यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २२-५

साहित्यक्षेत्रातील नव्या प्रवाहाकडे त्यांचं कटाक्षानं लक्ष असे.  लक्ष्मण माने यांचं 'उपरा' हे पुस्तक प्रसिद्ध झालं तेव्हा त्यांच्या अनेक व्याख्यानांतून आणि खाजगी संभाषणातून 'उपरा' चा प्रशंसापूर्वक उल्लेख होई.  लक्ष्मण माने यांच्या 'बंद दरवाजा' चं प्रकाशनही त्यांच्याच हस्ते झालं.  अशा प्रसंगी एखादा नवा चमकदार विचार मांडणं, हा तर त्यांचा हातखंडा असे.  'टीकेमुळे लक्ष्मण माने चिडतात, त्यांनी टीकाकारांच्या समीक्षेमुळे चिडून जाऊ नये' असं अनिल अवचट त्या प्रकाशनप्रसंगी म्हणाले.  आपल्या भाषणात यशवंतरावजी म्हणाले, ''खरं तर आता टीकाकारांनी आपल्या समीक्षेची चाल बदलायला हवी.  नव्या नव्या साहित्याचं जुन्या समीक्षेच्या दृष्टिकोणातून परीक्षण करू नये.''  साहित्याचा सतत विचार मनात असल्याशिवाय असं परीक्षण खरोखर करता येणार नाही.

'हिरोशिमा' च्या प्रकाशनासाठी ६ ऑगस्ट १९८४ रोजी टिळक स्मारक मंदिरात आले तेव्हा देखील केलेल्या भाषणात लेखकापेक्षा त्याच्या कलाकृतीवर बोलले.  त्या कादंबरीच्या प्रस्तावनेतही तेच !  'हिरोशिमा' ही कलाकृती श्रेष्ठ का ?  तर भारताच्या शांततेच्या धोरणाचा ती समर्थपणानं पाठपुरावा करते म्हणून !  खाजगी संभाषणातही ते म्हणत असत, ''व्यक्तिशः साहित्यिक बाजूला ठेवून त्याच्या साहित्यकृतीचं मोजमाप झालं पाहिजे.''  हा त्यांचा विचार सामान्य कसा मानता येईल ?  साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेचं सातत्यानं चिंतन असल्याशिवाय अशा तर्‍हेचे समर्पक विचार कधी बाहेर पडणारच नाहीत.  साहित्य आवडलं म्हणजे त्या साहित्यिकाची बूजही ते मनापासून राखीत असत.  'उपरा'कार लक्ष्मण माने यांच्या भटक्या विमुक्त जमातीसाठी सातार्‍याजवळची प्रशस्त जमीन मिळवून द्यावी यासाठी यशवंतराव प्रयत्‍नशील होते. लक्ष्मण माने यांच्या बरोबर जाऊन जमीनही पाहिली.  यासाठी ते आपली प्रतिष्ठा पणाला लावणार होते.  परंतु काळानं त्यांना ते समाधान मिळू दिलं नाही.  शिवाजी सावंत यांच्यावरील लोभापायी त्यांची 'छावा' ही कादंबरी प्रतापगडावर भवानी मातेला त्यांनी स्वहस्ते अर्पण केली.  

महाराष्ट्रातील सगळ्या प्रकारच्या साहित्य संस्थांच्या वाढीकडे त्यांचे आपुलकीनं लक्ष असे.  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्याला हिराबागेत झालेल्या तमाशा परिषदेला ते हजर होते.  तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी विचारलं, ''कसा काय वाटला कार्यक्रम ?''  आमच्यापैकी ज्यांनी कधी तमाशा बघितला नव्हता ते म्हणाले, ''सदाशिव पेठेत होणार्‍या नाटकांपेक्षा हा तमाशाचा प्रकार फार सभ्य वाटला.''  यावर मनसोक्त हसले.  तिथेही पुन्हा एक नवा विचार सांगितला.  म्हणाले, ''माणूस सभ्य-असभ्य असू शकतो.  साहित्य नव्हे !''

हा विचार आजी चकित करणारा आहे.  म्हणजे त्यांनी साहित्याचा किती सर्वांगीण विचार केला होता तो पाहा !

१९६१ साली ४३ वे नाट्यसंमेलन दिल्लीला झालं.  दुर्गाबाई खोटे अध्यक्ष होत्या आणि मुख्यमंत्री यशवंतरावजी स्वागताध्यक्ष होते.  त्या संमेलनासाठी त्यांनी राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसार यांना उद्धाटक म्हणून आणलं आणि मराठी नाट्यसाहित्याचा झेंडा दिल्लीत दिमाखानं फडकावला.

मुंबई मराठी साहित्य संघ मंदिराचं उद्धाटन ६ एप्रिल १९६४ रोजी झालं.  त्या वेळी यशवंतरावजी अमेरिकेला जायला निघाले होते.  त्यांच्याच हस्ते उद्धाटन करायचं ठरलं होतं.  शेवटी अमेरिकेला जाण्याच्या कार्यक्रमात त्यांनी थोडा फेरबदल केला आणि साहित्याला वाहिलेल्या संघाच्या इमारतीचं उद्धाटन केलं, आणि नंतर ते अमेरिकेला गेले.  या इमारतीची पायाभरणी त्यांच्याच हस्ते झाली होती.  कराडचं साहित्य संमेलन आणीबाणीच्या काळात झालं.  यशवंतराव स्वागताध्यक्ष होते.  दुर्गाबाई भागवत या अध्यक्ष होत्या.  वि.स.खांडेकर त्या संमेलनाला हजर होते.  यशवंतरावांनी संमेलनासाठी आलेल्या सर्व थोर साहित्यिकांचा मान ठेवला.  या संमेलनात अखेरच्या दिवशी आणीबाणीविरुद्ध ठराव आणण्याचा घाट दुर्गाबाईंनी घातला.  खाजगीत बरीच भवती न भवती झाली.  पण खांडेकरांनी तो ठराव आणायला कसून विरोध दर्शविला.  अर्थात तो ठराव येऊ शकला नाही.  हे संमेलनाचं भाग्य.  एरवी बाका प्रसंग निर्माण झाला असता.  राजकारणी लोकांनी, विशेषतः मंत्र्यांनी साहित्य संमेलनात मानानं मिरवू नये, व्यासपीठावर खुर्ची अडवून बसु नये, अशा तर्‍हेची भाषा काही साहित्यिकांनी हेतुपूर्वक सुरू केलेली असताना कर्‍हाड संमेलनाच्या वेळी किंवा इचलकरंजीच्या संमेलनाच्या वेळी 'राजकारणाचे जोडे मंडपाबाहेर ठेवून मी शारदेच्या मंडपात प्रवेश केला आहे' असं सांगून यशवंतराव साहित्य संमेलनाला हजर राहिले.  केवळ श्रोते म्हणूनच प्रेक्षकांतील पहिल्या खुर्चीवर जाऊन बसले.  राजकारणी असलो तरी तुमच्याइतकाच मीही साहित्यप्रेमी आहे, साहित्यिक आहे हे त्यांना दाखवून द्यायचं असावं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org