यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- संपादकीय निवेदन-1

या ग्रंथाची कल्पना प्रथम सुचली ती यशवंतरावांच्या २५ वर्षे निकटचा सहवास लाभलेले त्यांच्या विश्वातील निजी सचिव राम खांडेकर व दिल्लीतील जेष्ठ पत्रकार श्री. ना.बा. लेले यांच्याशी बोललो.  त्यांचे बहुमोल साहाय्य व लेखनसहकार्य मिळाले.  पूर्वीचे यशवंतरावांचे निजी सहाय्यक श्री. राम प्रधान, शरद केळकर, शरद काळे यांच्याशी विचारविनिमय केला.  त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार.  यशवंतरावांचे निकटचे सहकारी व त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. वसंतदादा पाटील यांनी स्मृतिग्रंथास सर्व प्रकारचे साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.  त्यामुळे हुरूप येऊन तयारीस सुरुवात केली.  नंतर मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही या ग्रंथाची कल्पना मान्य केली.  याबद्दल या दोघांचा मी ॠणी आहे.

ही ग्रंथाची तयारी चालू असताना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांचे हा ग्रंथ, मंडळ प्रकाशित करण्याची तयारी दाखविणारे पत्र जुलै १९८५ मध्ये आले.  तेव्हा आनंद झाला.  त्यांच्या उत्स्फूर्त सहकार्याने व बहुमोल मदतीमुळे हा ग्रंथ प्रकाशित होऊ शकला.  तसेच मंडळाचे सचिव श्री. सूर्यकांत देशमुख यांनी अत्यंत आस्थेने व तत्परतेने ग्रंथाची छपाई इत्यादी बाबत हालचाली केल्या.  मंडळाचा यंदा रौप्यमहोत्सव आहे.  तेव्हा या वर्षात या मंडळाच्या जन्मदात्यासह ही ग्रंथांजली मंडळातर्फे वाहिली जात आहे ही अत्यं उचित आदरांजली आहे.  मंडळाचे, डॉ. बारलिंगे, सूर्यकांत देशमुख यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

या ग्रंथासाठी संदर्भ साहित्य गोळा करताना व इतर बाबतीत दिल्लीतील पत्रकार मित्र सर्वश्री अशोक जैन, विजय नाईक, मधू साठे, मदन जाधव, काशीनाथ जोगळेकर, मनोज वाघ, श्रीमती प्रेम गुलाटी, सौ. शैलजा केळकर यांची मदत झाली.  यशवंतरावांचे इंग्रजी चरित्रकार श्री कुन्नीकृष्णन् यांनी लेखन सहकार्य तर केलेच पण त्यांच्या ग्रंथातील यशवंतरावांच्या मुलाखतीचा वापर करण्याची परवानगी दिली.  महाराष्ट्र परिचय केंद्राचे श्री. दा.मो. हेजीब व त्यांचे सहकारी यांचे सहाय्य मिळाले.  या सर्वांचा मी आभारी आहे.

पुणे येथे या ग्रंथाची पूर्वतयारी आणि छपाई करण्याचे योजिले तेव्हा तेथील माझे मित्र श्री. मा.कृ.पारधी यशवंतरावांचे चरित्रकार श्री. रामभाऊ जोशी, 'मानसन्मान' प्रकाशनचे श्री. रविंद्र कुलकर्णी यांच्यामुळेच हे काम शक्य झाले.  हा ग्रंथ वेळेवर, नीटनेटका आणि उत्तम रीतीने छापला जावा म्हणून या मित्रांनी तळमळीने मदत केली, वेळ खर्च केला आणि आवश्यक ते सर्व कष्ट उचलण्याची तयारी दर्शवली याबद्दल मी त्यांचा ॠणी आहे.

या ग्रंथाचे मुद्रण करण्याची प्रतयक्ष जबाबदारी ग्रंथ मुद्रणात आघाडीवर असलेले कल्पना मुद्रणालयाचे श्री. चिं. स. लाटकर यांनी आपुलकीने स्वीकारली.  काम अंगावर घेतले आणि समर्थपणे पूर्ण केले.  एक सुंदर स्मृती ग्रंथ त्यांनी वाचकांच्या हाती दिला.  त्यांचे मनःपूर्वक आभार.

ग्रंथात यशवंतरावांची छायाचित्रे समाविष्ठा करावी लागणार होती.  त्यासाठी दुर्मिळ छायाचित्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी श्री. आनंद देसाई यांनी स्वीकारली.  त्याचप्रमाण आपल्या वैयक्तीक संग्रहातील अशीच दुर्मिळ छायाचित्रे कवी श्री. ना. धों. महानोर, रामभाऊ जोशी, शेख सरवर यांनी दिली.  ग्रंथाची सजावट हे कल्पकतेचे, महत्त्वाचे काम असते.  पुणे येथील आईज ऍडव्हर्टाईजचे प्रमुख श्री. ईश्वर दिघे यांचे या कामी बहुमोल सहकार्य लाभले.  दिल्लीचे चित्रकार श्री. पी.डी.अभ्यंकर यांनी ग्रंथसजावटीसाठी सल्ला दिला.  या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

ग्रंथासाठी काही मुलाखती घ्याव्या लागणार होत्या.  मुलाखती घेऊन त्या लिहून देण्याचे काम श्री. सुधीर गाडगीळ, श्री. अनील दांडेकर, हिंदी पत्रकार श्री. राजकुमार यांची या कामी बहुमोल मदत झाली.  त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार.  ग्रंथाची मुद्रणप्रत तयार करण्यासाठी त्यांच्या लेखनाचे काम करणारे श्री. नाईक, श्री, शेखर जोशी यांनाही धन्यवाद.  तसेच या ग्रंथाला सर्वांगीण स्वरूप यावे म्हणून श्री. ना.बा. लेले, राम खांडेकर व रामभाऊ जोशी यांनी जे लेखन सहाय्य केले त्याबद्दल मी त्यांचा ॠणी आहे.

१९६९-७० मध्ये यशवंतरावांशी चर्चा करूनच लोकशाहीत तळाचा कार्यकर्ता राष्ट्रीय पातळीवर लोकनेता व सत्ताधीश कसा होऊ शकतो या संदर्भात स्वतः श्री. चव्हाणांच्या राजकीय नेतृत्वाचाच अभ्यास करून ग्रंथ लिहिण्याचा माझा विचार होता.  यशवंतरावांना माझी ही कल्पना पसंत पडली होती.  त्या दृष्टीने दोन प्रदीर्घ चर्चा झाल्या पण तो संकल्प तडीस नेता आला नाही.  आता त्यांच्या निधनानंतर हा ग्रंथ तयार झाला.

आधुनिक महाराष्ट्र आणि स्वतंत्र भारत याच्या गर्भकाळात यशवंतरावांचे राजकीय जीवन सुरू झाले आणि त्याच्या घडणीत त्यांना विशिष्ट स्थान मिळालेल्या या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची श्रीमंती जनतेच्या नजरेत भरावी या हेतूनेच स्मृतीग्रंथाचा संकल्प केला.  यशवंतरावांच्या पहिल्या वर्षश्राद्धाला त्यांना ही ग्रंथांजली अर्पण करता आली याचेच आम्हास समाधान वाटते.  यशवंतरावांच्या महाराष्ट्रातील चहात्यांना व चरित्र अभ्यासकांना हा ग्रंथ, त्यांच्या दिल्लीतील बावीस वर्षांचे सर्वांगीण दर्शन घडवील, निदान त्यामुळे प्रकाशझोत पडेल असा विश्वास वाटतो.  

भा.कृ. केळकर
पुणे, २ ऑक्टोबर १९८५

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org