यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २६-३

मार्क्सचे महत्त्व समजले तरी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात कोणाच्या छावणीत जावे याचा मनाचा निर्णय होत नव्हता.  ते लिहितात - 'माझे हे वैचारिक प्रकरण इतके साधे नव्हते.  गांधींच्या व्यक्तिमत्त्वावर निष्ठा, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारासंबंधी एक नवी जवळीक आणि माझ्या जिल्ह्यातल्या काही मित्रांच्या साहचर्यापुढे, नाही म्हटले तरी, काहीशा आपुलकीने मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या विचाराकडे पाहण्याचा दृष्टिकोण, अशा एका वैचारिक त्रिकोणात मी उभा होतो.'  विचारांच्या संघर्षात उपाय कोणता करायचा हेही त्यांना समजले होते.  ते पुढे लिहितात- 'विचारांचा गोंधळ कितीही असला, तरी प्रत्यक्ष कार्यामध्ये त्यांची कसोटी लावल्याशिवाय, बरोबर काय आणि चूक काय, हे समजत नाही.'  तात्त्विकाला व्यावहारिकाची कसोटी हवी ही दृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची व लोकमान्य टिळकांची आणि खास मराठी परंपरेची दृष्टी आहे हे मुद्दाम सांगण्याची गरज नाही.  पुढे बेचाळिस सालच्या लढ्यात, एका गुप्‍त बैठकीत, पिके जाळावी, अशी सूचना आली असता यशवंतरावांनी त्या सूचनेला तीव्र विरोध केला होता.  ते म्हणाले होते- 'ही अत्यंत अव्यवहार्य अशी योजना आहे.  पिके जाळण्याचा कार्यक्रम हाती घेणे म्हणजे लोकांशी लढाई सुरू करणे असा त्याचा अर्थ होईल आणि लोक आपल्याबरोबर न येता उलट सरकारला मदत करतील.  वर्तमानपत्रात वाचलेल्या पुस्तकी कार्यक्रमांचा अवलंब करून ही चळवळ चालविता येणार नाही.'

यशवंतरावांचा कार्यकर्ता पिंड कसा घडत होता याचे मर्मच या भाषणात आहे.  असा हा पिंड केवळ घडलेला नाही.  तो विचारपूर्वक, प्रयत्‍नांनी, कार्यांची व्यावहारिक कसोटी वापरीत वापरीत घडवलेला आहे.  'जडणघडण' आणि 'निवड' ही प्रकरणांची नावे या दृष्टीने अर्थपूर्णच नव्हे, तर पूर्ण-अर्थ आहेत.

यशवंतरावांचा हा पिंड समजून घेतला तर त्यांच्या गेल्या चाळीस वर्षांच्या निर्णयामागे कोणते मन होते, आणि ते कसे काम करीत होते, याची बरीच अचूक कल्पना येऊ शकते.  कोणताही विचार पक्का करण्यासाठी यशवंतरावांनी स्वतःपुढे काही ठाम आधार ठेवलेले दिसतात.  त्यांच्या या आधारांपैकी (reference) पहिला म्हणजे सर्व भारताचा एकत्रित विचार.  दुसरा म्हणजे भारतातल्या ऐशी टक्के ग्रामीण जनतेचा-शेतकर्‍यांचा-विचार.  तिसरा आधार समावेशकतेच्या तत्त्वाचा.  चौथा सुसंस्कृत सौजन्याचा आणि पाचवा म्हणजे आवश्यक तेव्हा, खळखळ न करता कार्यासाठी स्वतःकडे कमीपणा घेण्याचा.  

वर ज्या कुतूहलांचा उल्लेख केला आहे, त्यांपैकी बर्‍याच कुतूहलांची तृप्‍ती यशवंतरावांच्या या आधारशिलांचा विचार केल्यास आपोआप होईल.  यांतही काही निर्णय अपवादभूत वाटू शकतील.  सर्वच निर्णयांचे वेळी सर्वच आधार कार्यकारी होते, असेही म्हणता येणार नाही.  मनुष्याचे निर्णय प्रत्येक वेळी तर्कसंगत असतात असे नाही.  तर्क, भावना, योगायोग अशा सर्व घटकांचा विचार सम्यक दृष्टीने केला तरीही घटनेचे वा निर्णयाचे पूर्ण मर्म हाती येतेच असेही नाही.  तथापि, गेल्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात यशवंतरावांनी जे जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्यांचे पाठीमागे या आधारांना मानणारे मन होते एवढे स्पष्ट करण्याचे श्रेय 'कृष्णाकाठ' ने जोडले आहे.

वर ज्या पाच आधारांचा उल्लेख केला त्यांच्याशी सुसंगत अशीच या पुस्तकाची शैली आहे.  अनौपचारिक, प्रांजळ, अतिशयोक्ती टाळून मर्यादेच्या थोडेफार आतच राहून विधाने करणारी, उत्कट भावनेच्या अश्रूंना डोळ्यांच्या कडांबाहेर सांडू न देणारी, आणि विचारांना विवेकाच्या लगामात ठेवणारी, स्वतःविषयी खूप कमी सांगून जास्त सुचवणारी, आत्मस्तुती कटाक्षाने टाळणारी अशी ही या पुस्तकाची शैली म्हणजे 'कृष्णाकाठ' चे एक अनमोल लेणे आहे.  मूक राहून सारे काही व्यक्त करणार्‍या, सौ. वेणूताईंच्या, शांत विशाल डोळ्यांशीच यशवंतरावांचया शैलीची तुलना करता येईल.

'कृष्णाकाठ'साठी यशवंतरावांचे दिलखुलास अभिनंदन करताना शेवटी एक विचार मांडावासा वाटतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org