले आहे असे समाधान मिळाले पाहिजे- मग त्यासाठी स्वतःच्या सोयी-गैरसोयीचा विचार गौण.  

सह्याद्रीवरील वास्तव्यातच डोंगरे हे चव्हाणसाहेबांचे नुसते पी.ए.न राहता चव्हाण कुटुंबियांत मिसळले गेले आणि डोंगरे काका आणि डोंगरे वहिनी ही दोन माणसे चव्हाण कुटुंबियांची अविभाज्य घटक झाली.  आता पुतणे आणि पुतण्या 'काका' पेक्षा डोंगरे काकांच्याच मागे मागे राहू लागली.  याच काळात डोंगरे आणि त्यांची निष्ठा साहेबांना मनोमन वाहिली.  मोरारजींच्या घरचा माणूस आता साहेबांनी आपलासाच करून टाकला.  डोंगरे स्वामिनिष्ठ होते यात शंकाच नाही, पण त्यांच्या निष्ठेचे मोल जपणारा स्वामी त्यांना मिळाला हे महदभाग्य.  सार्‍या महाराष्ट्रभर हिंडताना चोवीस तास डोंगरे साहेबांच्या बरोबर राहिले.  साहेबांच्या कपड्याची बॅग भरणे, कामाचे कागद जपून नेणे, जायच्या गावी कुणास भेटायचे, कसे भेटायचे हे सारे ते ठरवू लागले.  पुढेपुढे माणसे डोंगर्‍यांनाच भेटू लागली.

अशा गाठी बंगल्यावर होतच असत, पण त्याहीपेक्षा सार्वजनिक सभा-समारंभांत होत.  समारंभाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत डोंगरे साहेबांच्या आसपास असत.  पण ते अशा बेताने की छायाचित्रकारांना त्या दोघांचा फोटो एकदम घेता येत नसे.  एकदा साहेब व्यासपीठावर गेले आणि त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे चाचपून पाहिली की डोंगरे पार टोकाला उभ्या असलेल्या मोटारींच्या ताफ्याजवळ जात आणि मग कामे घेऊन आलेली माणसे भेटण्यास सुरुवात होई.  अशा वेळची खेळीमेळीची वागणूक आणि बोलण्यातला मोकळेपणा मोठा मोहक असे.  मग कोणते काम होईल कुठले होणार नाही, साहेबांना आताच भेटावे का नाही-एखादा विषय केव्हा काढावा-हे सारेजण डोंगर्‍यांना विचारत.  कारण आता अद्वैत उभे ठाकले होते.  निर्णय समान होतो याचा अनुभव सार्‍यांना येत होता.  डोंगरे गेल्यावर खा. दंडवते यांनी साहेबांना सांत्वनपर पत्र लिहिले आहे, त्यात ते म्हणतात, 'एकदा आपण माझी डोंगर्‍यांशी ओळख करून दिलीत आणि पुढे अडचणीच्या वेळी त्यांनीच माझी कामे परस्पर करून टाकली.'

काही वेळेस परीक्षेचे क्षण अवचित येत.  लंडनमध्ये लोकमान्यांचे स्मारक करावयाचे म्हणून निधी गोळा करण्यास एक गृहस्थ लंडनहून भारतात आले होते. साहेब त्या वेळी काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते.  ''पुण्याच्या गडबडीच्या भेटीत गाठ घेऊन उपयोग नाही'' असे डोंगरे त्यांना म्हणाले.  त्या गृहस्थांनी साहेबांना खाजगी पत्र धाडले व 'डोंगर्‍यांची माझ्याकडून काही अपेक्षा असल्याने ते आपली भेट होऊ देत नाहीत' असे लिहिले.  मग त्यांना मुंबईचे भेटीचे आमंत्रण आले.  ते हॉलमध्ये येऊन बसल्यावर साहेबांनी, ''डोंगरे, यांचे ते पत्र आणा हो'' असे सांगितले.  त्या गृहस्थांचा चेहरा पाहण्यासारखा झाला.  साहेबांचे यच्चयावत सर्व टपाल डोंगरे प्रथम फोडून पाहात असत.  त्यात त्यांच्या स्वतःवर काही आरोप असतील तर ते पत्र आवर्जून साहेबांकडे जात असे.  असा विश्वास !  साहेबांची माणसे पारखण्याची आणि त्यांवर विश्वास टाकण्याची हातोटी वाखाणण्यासारखी होती यात काही शंकाच नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org