यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- स्मृतिसंकलन

स्मृतिसंकलन

माणुसकीचा गहिवर असलेले दांपत्य

तीस वर्षांपेक्षा जास्त श्री. यशवंतराव चव्हाणांच्या कुटुंबाची सेवा करणारे श्री. सरवर शेख यांच्या आठवणी आजही त्यांच्या डोळ्यांतील अश्रू सांगतात.  त्यांचे श्री. ना.बा. लेले, नवी दिल्ली यांनी केलेले शब्दांकन

''१९६३ साली माझे लग्न त्यांनी करून दिले आणि दोघेही जातीने हजर राहिले.  त्या वेळी मी फक्त दहा दिवस रजेवर राहिलो.  अन्य वेळी या दोघांपासून दूर राहणे जडच जात असे.  १९६२ च्या नोव्हेंबरमध्ये मुंबई सोडून संरक्षणमंत्रिपदी श्री. यशवंतरावजी दिल्लीस आले त्यावेळी मुंबईतील घरच्या सेवकवर्गापैकी कोणीच मुंबई सोडून दिल्लीस येण्यास तयार नव्हते.  मी एकटाच दिल्लीस आलो.  त्यानंतर १९८३ च्या मे महिन्यात माझी आई खूपच आजारी होती म्हणून (वेणूताईंच्या) बाईसाहेबांच्या सांगण्यावरून गावी जाऊन आलो.  अन्यथा या दोघांपासून दूर राहण्यास मन तयारच होत नसे.  पुढे १९७७ मध्ये 'साहेब' (यशवंतरावजी) यांनी एकदा सुचविले की 'यापुढे तुला गृहमंत्रालयात चांगली नोकरी लावून देतो.  कारण यापुढे मी मंत्री राहणार नाही.'  अर्थात याला मी नकार दिला.  तेथे मला अधिक पगार मिळाला असता पण नवी नोकरी करताना या दोघांची सेवा मी मनाप्रमाणे करू शकलो नसतो.  दूर राहिल्याने या दोघांच्या प्रेमाला पारखा झालो असतो.  हा जिव्हाळा व ही आपुलकी निर्माण करण्यात बाईसाहेबांचा वाटा स्वाभाविकच मोठा होता.  कारण साहेबांना घरात विशेष लक्ष देण्यास सवडच नसे.''

कधीकाळी घरातील सेवकांपैकी कोणी चुकलामाकला तरी 'साहेब' रागावू नयेत म्हणून बाईसाहेबच साहेबांना सांगत की, 'आपणच सर्वांना सांभाळून घ्यायला नको का ?  माणसे आहेत ती.  चुका कधीमधी होणारच !'  सेवकांचा असा कैवार घेणार्‍या त्या माऊलीने मात्र चुकूनसुद्धा कधी कोणावरही राग केला नाही.  या त्यांच्या स्वभावामुळेच त्यांच्या सल्ल्यानुसार संसारी जीवनात 'बचत' (सेव्हिंग्ज) व 'विमा' उतरविणे आदी करू शकलो.  माझ्या मुलाचे (अरुचे) आता बी.ए. पर्यंत झालेले शिक्षणही त्यांनी जणू तो आपल्या परिवारातीलच एक आहे, अशा थाटात चालू ठेवलेले होते.  लौकरच तो पदवीधर होईल.  त्यचे नाव 'सलीम' (ऊर्फ हरू पण त्याला अरूच म्हणीत)  असून अगदी लहानपणापासून तो सतत त्यांच्या नजरे समोरच वाढला.  मोठा होत गेला.  'बाईसाहेबांची' स्वतःची पूजापाठ आदी प्रथा नित्याचीच असे, पण तरीसुद्धा त्या आग्रह करून 'माझेकडून नियमितरीत्या नमाज पढणे होते की नाही' याची आस्थापूर्वक चौकशी करीत असत.  त्यांची ही आस्था इतकी प्रभावी असे की, त्यामुळे त्यांच्या पूजेअर्चेच्या जागी सारवण करणे, रांगोळी घालणे, पूजेची तयारी करणे आदी बारीकसारीक कामे माझी पत्‍नी आपुलकीने करीत असे व बाईसाहेबांनाही ते विशेष रुचत असे !  अशा चांगल्या व्यवहारामुळे त्या 'रमझान', 'बकरी ईद' आदी सण आम्हा दोघांकडून नीट पाळले जातात की नाही याची पण बारकाईने विचारणा करीत असत.  एवढा उदार व्यवहार 'साहेब व बाईसाहेब' यांचा असल्यामुळेच आम्ही सेवक मिळून एक परिवार असल्यागत राहात होतो.  यामुळेच एक जण मंगलोरचा तर दुसरा राजस्थानचा तर कोणी पंजाबमधील लुधियानाचा, तर कोणी उत्तर प्रदेशाच्या अल्मोडाचा, तर कोणी हरियाणाचा असे विविध प्रदेशांचे व विविधभाषी असूनही अगरी एकोप्याने सेवारत होतो.  अर्थात याचे श्रेय सर्वश्री साहेब व बाईसाहेब यांचेच आहे !       

सरवर शेखच्या जीवनात अशा अनेकविध आठवणी आहेत, पण त्यापैकी दि. १९ नोव्हेंबर १९८४ ची आठवण म्हणजे कै. श्रीमती इंदिराजी, कै. जवाहरलालजी, कै. लालबहादूरजी व म. गांधीजी यांच्याप्रती कै. यशवंतरावजींचा आदर व आस्था यांचे प्रतीक होय.  दि. १६ नोव्हेंबरलाच ते मुंबईहून दिल्लीस आले होते व दि. १९ ला त्यांनी सरवरला सांगितले की, आज राजघाटावर जाण्याची इच्छा आहे.  सरवरने चांगल्यापैकी मोटार चालविणे अवगत करून घेतलेले असल्याने त्याने लगेच गॅरेजमधून मोटार बाहेर काढून तो साहेबांना समाधीच्या दर्शनार्थ घेऊन गेला !  सरवर शेख सांगतो की, ''त्या दिवशी साहेबांनी (यशवंतरावजींनी) महात्माजींच्या राजघाटावरील समाधीपासून प्रारंभ करून क्रमशः शांतिवन, विजयघाट व कै. इंदिराजींचा जेथे अग्निसंस्कार झाला, ते स्थळ- या सर्व स्थानी जाऊन अभिवादन करून मोठे मानसिक समाधान प्राप्‍त करून घेतले असावे.  कारण त्यानंतर अवघ्या एक सप्‍ताहाच्या आत ते आता सर्वांना 'पोरके' करून गेले !''

(सरवरच्या संस्मरणगाठी अनेक आहेत.  त्यापैकी काहींचे हे ओझरते दर्शन आहे.)
- सरवर शेख

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org