यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३३

३३. श्रीपाद डोंगरे आणि 'साहेब' (ऍड. ग.नी. जोगळेकर)

मुंबईमधील त्या लक्ष्मी-नारायण मंदिरातील भव्य सभागृहात त्या प्रसन्न सकाळी प्रसन्न वदनाची शेकडो स्त्रीपुरुष मंडळी रंगीबेरंगी उंची वस्त्रे परिधान करून उभी होती.  मधूनच इकडे तिकडे हिंडत होती.  आपणास हवी असलेली माणसे शोधत होती.  उत्तराचे फवारे कुणी हौसेने उडवीत होता.  मी पुण्याचा.  मला वाटे प्रत्येकास नमस्कार करून स्वागत करावे आणि खुर्चीवर-अथवा-कोचावर बसा म्हणावे.  पण त्याची इथे विशेष पर्वा नव्हती. आज डोंगर्‍यांची मुलगी ज्योत्स्ना हिचा विवाह समारंभ होता.  मुलीचा सख्खा मामा या नात्याने मी उपस्थित होतो.  मंचकावर धार्मिक विधी चालू असतानाच मुहूर्त वेळ आली आणि बाहेर पोलिसांच्या शिट्या ऐकू आल्या.  ''साहेब आले - साहेब आले'' असे सारे सभागृहच बोलते आहे असे वाटले आणि चव्हाणसाहेब हसत हसत, नमस्कारांचा स्वीकार करीत करीत आपल्या प्रथम रांगेतील कोचावर आले.  त्यांच्या उजव्या बाजूस मुख्यमंत्री वसंतराव नाईक बसले आणि तेवढ्यात गर्दीतून वाट काढीत डोंगरे बाळासाहेब देसाईंना घेऊन आले.  मोठ्या आदबीने त्यांनी साहेबांच्या डाव्या हाताची जागा दाखवली आणि बाळासाहेब स्मित हास्य करीत बसले.  साहेबांनी डोळ्यांच्या कडेने डोंगर्‍यांकडे पाहिले आणि क्षणभर निर्विकारपणे साहेबांकडे पाहत डोंगरे गर्दीत मिसळून गेले.

श्री. बाळासाहेब देसाईंनी मंत्रिपदाचा अचानक राजीनामा दिला आणि ते मुंबईतून निघून गेले.  त्यानंतर त्यांची आणि साहेबांची सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच गाठ पडत होती.  अनोळखी पण गुणी माणसंना साहेबांच्या सहवासात नेऊन सोडणे, जिवलग स्नेह्यांच्या वारंवार साहेबांशी गाठी पडतील असे पाहणे आणि समज-गैरसमजाने दुरावलेल्या, दुखावलेल्यांना मोठ्या खुबीने आणि कष्टाने पुन्हा जवळ आणून बसवणे ही सारी कामे डोंगरे कमालीच्या सावधगिरीने करीत असत.  ते जेव्हा एखाद्या व्यक्तीची गाठ-भेट टाळीत असत तेव्हा ती व्यक्ती आपल्या हिताची नाही असा साहेबांचा पूर्ण भरवसा असे.  दोन शरीरे पण एक मन, विविध विचार पण एक निर्णय असा हा सुंदर संगम होता.  दोघेही त्या बाबतीत निःशंक, निर्भर होते.  त्या समारंभात शेकडो लोक भराभर फ्लॅश उडवीत होते.  पण दुसर्‍या दिवशी सकाळी धनंजय-त्यांचा मुलगा-वर्तमानपत्र पाहत असताना डोंगर्‍यांनी नुसते विचारले, आहे ना ?  आणि तोही खुणावतो 'हो.'  मी पाहिले तर वर्तमानपत्रात पहिल्या पानावर तिघांचा एकत्र बसलेला फोटो होता.  आणि 'या विवाहप्रसंगी सहा महिन्यांनंतर पाहिल्यांदाच त्यांची भेट झाली' असा मजकूर होता.

डोंगरे गुजराथमधील धरमपूर संस्थानमधले - कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबातले- त्यांचे वडील तिथल्या दरबारचे पशुतज्ज्ञ होते.  स्टेनोग्राफर होऊन डोंगरे नोकरीची प्रतीक्षा करीत असतनाच मुंबईच्या गव्हर्नरर्कडील एका खाष्ट युरोपियन सेक्रेटरीच्या हाताखाली कुणी जाणार का अशी विचारणा झाली आणि डोंगरे मुंबईस आले.  अतिशय नियमितपणा, स्वतःच्या कामातील सुबकता, कष्टाळूपणा, गुजराथी धाटणीचे वागणे आणि चेहर्‍यावरील मोहकता यामुळे डोंगरे सरकारी नोकरीत टिकले आणि मुरारजी देसाई हे गृहमंत्री असताना टोणपेकाका, देसाईभाई तसे डोंगरे तिसरे पी.ए.झाले.  यशवंतराव चव्हाण नावाचा एक तरुण त्या वेळी राजकारणाच्या क्षितिजावर दिसू लागला होता.  तो मोरारजींच्या घरी अथवा कार्यालयात आल्यावर मोरारजींची गाठ पडण्यापूर्वी डोंगर्‍यांशी गप्पा मारीत बसे.  आपल्या अंगच्या गुणांनीच हा तरुण मंत्रिमंडळातही येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला.

असं म्हणतात की मोरारजींना जेव्हा मुख्यमंत्रिपदावरून दिल्लीस केंद्रीय मंत्रिमंडळात नेले गेले तेव्हा महाराष्ट्रातील हालचालींची खडानखडा माहिती राहावी या हेतूने त्यांनी डोंगर्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच ठेवले.  चव्हाणसाहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांच्या ब्रह्मे नावाच्या पी.ए.ना सह्याद्रीवर राहण्यास येता का विचारले.  ब्रह्मे यांना चोवीस तास बांधिलकी सोसणार नव्हती.  मग डोंगर्‍यांना विचारले आणि क्षणाचाही विलंब न लावता डोंगरे 'हो' म्हणाले आणि सह्याद्रीवरील औटहाऊसमध्ये राहण्यास आले.  

पहिल्या पहिल्यांदा गडबड झाली.  एकदा सकाळी डोंगरे बंगल्यातून घरी जेवण्यास आले आणि इकडे गाड्या बरोबर ठरल्यावेळी सचिवालयात जाण्यासाठी सुटल्या.  एकदोन समारंभांस गाड्या गेल्या तर समारंभाचे ठिकाण सापडण्यास वेळ लागला.  पहार्‍यावरचे पोलिस शिस्त पाळेनात.  म्हणायचे 'आम्ही साहेबांच्या गावचे आहेत.' पण साहेबांनीच सांगितले की घरच्या मंडळींची राज्यकारभारात लुडबूड चालायची नाही आणि मग सारे काही शिस्तीत चालू झाले.  सकाळी सह्याद्रीवर भेटण्यास येणारी खास मंडळी डोंगर्‍यांच्या घरी येऊन बसत.  छगलासाहेब येऊन बसत आणि सातआठ वर्षांच्या ज्योत्स्ना-धनंजयशी गप्पा मारीत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org