यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २५-१

१९६९ साली ज्या वेळी काँग्रेस फुटली, काही काळ यशवंतराव चव्हाण हे कोणत्याच बाजूस नव्हते, ते कुंपणावर बसून आहेत असा विनोद त्या वेळी झाला.  पण मला त्या वेळी यशवंतरावांची भूमिका योग्य अशीच वाटत होती.  आपल्या भूमिकेचे जाहीरपणे त्यांनी सांगितलेले कारणही पटण्यासारखे होते.  फाळणीनंतर मुंबईस भरलेल्या एका काँग्रेस शिबिरात ते असे म्हणाले होते की ज्या शस्त्रांनी लढा द्यावयाचा असतो, ती मोडून तो जिंकता येत नाही.  समाजपरिवर्तनाचा जो लढा, त्यांच्या डोळ्यांसमोर होता तो जिंकण्यासाठी काँग्रेस संघटनेस ते शस्त्र समजत होते.  पण पुढे एक सामान्य निमित्त झाले आणि शस्त्र मोडणार्‍या एका गटात ते सामील झाले.  त्या निमित्ताचे समर्थन त्यांनाही कधी समर्थपणे करता आले नाही.  आज काँग्रेस नावाने अनेक गट वावरतात.  त्यांपैकी एकाच्या हाती सत्ताही आहे.  पण आता काँग्रेस समाजपरिवर्तनाचे माध्यम राहिले नसून अतिशय खालच्या पातळीवरचे सत्तेच्या राजकारणाचे साधन झाले आहे.  या संदर्भात श्री. यशवंतरावांच्या बाबत अनेक गोष्टी बोलल्या गेल्या.  काही खालच्या पातळीचे आरोपही झाले.  मी त्यात शिरत नाही.  पण त्यासंबंधी जे स्पष्टीकरण महाराष्ट्रातील अनेक पुढार्‍यांनी दिले तेच मी गृहीत धरतो.  त्या काही इतर कुठल्याही प्रदेशापेक्षा महाराष्ट्रातील काँग्रेस संघटना बलवान होती. ती मोडण्याचे प्रयत्‍न त्या वेळच्या केंद्रीय नेतृत्वाकडून होत होते.  महाराष्ट्रातील काही माणसेही त्यांच्या हाती लागली होती.  निदान महाराष्ट्रातली तरी काँग्रेस टिकावी यासाठी यशवंतराव हे ते ज्यास प्रमुख समजत होते अशा गटात सामील झाले.  पण त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस टिकू शकली नाही.  काँग्रेसचे अनेक भाग झाले.  आज महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आहे, पण संघटना नाही.  संघटना ही तळागाळापासून उभी राहावी लागते.  पदाधिकार्‍यांच्या नेमणुका करणे हुकुमशाहीची पद्धत आहे.  ज्या लोकशाही काँग्रेसचा झेंडा श्री. यशवंतरावांनी आपल्या खांद्यावर घेतला असे त्यांनी अनेकदा म्हटले त्या लोकशाही काँग्रेसचा नव्हे.  महाराष्ट्रातील काँग्रेस टिकविण्याचे यशवंतरावांचे स्वप्नही पुरे होऊ शकले नाही.  मला तरी त्याचे एकच कारण वाटते.  अन्यायाशी नेहमी मुकाबलाच करावा लागतो.  त्याच्यापुढे आत्मार्पण करून भागत नाही.  मुकाबला करीत राहिल्याने अन्यायाचे परिमार्जन जरी करता आले नाही तरी अन्यायापुढे आपण वाकलो नाही याचे सात्त्वि समाधान तरी मनाला मिळते.  यशवंतरावांकडून त्यांच्या अनेक मित्रांची निदान एवढी तरी अपेक्षा होती.  आणीबाणी संपल्यानंतर काही काळ यशवंतरावांना ती जाणीव झाली आणि त्यांची काँग्रेस काही काळ निराळी काँग्रेस झाली, पण श्री. देवराज अर्स वगैरे जी मंडळी त्यांच्या बरोबर होती तीच तर पहिली काँग्रेस मोडणार्‍यांत पुढाकार घेणारी होती.  त्यांच्याशी यशवंतरावांचे पटणे शक्यच नव्हते.  श्री. देवराज अर्स यांनी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने पत्रकार परिषदेत एकदा जे विचार मांडले, त्याच्याशी मी सहमत नाही असे यशवंतराव चव्हाण हे स्वतःच मला म्हणाले होते.  अर्स काँग्रेसमध्ये त्यांचा कोंडमारा झाला होता.  महाराष्ट्र काँग्रेसमध्येही दुफळी झाली होती.  अखेर त्यांचा नाइलाज झाला आणि बराच वेळ दारावर तिष्ठत राहून ते ''स्वगृही'' परतले.  १९६९ पर्यंत त्यांच्या यशाची पताका सारखी वर जात होती पण त्यानंतरच्या काळाबाबत मात्र तसे म्हणणे अवघड आहे.

१९७९ मध्ये तर त्यांच्या राजकारणाने खालची पातळीच गाठली.  त्यांनी मोरारजी सरकार विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडला याबद्दल माझा यत्किंचित आक्षेप नाही. प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने त्यांचे ते कर्तव्यच होते.  जनसंघाचे आणि त्यांचे कधीच बनले नाही.  जनसंघ पूर्वपीठिकेचे श्री. अटलबिहारी वाजपेयी हे परराष्ट्रमंत्री होते.  आपल्या भाषणात त्यांनी त्यांच्या धोरणावर जर कडक टीका केली असती तर ते त्यांच्या तोपर्यंतच्या भूमिकेस साजेसे असते.  पण त्याबाबत मला काही म्हणायचे नाही असे त्यांनी सांगितले.  त्यांनी जनता पक्षाच्या आर्थिक धोरणावर कडक टीका केली आणि त्यातील बरीच योग्य होती.  त्या धोरणाचे शिल्पकार अर्थमंत्री या नात्याने श्री. चरणसिंग होते हेही त्यांना माहीत होते.  पण त्याच चरणसिंगांशी हातमिळवणी करून ते औट घटकेचे उपपंतप्रधान झाले.  जे सरकार एक दिवसही लोकसभेत सामोरे गेले नाही त्या सरकारमध्ये ते काही काळ उपपंतप्रधान होते हे लोकशाही परंपरेचा वारसा सांगणार्‍या श्री. यशवंतरावांना कसे पटले याचे कोणतेच स्पष्टीकरण देता येत नाही.

माझ्या सार्वजनिक जीवनात मात्र श्री. यशवंतरावांच्या काही गोष्टी न उमगण्यासारख्या जरी झाल्या असल्या तरी त्यांच्याकडून मला नेहमी उत्तेजन आणि विश्वासच मिळाला.  त्यामुळेच दिल्लीच्या सार्वजनिक जीवनात माझ्या हातून माझ्या सहकार्‍यांच्या मदतीमुळे काही काम होऊ शकले.  ज्या गोष्टी मला न उमगण्यासारख्या वाटल्या, त्यांच्यामुळेही हाती घेतलेल्या कामाचे काहीच नुकसान झाले नाही.  ती चर्चा नंतर होईलच.  १९६५ सालच्या मे महिन्यातील घटना.  यशवंतराव चव्हाण नुकतेच दिल्ली महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले होते व मी चिटणीस.  श्री. काकासाहेब गाडगीळ हे मंत्री असताना शाळेसाठी तीन एकर जागा मिळाली होती आणि सुरुवातीच्या उत्साहात देणग्या मिळवून एक इमारतही उभारली गेली होती.  १९५२ च्या निवडणुकीनंतर काकासाहेब पुन्हा मंत्री झाले नाहीत व शाळेचे दुर्दैव ओढवले.  शाळेची जी बाजू देशबंधू गुप्‍ता रस्त्यात लागून होती त्या बाजूस काही निर्वासितांना आपल्या दुकानासाठी जागा देण्यात आली.  त्यांनी आपल्या मागल्या बाजूस शाळेच्या जागेवर अतिक्रमण केले होते.  ते हटविण्यात येत नव्हते.  दुसरे म्हणजे संस्थेची आर्थिक परिस्थिती देखील अतिशय ओढाताणीची होती.  दिल्ली प्रशासनाकडून ९५ टक्के अनुदान मिळत असूनही मास्तरांचे पगार वेळेवारी भागविता येत नव्हते. शाळेच्या इतर खर्चासाठी तर पैसा नव्हताच.  मी शाळेचा चिटणीस झाल्यानंतर मी माझ्या मनापुढे दोनच उद्दिष्टे ठेवली होती.  एक तर लाकूडवाल्यांचे अतिक्रमण दूर करून रस्त्याच्या बाजूला भिंत उभारावयाची आणि संस्थेचा आर्थिक पाया थोडा फार मजबूत करावयाचा. 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org